सातारा जिल्हा परिषद आदर्श शिक्षक जिल्हास्तरीय पुरस्काराने अमित कारंडे यांचा गौरव
सातारा जिल्हा परिषद आदर्श शिक्षक जिल्हास्तरीय पुरस्काराने अमित कारंडे यांचा गौरव
✍️जितेंद्र कारंडे ,
प्रतापगड प्रतिनिधी :
शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने योगदान देणारे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भोसे येथील पदवीधर शिक्षक अमित पांडुरंग कारंडे यांना सातारा जिल्हा परिषदेतर्फे जिल्हास्तरीय ‘आदर्श शिक्षक’ पुरस्कार जाहीर झाला आहे. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच उपमुख्य कार्यकारी अधिकारी गावडे साहेब, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) अनिस नायकवडी आणि शिक्षणाधिकारी (योजना) शबनम मुजावर यांच्या उपस्थितीत हा सन्मान प्रदान करण्यात येणार आहे.
अमित कारंडे हे एम.ए., बी.एड. पदवीधर असून त्यांनी मराठी आणि इतिहास या विषयात पदवी तसेच इतिहास व शिक्षणशास्त्र या विषयांत पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. आपल्या शैक्षणिक गुणवत्तेसोबतच त्यांनी शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण घडणीकडे विशेष लक्ष दिले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भोसे येथील विद्यार्थ्यांनी विविध शैक्षणिक आणि सांस्कृतिक उपक्रमांत उल्लेखनीय यश मिळवले आहे.
विशेष म्हणजे इन्स्पायर ॲवॉर्ड मानक या राष्ट्रीय स्तरावरील विज्ञान उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून महाराष्ट्रातील जिल्हा परिषद शाळांमधून राष्ट्रीय स्तरावर झेप घेणारी एकमेव शाळा म्हणून भोसे शाळेची ओळख निर्माण करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी वक्तृत्व, निबंध, हस्तलिखित, प्रश्नमंजुषा, गीतमंच, शाहिरी पोवाडा, चित्रकला अशा विविध स्पर्धांचे सातत्याने आयोजन करून विद्यार्थ्यांना प्रेरित करण्याचे काम त्यांनी केले आहे. तसेच क्रीडा स्पर्धांमध्येही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून शाळेला घवघवीत यश मिळवून दिले आहे.
उत्कृष्ट गायक म्हणूनही अमित कारंडे यांची जिल्ह्यात विशेष ओळख आहे. हार्मोनियम वादन, क्रिकेट, वाचन, निवेदन, स्फुटलेखन आणि काव्यलेखन अशा विविध छंदांमुळे ते विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरले आहेत. स्वतःच्या आवडी-निवडी विद्यार्थ्यांमध्ये रुजवत त्यांना कला, क्रीडा आणि साहित्य क्षेत्राकडे वळवण्याचे कार्य त्यांनी सातत्याने केले आहे.
मुख्यमंत्री ‘माझी शाळा सुंदर शाळा’ या स्पर्धेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भोसेला पहिल्याच वर्षी प्रथम क्रमांकाचा तीन लाख रुपयांचा पुरस्कार मिळवून देण्यात त्यांनी सहकाऱ्यांसह मोलाचे योगदान दिले. गेल्या चार-पाच वर्षांत शाळेच्या भौतिक आणि शैक्षणिक विकासासाठी विविध उपक्रम राबवत शाळेचा दर्जा उंचावण्यातही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
साहित्य क्षेत्रातही त्यांचे योगदान उल्लेखनीय आहे. सकाळ, ऐक्य आणि पुढारी या दैनिकांमधून त्यांच्या शैक्षणिक लेखांसह काव्यरचना प्रसिद्ध झाल्या आहेत. तसेच शिक्षक ध्येय मासिक आणि विविध दिवाळी अंकांमधूनही त्यांच्या कविता आणि लेख प्रकाशित झाले आहेत. ‘सृजनरंग’ या प्रातिनिधिक काव्यसंग्रहातही त्यांच्या कवितांचा समावेश करण्यात आला आहे.
सातारा जिल्हा परिषदेच्या विविध शैक्षणिक उपक्रमांच्या प्रचार-प्रसारासाठी कार्यरत असलेल्या अभ्यासगटाचे ते सक्रिय सदस्य आहेत. जिल्हा परिषदेच्या ‘स्पंदने शिक्षणाची’ या द्वैमासिकातून त्यांनी नवोपक्रम विषयक लेखनही केले आहे. नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून अनेक विद्यार्थ्यांना प्रवेश मिळवून देण्यातही त्यांनी यश मिळवले आहे. विज्ञान प्रदर्शनांमध्ये सहभाग घेऊन विद्यार्थ्यांना प्रेरित केले असून अनेकदा त्यांना यशही मिळाले आहे.
सांस्कृतिक क्षेत्रातही ते तितकेच सक्रिय आहेत. अनेक वर्षे शिवप्रताप दिन आणि शिवजयंती सोहळ्यांचे सूत्रसंचालन त्यांनी केले आहे. राज्यगीत, शिवगीत आणि पोवाडा गायनातून त्यांनी श्रोत्यांना प्रभावित केले आहे. महाबळेश्वर तालुका ‘सारेगमप गीतमंच’ समूहाचे ते संस्थापक असून शिक्षक समूहगीत स्पर्धेत जिल्हास्तरावर त्यांनी यश मिळवले आहे. राज्य शासन आयोजित सुगम गायन स्पर्धेत त्यांनी कोल्हापूर विभागाचे प्रतिनिधित्व केले आहे. तसेच अलीकडेच झालेल्या जिल्हा परिषद कर्मचारी व अधिकारी क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये टेबल टेनिस दुहेरी प्रकारात द्वितीय उपविजेतेपदही त्यांनी मिळवले आहे.
त्यांच्या कार्याची दखल घेत यापूर्वीही त्यांना अनेक सन्मानांनी गौरविण्यात आले आहे. तथागत फाउंडेशनचा जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार, रोटरी क्लब ऑफ पाचगणीचा नेशन बिल्डर पुरस्कार, स्वातंत्र्यसैनिक स्व. भि. दा. भिलारे गुरुजी जन्मशताब्दी पुरस्कार तसेच पंचायत समिती महाबळेश्वरचा आदर्श शिक्षक तालुका पुरस्कार अशा विविध सन्मानांनी त्यांचा गौरव झाला आहे.
आता सातारा जिल्हा परिषदेचा जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाल्याने शिक्षण क्षेत्रातील त्यांच्या कार्याची पुन्हा एकदा दखल घेतली गेली आहे. त्यांच्या या यशाबद्दल शिक्षण क्षेत्रातील सहकारी, विद्यार्थी, पालक आणि विविध सामाजिक संस्थांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
Comments
Post a Comment