पाचगणी–महाबळेश्वर रस्त्याच्या रखडलेल्या कामाविरोधात कडकडीत बंद; पर्यटननगरीतील जनतेची अभूतपूर्व एकजूट
पाचगणी–महाबळेश्वर रस्त्याच्या रखडलेल्या कामाविरोधात कडकडीत बंद; पर्यटननगरीतील जनतेची अभूतपूर्व एकजूट
✍️मिलिंद काळे,
महाबळेश्वर प्रतिनिधी :
सुरूर ते पोलादपूर या राष्ट्रीय महामार्गावरील पाचगणी–महाबळेश्वर दरम्यान सुरू असलेल्या रस्त्याच्या रखडलेल्या आणि अत्यंत संथ गतीने सुरू असलेल्या कामाविरोधात आज महाबळेश्वर तालुक्यात कडकडीत बंद पाळण्यात आला. पाचगणी, गुरेघर, भोसे खिंड, वेण्णा तलाव परिसर, महाबळेश्वर शहर तसेच कुंभरोशी या भागांमध्ये व्यापारी, हॉटेल व्यावसायिक, टॅक्सी चालक, विविध संघटना आणि सर्वसामान्य नागरिकांनी स्वयंस्फूर्त सहभाग नोंदवत प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.
वाई ते पोलादपूर हा घाटमार्ग कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा अत्यंत महत्त्वाचा दळणवळण मार्ग मानला जातो. पर्यटनाच्या दृष्टीनेही या मार्गाला विशेष महत्त्व आहे. मात्र गेल्या अनेक महिन्यांपासून या महामार्गाचे काम अत्यंत मंद गतीने सुरू असल्यामुळे स्थानिक नागरिक, व्यापारी तसेच पर्यटकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. ठिकठिकाणी रस्ता उखडलेला असून मोठ्या प्रमाणात खड्डे, धुळीचे ढग, धोकादायक वळणे आणि वाहतुकीची कोंडी यामुळे या मार्गावरून प्रवास करणे अत्यंत त्रासदायक बनले आहे.
विशेष म्हणजे पाचगणी ते महाबळेश्वर दरम्यानचा सुमारे सहा ते सात किलोमीटरचा रस्ता गेल्या सहा महिन्यांपासून उकरून ठेवण्यात आला आहे. परिणामी सामान्यतः अवघ्या पंधरा मिनिटांत पूर्ण होणारा प्रवास सध्या पाऊण तासापर्यंत वाढला आहे. या परिस्थितीमुळे पर्यटकांचा मौल्यवान वेळ वाया जात असून अनेक पर्यटक महाबळेश्वरला येण्याऐवजी इतर पर्यटनस्थळांकडे वळत असल्याचे दिसून येत आहे.
या परिस्थितीचा थेट परिणाम महाबळेश्वरच्या पर्यटन व्यवसायावर होत आहे. पर्यटन हा येथील अर्थव्यवस्थेचा कणा मानला जातो. स्थानिक व्यापारी, हॉटेल व्यावसायिक, टॅक्सी चालक, छोटे विक्रेते तसेच पर्यटनाशी संबंधित असलेल्या हजारो कुटुंबांचा उदरनिर्वाह या व्यवसायावर अवलंबून आहे. मात्र रस्त्याच्या रखडलेल्या कामामुळे पर्यटकांची संख्या कमी होत असल्याने स्थानिक व्यवसायावर मोठे आर्थिक संकट ओढवले आहे.
या पार्श्वभूमीवर पाचगणी आणि महाबळेश्वर येथील व्यापारी, नागरिक, वाहतूकदार तसेच विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींनी एकत्र येऊन काही दिवसांपूर्वी बैठक घेतली होती. या बैठकीत प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आणि सरकारचे लक्ष वेधण्यासाठी पाचगणी–महाबळेश्वर बंदची हाक देण्याचा निर्णय घेण्यात आला.
या निर्णयानुसार रविवारी महाबळेश्वर शहरासह तालुक्यातील अनेक भागांमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. पाचगणी बाजारपेठ, महाबळेश्वरची मुख्य बाजारपेठ, वेण्णा तलाव परिसर, गुरेघर, भोसे खिंड आणि कुंभरोशी परिसरातील बहुतांश दुकाने, हॉटेल्स आणि व्यावसायिक आस्थापना दिवसभर बंद ठेवण्यात आल्या. स्थानिक व्यापाऱ्यांसह हॉटेल व्यावसायिक, टॅक्सी संघटना, शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांनीही बंदला उत्स्फूर्त पाठिंबा दिल्याने अनेक ठिकाणी शांततेत आणि शिस्तबद्ध वातावरणात बंद यशस्वी झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
महाबळेश्वरसारख्या आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख असलेल्या पर्यटनस्थळाकडे जाणाऱ्या मुख्य मार्गाची झालेली ही दुरवस्था अत्यंत लाजिरवाणी असल्याची भावना अनेक नागरिकांनी व्यक्त केली. प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून रस्त्याचे काम दर्जेदार पद्धतीने आणि युद्धपातळीवर पूर्ण करावे, अशी जोरदार मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे.
दरम्यान, प्रशासन आणि संबंधित ठेकेदारांनी या प्रश्नाची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने कामाला गती दिली नाही तर पुढील काळात आणखी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही नागरिकांनी दिला आहे. महाबळेश्वर तालुक्यातील जनतेने दाखवलेली ही एकजूट प्रशासनासाठी स्पष्ट इशारा असल्याची चर्चा सध्या सर्वत्र सुरू आहे.
Comments
Post a Comment