मानवतावादी उपक्रमाचे उदाहरण; रोटरी क्लब ऑफ महाबळेश्वरकडून ग्रामीण रुग्णालयाला अत्याधुनिक शीत शवपेटी

मानवतावादी उपक्रमाचे उदाहरण; रोटरी क्लब ऑफ महाबळेश्वरकडून ग्रामीण रुग्णालयाला अत्याधुनिक शीत शवपेटी

✍️ प्रेषित गांधी,

महाबळेश्वर प्रतिनिधी  :

 समाजसेवा आणि मानवतावादी कार्यात नेहमीच पुढाकार घेणाऱ्या रोटरी क्लब ऑफ महाबळेश्वरच्या वतीने बेल एअर संचालित महाबळेश्वर ग्रामीण रुग्णालयाला अत्याधुनिक शीत शवपेटी प्रदान करण्यात आली आहे. या उपक्रमामुळे एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर दूरवर असलेल्या नातेवाईकांच्या येईपर्यंत मृतदेह सुरक्षित ठेवण्याची मोठी सोय उपलब्ध झाली असून या सुविधेचा प्रत्यक्ष लाभ नागरिकांना मिळू लागला आहे.

अलीकडेच एका सर्वसामान्य कुटुंबातील वृद्ध व्यक्तीचे निधन झाले होते. त्यांचे काही नातेवाईक परराज्यात असल्यामुळे त्यांना महाबळेश्वरमध्ये पोहोचण्यासाठी वेळ लागणार होता. अशा परिस्थितीत मृतदेह सुरक्षित ठेवण्याची अडचण निर्माण झाली होती. त्या वेळी ग्रामीण रुग्णालयात उपलब्ध असलेल्या या शीत शवपेटीत मृतदेह सलग ३५ तास सुरक्षित ठेवण्यात आला. त्यामुळे नातेवाईकांना वेळेत पोहोचता आले आणि दिवंगत व्यक्तीस सन्मानाने अंतिम निरोप देता आला. या घटनेमुळे या सुविधेचे महत्त्व अधोरेखित झाले आहे.

समाजातील शेवटच्या घटकापर्यंत सेवा पोहोचावी आणि व्यक्तीच्या निधनानंतरही त्यांना सन्मानपूर्वक निरोप देता यावा, या उदात्त हेतूने हा उपक्रम राबविण्यात आला आहे. अनेकदा कुटुंबीय किंवा नातेवाईक परराज्यात किंवा लांब अंतरावर असल्यामुळे मृतदेह ठेवण्याची मोठी अडचण निर्माण होते. अशा वेळी शीत शवपेटी ही अत्यंत आवश्यक सुविधा ठरते. या गरजेची जाणीव ठेवून रोटरी क्लब ऑफ महाबळेश्वरने पुढाकार घेत हा प्रकल्प साकारला.

रोटरी प्रांत ३१३२ चे सन २०२४-२५ चे प्रांतपाल रो. डॉ. सुरेशजी साबू यांच्या संकल्पना आणि पुढाकारातून कंपन्यांच्या सामाजिक उत्तरदायित्व (CSR) निधीतून हा प्रकल्प राबविण्यात आला. या माध्यमातून महाबळेश्वर तालुक्याला ही अत्याधुनिक शीत शवपेटी उपलब्ध झाली आहे. तसेच या उपकरणाची योग्य देखभाल व्हावी यासाठी पुढील काही दिवसांत रोटरी क्लबच्या वतीने व्होल्टेज स्टॅबिलायझर बसविण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.

या शीत शवपेटीच्या उपक्रमाची पार्श्वभूमी रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष रो. दिनेश भिसे यांनी स्पष्ट केली. या लोकार्पण प्रसंगी रोटरी क्लब महाबळेश्वरचे अध्यक्ष रो. विजय काळे, माजी अध्यक्ष रो. दिनेश भिसे, स्वाती भांगडिया, रमेश पल्लोड, अनंतकुमार कोमटी, मोनाली शिर्के-वाघ, शिरीष गांधी, ब्रिजभूषण सिंह, महेश कोमटी, दिलीप रिंगे आदी रोटरी सदस्य उपस्थित होते. तसेच ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. पंडित देशमुख, कार्यालयीन अधीक्षक बाजीराव आंब्राळे आणि रुग्णालयातील कर्मचारीही यावेळी उपस्थित होते.

दरम्यान, या सुविधेचा लाभ घेतलेल्या महाबळेश्वर येथील शंतनू बागडे यांनी भावना व्यक्त करत सांगितले की, “काही दिवसांपूर्वी माझ्या वडिलांचे दुःखद निधन झाले होते. मी परराज्यात असल्यामुळे मला यायला वेळ लागणार होता. मात्र रोटरीच्या वतीने ग्रामीण रुग्णालयाला देण्यात आलेल्या शवपेटीचा माझ्या वडिलांचा मृतदेह ठेवण्यासाठी उपयोग झाला आणि आम्हाला मोठा दिलासा मिळाला.”

या उपक्रमामुळे महाबळेश्वर ग्रामीण रुग्णालयात एक अत्यंत महत्त्वाची सुविधा उपलब्ध झाली असून नागरिकांकडून रोटरी क्लबच्या या सामाजिक उपक्रमाचे कौतुक केले जात आहे.

Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl