आंदोलनाचा परिणाम; पाचगणी–महाबळेश्वर रस्त्याच्या दुरुस्तीला वेग, शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या निर्देशाने काम युद्धपातळीवर
आंदोलनाचा परिणाम; पाचगणी–महाबळेश्वर रस्त्याच्या दुरुस्तीला वेग, ना.शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या निर्देशाने काम युद्धपातळीवर
पाचगणी, दि. ११ (प्रतिनिधी) :
पाचगणी–महाबळेश्वर मार्गावरील खड्डेमय रस्त्याच्या विरोधात महाबळेश्वर, पाचगणी आणि वाई परिसरातील नागरिक, व्यापारी तसेच पर्यटन व्यावसायिकांनी रविवारी (दि. ८ मार्च) कडकडीत बंद पाळत तीव्र निषेध व्यक्त केल्यानंतर अखेर प्रशासनाने या गंभीर समस्येची दखल घेतली आहे. या पार्श्वभूमीवर बांधकाम मंत्री ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या निर्देशानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने पाचगणी–महाबळेश्वर मार्गावरील खड्डे बुजवणे, डांबरीकरण व दुरुस्तीची कामे युद्धपातळीवर सुरू केली असून त्यामुळे पर्यटननगरीत काहीसा दिलासा व्यक्त होत आहे.
पाचगणी ते महाबळेश्वर दरम्यानचा हा मार्ग पर्यटनदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. तसेच सुरुर–वाई–पाचगणी–महाबळेश्वर- पोलादपूर या महत्त्वाच्या मार्गावरील सुमारे १६ ते १८ किलोमीटरच्या पट्ट्यात गेल्या सहा महिन्यांपासून रस्त्याचे खोदकाम सुरू होते. मात्र कामाची गती अत्यंत संथ असल्याने रस्त्यावर मोठमोठे खड्डे निर्माण झाले होते. परिणामी स्थानिक नागरिक, पर्यटक, व्यापारी तसेच वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. वारंवार होणारी वाहतूक कोंडी, धुळीचे प्रमाण आणि अपघाताचा वाढता धोका यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली होती.
या पार्श्वभूमीवर महाबळेश्वर व पाचगणी येथे नागरिकांनी एकजूट दाखवत कडकडीत बंद पाळला होता. या आंदोलनाची तातडीने दखल घेत आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना काम तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले. त्यांच्या सूचनेनुसार रस्त्यावरील खड्डे त्वरित बुजवणे, दर्जेदार डांबरीकरण करणे तसेच वाहतूक सुरळीत राहील याची खबरदारी घेत युद्धपातळीवर काम सुरू करण्यात आले आहे. सध्या पाचगणी–महाबळेश्वर दरम्यान अनेक ठिकाणी खड्डे बुजवणे, डांबरीकरण आणि काही भागांत काँक्रीटीकरणाची कामे वेगाने सुरू असल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान, भाजपचे नगरसेवक रविंद्र कुंभारदरे यांनी सांगितले की, महाबळेश्वर–पाचगणी हा मार्ग पर्यटननगरीसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. गेल्या काही महिन्यांपासून या रस्त्याच्या दुरवस्थेमुळे नागरिकांसह पर्यटकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. मात्र आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी तातडीने दखल घेऊन अधिकाऱ्यांना कठोर निर्देश दिल्यामुळे आता दुरुस्तीच्या कामाला वेग आला आहे. त्यामुळे स्थानिक नागरिक आणि पर्यटन व्यवसायिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
उन्हाळी पर्यटन हंगाम लवकरच सुरू होणार असल्याने दरवर्षी मोठ्या संख्येने पर्यटक महाबळेश्वर आणि पाचगणी येथे भेट देतात. त्यामुळे रस्त्याची स्थिती सुधारल्यास पर्यटकांना मोठा दिलासा मिळणार असून वाहतूक कोंडी, धुळीचे प्रमाण आणि अपघाताचा धोका कमी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
Comments
Post a Comment