महाबळेश्वर–पाचगणी–वाई रस्त्यांच्या कामांवर प्रश्नचिन्ह; ‘प्युअर डांबरातच टिकाऊ रस्ते करा’ – कार्यकर्ते सूर्यकांत पांचाळ यांची मागणी

महाबळेश्वर–पाचगणी–वाई रस्त्यांच्या कामांवर प्रश्नचिन्ह; ‘प्युअर डांबरातच टिकाऊ रस्ते करा’ – कार्यकर्ते सूर्यकांत पांचाळ यांची मागणी

महाबळेश्वर प्रतिनिधी : 

महाबळेश्वर–पाचगणी–वाई या महत्त्वाच्या पर्यटन व दळणवळणाच्या मार्गावरील रस्त्यांच्या कामांच्या दर्जाबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून सामाजिक पर्यावरण कार्यकर्ते श्री. सूर्यकांत (बाळासो) पांचाळ यांनी रस्त्यांचे काम टिकाऊ आणि दर्जेदार व्हावे यासाठी ‘प्युअर डांबर’ वापरूनच रस्ते तयार करण्यात यावेत, अशी ठाम मागणी केली आहे. या संदर्भात त्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना हा विषय कोणत्याही व्यक्तीपुरता मर्यादित नसून सार्वजनिक रस्ते व्यवस्थेचा असल्याचे स्पष्ट केले.


महाबळेश्वर–पाचगणी हा मार्ग पर्यटनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या मार्गावर दररोज हजारो पर्यटक आणि स्थानिक नागरिकांची वाहतूक सुरू असते. मात्र गेल्या काही वर्षांत सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रस्त्यांवरील खड्डे भरणे, अर्ध्या ते पाव इंच डांबराचा थर देणे अशा प्रकारची दुरुस्ती अनेक वेळा करण्यात आली, तरी काही दिवसांतच तो थर उखडून जाण्याचे प्रकार वारंवार घडल्याचे स्थानिकांनी निदर्शनास आणले आहे. यामुळे रस्त्यांची स्थिती पुन्हा खराब होऊन नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

या पार्श्वभूमीवर अनेक वेळा आंदोलने आणि पाठपुरावा करूनही रस्त्यांची समस्या कायम असल्याने रस्ते ‘प्युअर डांबर’ वापरूनच मजबूत पद्धतीने तयार करण्यात यावेत, अशी मागणी करण्यात येत आहे. पांचाळ यांनी सांगितले की, सध्या सुरू असलेल्या कामांदरम्यान आणि काम पूर्ण झाल्यानंतर संबंधित यंत्रणेकडून रस्त्यांच्या गुणवत्तेची काटेकोर तपासणी होणे आवश्यक आहे. रस्ते दर्जेदार आणि टिकाऊ झाले तर भविष्यात वारंवार आंदोलन करण्याची वेळ कार्यकर्त्यांवर आणि नागरिकांवर येणार नाही.

निकृष्ट दर्जाच्या रस्त्यांमुळे वाहनचालकांना वाहतुकीत अडथळे निर्माण होतात तसेच काही वेळा अपघातांनाही सामोरे जावे लागते. त्यामुळे सध्या सुरू असलेले कामही अल्पावधीत खराब झाले तर त्याची जबाबदारी नेमकी कोणाची असणार, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. सार्वजनिक रस्ते ही नागरिकांची मूलभूत गरज असून त्यांची कामे टिकाऊ आणि दर्जेदार पद्धतीनेच झाली पाहिजेत, असे त्यांनी ठामपणे नमूद केले.

रस्त्यांच्या कामांबाबत प्रतिक्रिया व्यक्त करणे आणि मागणी करणे हा प्रत्येक नागरिकाचा लोकशाही हक्क असून सार्वजनिक हितासाठी आवाज उठविणे आवश्यक असल्याचेही पांचाळ यांनी स्पष्ट केले. भविष्यात महाबळेश्वर–पाचगणी परिसरातील रस्त्यांची कामे निकृष्ट दर्जाची झाल्याचे आढळल्यास लोकशाही मार्गाने शासन स्तरावर पुढील उपाययोजना करण्यासाठी कार्यकर्ते सज्ज असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, शासनाने या विषयाची गांभीर्याने दखल घेऊन महाबळेश्वर–पाचगणी–वाई परिसरातील सार्वजनिक रस्त्यांची कामे दर्जेदार आणि टिकाऊ पद्धतीने पूर्ण करण्यासाठी संबंधित ठेकेदार कंपन्यांना कठोर सूचना व ताकीद द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl