गॅसटंचाईचा फटका; महाबळेश्वरमध्ये लाकडी शेगडीवर स्वयंपाक करून हॉटेल व्यवसाय सुरू ठेवण्याची वेळ

गॅसटंचाईचा फटका; महाबळेश्वरमध्ये लाकडी शेगडीवर स्वयंपाक करून हॉटेल व्यवसाय सुरू ठेवण्याची वेळ

✍️मिलिंद काळे,

महाबळेश्वर प्रतिनिधी :

 जागतिक स्तरावर प्रसिद्ध असलेल्या पर्यटननगरी महाबळेश्वरमध्ये गेल्या काही दिवसांपासून एलपीजी गॅसच्या तुटवड्याची समस्या गंभीर बनली असून त्याचा थेट परिणाम येथील हॉटेल व्यवसाय, चहाचे स्टॉलधारक तसेच लहान खाद्यपदार्थ विक्रेत्यांवर होताना दिसत आहे. गॅस सिलिंडर वेळेवर उपलब्ध होत नसल्यामुळे अनेक व्यावसायिकांनी पर्याय म्हणून पुन्हा पारंपरिक लाकडी शेगडीचा आधार घेत स्वयंपाक सुरू केला आहे.

महाबळेश्वरच्या मुख्य बाजारपेठ परिसरात एका हॉटेलसमोर उभारण्यात आलेली आधुनिक लाकडी चुल सध्या पर्यटकांचे विशेष लक्ष वेधून घेत आहे. गॅस उपलब्ध होत नसल्यामुळे व्यवसाय बंद ठेवण्याची वेळ येऊ नये, यासाठी व्यावसायिकांनी हा पर्याय स्वीकारला आहे. या लाकडी चुलीवर धुराच्या वातावरणात चहा, भजी आणि इतर खाद्यपदार्थ तयार करून ग्राहकांना सेवा दिली जात असल्याचे चित्र सध्या बाजारपेठेत पाहायला मिळत आहे.

पर्यटनस्थळ म्हणून महाबळेश्वरमध्ये वर्षभर पर्यटकांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. विशेषतः शनिवार-रविवार तसेच सुट्टीच्या काळात हजारो पर्यटक येथे येत असतात. त्यामुळे हॉटेल आणि खाद्यपदार्थ विक्रेत्यांवर पर्यटकांना उत्तम सेवा देण्याची मोठी जबाबदारी असते. मात्र सध्या निर्माण झालेल्या गॅसटंचाईमुळे अनेक व्यावसायिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

काही विक्रेत्यांनी सांगितले की, गॅस सिलिंडर मिळवण्यासाठी एजन्सीकडे वारंवार चकरा माराव्या लागत आहेत. तरीही वेळेवर सिलिंडर मिळत नसल्याने पर्याय म्हणून लाकूड खरेदी करून लाकडी शेगडीवर स्वयंपाक करावा लागत आहे. यामुळे खर्च वाढत असून धूर आणि उष्णतेमुळे काम करणेही अधिक कष्टाचे झाले आहे. तरीदेखील ग्राहकांना सेवा देण्यासाठी आणि आपला रोजीरोटीचा व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी व्यावसायिकांनी हा मार्ग स्वीकारला आहे.

दरम्यान, लाकडी शेगडीवर बनवलेल्या पदार्थांना वेगळीच चव येत असल्याची प्रतिक्रिया काही पर्यटकांनी व्यक्त केली आहे. “लाकडी शेगडीवरचा चहा आणि गरमागरम भजी यांची चव खास असते,” असे सांगत काही पर्यटक अशा स्टॉलवर आवर्जून थांबत आहेत. त्यामुळे काही विक्रेत्यांनी “लाकडी शेगडीवर बनवलेले गरमागरम पदार्थ” अशा पाट्याही लावल्या आहेत.

मात्र पर्यटननगरीत गॅसटंचाईची समस्या निर्माण होणे ही चिंतेची बाब असल्याची भावना स्थानिकांकडून व्यक्त होत आहे. पर्यटन व्यवसायावर मोठ्या प्रमाणावर अवलंबून असलेल्या शहरात गॅससारख्या मूलभूत गरजेचा सुरळीत पुरवठा होणे अत्यावश्यक असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. संबंधित प्रशासन आणि गॅस पुरवठा यंत्रणेने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने गॅस पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी स्थानिक व्यावसायिक आणि नागरिकांकडून होत आहे.

सध्या तरी परिस्थितीशी दोन हात करत महाबळेश्वरमधील खाद्यपदार्थ विक्रेते लाकडी शेगडीच्या साहाय्याने आपला व्यवसाय सुरू ठेवत आहेत. आधुनिक गॅसच्या युगात पुन्हा एकदा पारंपरिक लाकडी शेगडीवरचा स्वयंपाक महाबळेश्वरमध्ये पाहायला मिळत असून या परिस्थितीने येथील गॅसटंचाईची समस्या किती गंभीर आहे, हे अधोरेखित झाले आहे.

Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl