“ऑईल मिश्रीत डांबराऐवजी प्युअर डांबर वापरा”; महाबळेश्वर–पाचगणी रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेबाबत प्रश्न
“ऑईल मिश्रीत डांबराऐवजी प्युअर डांबर वापरा”; महाबळेश्वर–पाचगणी रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेबाबत प्रश्न
महाबळेश्वर प्रतिनिधी :
महाबळेश्वर–पाचगणी दरम्यान सध्या सुरू असलेल्या रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेबाबत प्रश्न उपस्थित होत असून रस्ते बांधकामात ऑईल मिश्रीत डांबराऐवजी प्युअर डांबराचा वापर करून टिकाऊ आणि दर्जेदार काम करावे, अशी मागणी सामाजिक व पर्यावरण कार्यकर्ते श्री. सुर्यकांत (बाळासो) पांचाळ यांनी केली आहे. तात्पुरत्या मलमपट्टीसारखी कामे करण्याऐवजी दीर्घकाळ टिकणारे रस्ते बांधणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
श्री. पांचाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, अनेक ठिकाणी रस्त्यांवर ऑईल मिश्रीत डांबर टाकून मलमपट्टीसारखे काम केले जाते. मात्र अशा प्रकारे टाकलेला थर काही कालावधीत निघू लागतो आणि रस्ता पुन्हा खराब होतो, असा अनुभव यापूर्वी अनेक ठिकाणी आला आहे. त्यामुळे रस्त्याचे काम सुरू झाले म्हणून तात्पुरते समाधान व्यक्त करण्याऐवजी कामाच्या दर्जावर लक्ष ठेवणे अधिक महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले.
त्यांच्या मते, प्युअर डांबराचा वापर करून केलेले रस्ते अधिक मजबूत आणि टिकाऊ ठरतात. अशा रस्त्यांना अनेक वर्षे केवळ किरकोळ दुरुस्तीची गरज भासते. परंतु काही ठिकाणी कमी दर्जाच्या पद्धतीने रस्त्यांची कामे केल्यामुळे वर्ष-दोन वर्षांत पुन्हा खड्डे पडतात आणि पुन्हा दुरुस्तीची कामे काढावी लागतात. यामुळे शासनाच्या निधीचा अपव्यय होतो तसेच नागरिकांना वारंवार हालअपेष्टा सहन कराव्या लागतात, असेही त्यांनी सांगितले.
सिमेंट काँक्रीट रस्त्यांच्या कामांबाबतही त्यांनी काही ठिकाणी नकारात्मक अनुभव आल्याचे नमूद केले. अनेक ठिकाणी काही काळातच लहान-मोठे खड्डे पडणे, खडी निघून जाणे, सळया दिसू लागणे अशा समस्या निर्माण होत असल्याचे त्यांनी सांगितले. अशा परिस्थितीत पुन्हा पॅचवर्क केले जाते, मात्र तेही व्यवस्थित न झाल्यास अपघात होण्याची शक्यता वाढते, असे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, महाबळेश्वरहून मेढा–केरघळकडे जाणारा रस्ता, पाचगणीतील काही अंतर्गत रस्ते तसेच संजीवन नाक्याहून करहरकडे जाणारा घाट रस्ता यांसारख्या ठिकाणी केलेल्या रस्त्यांच्या कामांचे निरीक्षण केल्यास त्याची गुणवत्ता लक्षात येईल, असेही त्यांनी सांगितले. महाबळेश्वरहून पाचगणीकडे जाणाऱ्या संजीवन हायस्कूलकडील रस्त्याच्या कामाकडेही प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, सार्वजनिक बांधकाम मंत्री तसेच संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या विषयाची गांभीर्याने दखल घेऊन रस्त्यांची कामे दर्जेदार आणि टिकाऊ पद्धतीने करण्यासाठी प्युअर डांबराचा वापर करण्याबाबत धोरणात्मक निर्णय घ्यावा, अशी नम्र विनंती श्री. सुर्यकांत पांचाळ यांनी केली आहे. दर्जेदार रस्ते निर्माण झाल्यास नागरिकांच्या दळणवळणाच्या समस्या मोठ्या प्रमाणात कमी होतील आणि सरकारी निधीचीही बचत होईल, असे त्यांनी सांगितले.
Comments
Post a Comment