महाबळेश्वरमध्ये एलपीजी गॅसचा तुटवडा; नागरिक आणि हॉटेल व्यावसायिक अडचणीत


महाबळेश्वरमध्ये एलपीजी गॅसचा तुटवडा; नागरिक आणि हॉटेल व्यावसायिक अडचणीत

✍️मिलिंद काळे,

महाबळेश्वर प्रतिनिधी: 

जागतिक स्तरावर प्रसिद्ध असलेल्या पर्यटनस्थळ महाबळेश्वर शहरात सध्या एलपीजी गॅसचा तुटवडा निर्माण झाल्याची परिस्थिती उद्भवली असून त्यामुळे नागरिकांसह हॉटेल व्यावसायिक मोठ्या अडचणीत सापडले आहेत. गेल्या काही दिवसांपासून गॅस एजन्सीकडे सिलेंडरचा पुरवठा कमी प्रमाणात होत असल्याने अनेकांना वेळेवर गॅस मिळत नसल्याच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत.

महाबळेश्वर शहर आणि परिसरात मोठ्या प्रमाणावर घरगुती तसेच व्यावसायिक एलपीजी सिलेंडरचा वापर केला जातो. विशेषतः पर्यटन हंगामात येथे हजारो पर्यटक दाखल होत असल्याने हॉटेल, रेस्टॉरंट, ढाबे आणि खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या व्यावसायिकांचा मोठ्या प्रमाणावर गॅसवरच स्वयंपाक अवलंबून असतो. मात्र गेल्या काही दिवसांपासून गॅसचा पुरवठा अपुरा होत असल्याने अनेक व्यावसायिकांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. काही हॉटेल व्यावसायिकांनी गॅस वेळेवर उपलब्ध होत नसल्यामुळे स्वयंपाकाच्या कामावर परिणाम होत असल्याची नाराजीही व्यक्त केली आहे.

दरम्यान, गृहिणींनाही या टंचाईचा मोठा फटका बसत असून अनेक ठिकाणी गॅस बुक केल्यानंतरही सिलेंडर मिळण्यासाठी अनेक दिवस प्रतीक्षा करावी लागत असल्याचे नागरिक सांगत आहेत. काही ठिकाणी गॅस सिलेंडर उपलब्ध नसल्यामुळे लोकांना पर्यायी साधनांचा वापर करण्याची वेळ येत आहे.

महाबळेश्वर हे पूर्णपणे पर्यटनावर अवलंबून असलेले शहर असल्याने अशा प्रकारचा गॅस तुटवडा निर्माण होणे चिंताजनक मानले जात आहे. विशेषतः सध्या पर्यटन हंगाम सुरू असताना हॉटेल व्यवसायावर त्याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, या परिस्थितीकडे प्रशासन आणि संबंधित गॅस वितरण यंत्रणेकडून अपेक्षित गांभीर्याने पाहिले जात नसल्याची टीकाही नागरिकांमधून होत आहे. वेळेवर गॅसचा पुरवठा न झाल्यास नागरिकांना आणि व्यावसायिकांना अनावश्यक त्रास सहन करावा लागणार असल्याने प्रशासनाने तात्काळ लक्ष देऊन गॅसचा पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी महाबळेश्वरकरांकडून जोर धरू लागली आहे.

याचबरोबर हॉटेल व्यावसायिकांनी आणखी एक महत्त्वाची मागणी मांडली आहे. हॉटेलमध्ये वापरला जाणारा कमर्शियल गॅस मुख्यतः पर्यटकांसाठी जेवण बनवण्यासाठी वापरला जातो. मात्र सध्या गॅस टंचाईमुळे हॉटेलमधील कर्मचाऱ्यांसाठी जेवण तयार करण्यासाठीही अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे घरगुती गॅसचा वापर किमान हॉटेलमधील स्टाफसाठी जेवण बनवण्यापुरता तरी परवानगी द्यावी, जेणेकरून कर्मचाऱ्यांना जेवणाची व्यवस्था करता येईल, अशी मागणी हॉटेल व्यावसायिकांकडून करण्यात येत आहे.


Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl