खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या पाठपुराव्याला यश; गुरेघर येथील रुग्णाला मुख्यमंत्री सहायता निधीतून ७० हजारांची मदत
खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या पाठपुराव्याला यश; गुरेघर येथील रुग्णाला मुख्यमंत्री सहायता निधीतून ७० हजारांची मदत
महाबळेश्वर, दि. १२ (प्रतिनिधी) :
महाबळेश्वर तालुक्यातील गुरेघर येथील एका गरजू रुग्णाला वैद्यकीय उपचारासाठी मुख्यमंत्री सहायता निधीतून आर्थिक मदत मंजूर करण्यात आली आहे. खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी केलेल्या शिफारशीच्या अनुषंगाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सौ. माधुरी गोरे यांच्यासाठी ७० हजार रुपयांचे अर्थसहाय्य मंजूर केले असून ही रक्कम संबंधित रुग्णालयाच्या खात्यात वर्ग करण्यात आली आहे.
महाबळेश्वर तालुक्यातील गुरेघर येथील सौ. माधुरी गोरे (वय ३३) या गंभीर आजाराने त्रस्त असून त्यांच्यावर हिप रिप्लेसमेंटसाठी उपचार सुरू आहेत. त्यांच्यावर सह्याद्री सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल येथे उपचार सुरू असून शस्त्रक्रिया व औषधोपचारासाठी सुमारे सहा लाख पासष्ठ हजार रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. मात्र गोरे कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत हालाखीची असल्याने एवढा मोठा खर्च करणे त्यांना शक्य नव्हते.
या पार्श्वभूमीवर खासदार उदयनराजे भोसले यांनी चार मार्च दोन हजार सव्वीस रोजी मुख्यमंत्री यांना पत्र पाठवून गोरे कुटुंबाच्या परिस्थितीची माहिती देत मुख्यमंत्री सहायता निधीतून आर्थिक मदत देण्याची शिफारस केली होती. या पत्राची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री सहायता निधीतून सत्तर हजार रुपयांचे अर्थसहाय्य मंजूर केले. मुख्यमंत्री सचिवालयातील मुख्यमंत्री सहायता निधी कक्षामार्फत ही रक्कम स्टेट बँक ऑफ इंडियामार्फत संबंधित रुग्णालयाच्या खात्यात वर्ग करण्यात आल्याची माहिती अधिकृत पत्राद्वारे देण्यात आली आहे.
मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाचे कक्ष प्रमुख रामेश्वर नाईक यांनी जारी केलेल्या पत्रानुसार ही रक्कम शासनाच्या नियम व अटींच्या अधीन राहून मंजूर करण्यात आली आहे. संबंधित रुग्णालयाने ही मदत रुग्णाच्या उपचारासाठीच वापरावी तसेच नव्वद दिवसांच्या आत निधीचा उपयोग करणे आवश्यक असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.
या आर्थिक मदतीमुळे गोरे कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला असून स्थानिक नागरिकांनी खासदार उदयनराजे भोसले आणि राज्य शासनाचे आभार मानले आहेत. गरीब आणि गरजू रुग्णांना मुख्यमंत्री सहायता निधीतून दिली जाणारी मदत अनेक कुटुंबांसाठी आधार ठरत असल्याचे मतही नागरिकांनी व्यक्त केले.
Comments
Post a Comment