पर्यटनातून ग्रामीण युवकांना नवी संधी; ‘अर्थसहाय्य’ योजनेवर शासनस्तरावर बैठक घेण्याचे ना. शंभूराज देसाई यांचे आश्वासन
पर्यटनातून ग्रामीण युवकांना नवी संधी; ‘अर्थसहाय्य’ योजनेवर शासनस्तरावर बैठक घेण्याचे ना. शंभूराज देसाई यांचे आश्वासन
मुंबई, दि. १० मार्च :
सह्याद्रीच्या दऱ्या-खोऱ्यात पर्यटनाच्या मोठ्या संधी उपलब्ध असतानाही आर्थिक पाठबळाच्या अभावामुळे अनेक स्थानिक युवकांना पर्यटनाशी संबंधित व्यवसाय सुरू करता येत नाहीत. ही बाब लक्षात घेऊन पर्यटन क्षेत्रात स्थानिक युवकांसाठी थेट शासकीय अर्थसहाय्य योजना सुरू करावी, अशी मागणी वसुंधरा विकास संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र शेलार यांनी राज्याचे पर्यटन मंत्री ना. शंभूराज देसाई यांच्याकडे केली असून या संदर्भात शासनस्तरावर तातडीने बैठक घेण्याचे लेखी आदेश ना. देसाई यांनी दिले आहेत.
सामान्य लोकांच्या भल्यासाठी चकोरीबाहेरचे धाडसी निर्णय घेण्याची परंपरा जपणारे लोकनेते स्व. बाळासाहेब देसाई यांचा वारसा पुढे नेताना पर्यटन क्षेत्रातही अभिनव उपक्रम राबवण्याचा सकारात्मक दृष्टिकोन पर्यटन मंत्री ना. शंभूराज देसाई यांनी दाखविल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. राजेंद्र शेलार यांनी सादर केलेल्या “पर्यटनातून अभिनव प्रगती” या संकल्पनेतून ग्रामीण भागातील युवकांना पर्यटनाशी निगडित उद्योग सुरू करण्यासाठी थेट आर्थिक सहाय्य देण्याची योजना प्रस्तावित करण्यात आली आहे.
महाराष्ट्रात विशेषतः सह्याद्री पर्वतरांगांमध्ये पर्यटनासाठी अत्यंत पोषक वातावरण आहे. निसर्गरम्य डोंगरदऱ्या, धबधबे, ऐतिहासिक स्थळे आणि स्वच्छ वातावरणामुळे मुंबई, पुणे, नाशिकसारख्या मोठ्या शहरांमधील पर्यटक मोठ्या प्रमाणावर सह्याद्रीकडे आकर्षित होत आहेत. शहरांतील वाढते प्रदूषण, धकाधकीचे जीवन आणि मानसिक तणाव यामुळे लोकांना काही दिवस निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवण्याची इच्छा वाढली आहे. त्यामुळे ग्रामीण व डोंगराळ भागात पर्यटन व्यवसायाला मोठी मागणी निर्माण झाली आहे.
मात्र या पर्यटन क्षेत्रात स्थानिक लोकांची आर्थिक क्षमता मर्यादित असल्याने अनेक ठिकाणी बाहेरील धनाढ्य लोकांनी कमी किमतीत जमीन खरेदी करून मोठे पर्यटन व्यवसाय उभारले आहेत. परिणामी मूळ गावातील युवकांना रोजगाराच्या संधी कमी मिळत असून काही ठिकाणी स्थानिकांना स्थलांतर करावे लागत आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी पर्यटन क्षेत्रात थेट स्थानिकांना आर्थिक मदत देणारी योजना शासनाने सुरू करणे आवश्यक असल्याचे शेलार यांनी नमूद केले.
यापूर्वी राज्य शासनाने निटिंग-गारमेंट, यंत्रमाग, खडीक्रशर, चर्मोद्योग, फळबाग लागवड यांसारख्या विविध क्षेत्रांत लाभार्थ्यांना थेट आर्थिक सहाय्य देऊन उद्योगांना चालना दिली आहे. त्याच धर्तीवर पर्यटन क्षेत्रात मूळ जमीनमालक व स्थानिक युवकांना भांडवली सहाय्य दिल्यास होमस्टे, अॅग्रो-टुरिझम, लहान रिसॉर्ट, साहसी पर्यटन सेवा, स्थानिक खाद्य व्यवसाय अशा अनेक उद्योगांची निर्मिती होऊ शकते. त्यामुळे ग्रामीण भागातील बेरोजगारी कमी होण्यास मदत होईल तसेच शहरांकडे होणारे स्थलांतरही रोखता येईल.
राजेंद्र शेलार यांनी मांडलेल्या “पर्यटनातून अभिनव प्रगती” या संकल्पनेचा प्राथमिक अभ्यास केल्यानंतर पर्यटन मंत्री ना. शंभूराज देसाई यांनी या विषयावर सखोल चर्चा करण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विभाग, एमटीडीसी तसेच तज्ज्ञ व्यक्तींची बैठक बोलावण्याच्या सूचना आपल्या कार्यालयाला दिल्या आहेत. या बैठकीत योजनेचे स्वरूप, निधीची तरतूद, पात्रता निकष आणि अंमलबजावणीची प्रक्रिया यावर चर्चा होणार आहे.
ही योजना मंजूर झाल्यास सह्याद्रीसह ग्रामीण भागातील हजारो युवकांना पर्यटन व्यवसायात उतरून स्वावलंबी होण्याची मोठी संधी उपलब्ध होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
Comments
Post a Comment