तळदेव येथे सामाजिक समरसता जनजागृती बैठक; १०५ गावांत सलोखा टिकवण्याचा निर्धार
तळदेव येथे सामाजिक समरसता जनजागृती बैठक; १०५ गावांत सलोखा टिकवण्याचा निर्धार
तळदेव प्रतिनिधी :
परिसरातील १०५ गावांमध्ये सामाजिक सलोखा टिकून राहावा, समाज बांधवांमध्ये एकोपा नांदावा आणि कोणत्याही प्रकारची जातीय तेढ निर्माण होऊ नये या उद्देशाने तळदेव येथे सामाजिक समरसता जनजागृती बैठकीचे आयोजन करण्यात आले. उपविभागीय अधिकारी वाई आणि १०५ गाव समाज सामाजिक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेली ही बैठक उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली.
या बैठकीस नागरी हक्क संरक्षण कोल्हापूर परीक्षेत्राच्या पोलीस अधीक्षक मा. ज्योती क्षीरसागर, उपविभागीय अधिकारी साळुंखे, महाबळेश्वर पोलीस उपनिरीक्षक सांडभोर तसेच मेढा पोलीस उपनिरीक्षक पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या सुरुवातीला माजी सभापती धोंडिबा जंगम आणि सरपंच रामचंद्र जंगम यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले.
बैठकीच्या प्रारंभी उपविभागीय अधिकारी साळुंखे यांनी प्रस्ताविक करताना सामाजिक सलोखा का आवश्यक आहे, कायदा आणि नागरिकांची जबाबदारी काय आहे तसेच या बैठकीचे आयोजन करण्यामागील उद्देश काय आहे याची सविस्तर माहिती दिली. समाजात एकोपा आणि शांतता टिकवण्यासाठी सर्वांनी सकारात्मक भूमिका घ्यावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
यावेळी संजय संकपाळ गुरुजी यांनी मनोगत व्यक्त करताना १०५ गाव समाज व्यवस्थेची रचना, तिची विभागवार कार्यपद्धती तसेच समाजात होणाऱ्या बैठका आणि समाजाच्या वतीने राबवले जाणारे विविध उपक्रम याबाबत माहिती दिली. समाज व्यवस्थेची आदरयुक्त भीती असल्यामुळे गावांमध्ये शिस्त आणि सलोखा टिकून राहतो, असे सांगत समाज व्यवस्था ही कायदा व सुव्यवस्था राखण्यास पूरक ठरते. कोणत्याही परिस्थितीत सामाजिक समरसता बाधित होईल असे निर्णय समाज घेणार नाही आणि भविष्यातही घेणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.
३२ गाव समाजाचे माजी अध्यक्ष ह.भ.प. धोंडीबा महाराज संकपाळ यांनी गावागावांमध्ये १२ बलुतेदार परंपरेतून लोक गुण्यागोविंदाने कसे एकत्र राहतात याची उदाहरणे देत समाजातील एकोप्याचे महत्त्व स्पष्ट केले. गणेशजी उतेकर यांनी समाज व्यवस्था किती मजबूत आहे यावर भाष्य करताना १०५ गावांमध्ये गुन्हेगारीचे प्रमाण कमी असून वादविवाद टाळण्यासाठी समाज व्यवस्थेची महत्त्वाची भूमिका असल्याचे सांगितले. समाजाने पोलीस प्रशासनाला सहकार्य केले असून पुढेही पोलीस प्रशासनाने समाज संघटनांना सहकार्य करावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. समाजातील काही समाजकंटकांवर समाज व्यवस्थेमुळे आळा बसला असून भविष्यातही समाज व्यवस्था प्रभावीपणे कार्यरत राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.
भाऊसाहेब मोरे, बबन सकपाळ, हरिभाऊ सकपाळ आदी समाज बांधवांनी समाजातील विविध प्रश्न मांडले. यावेळी नागरी हक्क संरक्षण कोल्हापूर परीक्षेत्राच्या पोलीस अधीक्षक मा. ज्योती क्षीरसागर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना येथील समाज व्यवस्थेचे कौतुक केले. समाज म्हणून राबवले जाणारे उपक्रम स्तुत्य असून सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी पोलीस प्रशासन सर्वतोपरी सहकार्य करेल, असे त्यांनी सांगितले. एखादा अनुचित प्रकार घडल्यास त्याचा दोष समाज व्यवस्थेवर जाऊ नये यासाठी सर्वांनी दक्ष राहावे, तसेच गावपातळीवर किंवा समाजातच वाद मिटवण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन त्यांनी केले. वाद मिटवताना दोन्ही बाजूंचे मत समजून घेत ‘सत्य ही तिसरी बाजू’ समजून विचार केल्यास अनेक प्रश्न सोडवता येतात, अशी उदाहरणे देत त्यांनी मार्गदर्शन केले.
या बैठकीस १०५ गाव समाजातील समाज बांधव, पोलिस पाटील, युवक तसेच तळदेव ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी सरपंच रामचंद्र जंगम यांनी उपस्थितांचे आभार मानले. तळदेव ग्रामस्थांनी भोजन व बैठकीची व्यवस्था उत्तम प्रकारे केली. या कार्यक्रमास पत्रकार संतोष मालुसरे यांनी विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रसिद्धी दिली.
Comments
Post a Comment