महाबळेश्वरमध्ये जागतिक महिला दिन उत्साहात साजरा होणार; शोभायात्रा आणि ‘महाराष्ट्राची लोकधारा’ सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन
महाबळेश्वरमध्ये जागतिक महिला दिन उत्साहात साजरा होणार; शोभायात्रा आणि ‘महाराष्ट्राची लोकधारा’ सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन
महाबळेश्वर प्रतिनिधी :
जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने महाबळेश्वर गिरिस्थान नगरपरिषदेच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने सोमवार दि. ०९ मार्च २०२६ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून शहरात महिला सन्मानाचा उत्सव साजरा करण्याची जोरदार तयारी सुरू झाली आहे. महिलांचे समाजातील योगदान अधोरेखित करणे, महिला सक्षमीकरणाचा संदेश देणे आणि महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेचे दर्शन घडवणे या उद्देशाने शोभायात्रा तसेच विशेष सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत.
या कार्यक्रमाची सुरुवात दुपारी ४ वाजता भव्य शोभायात्रेने होणार आहे. ही शोभायात्रा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे चौक, पंचायत समिती महाबळेश्वर येथून प्रारंभ होऊन पोलीस परेड मैदानापर्यंत काढण्यात येणार आहे. शोभायात्रेत शहरातील विविध महिला संघटना, स्वयंसेवी संस्था, महिला बचतगट, शाळा-महाविद्यालयांतील विद्यार्थिनी तसेच नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होणार असून महिला सन्मान, समानता आणि सामाजिक प्रगतीचा संदेश देणारे फलक, घोषवाक्ये आणि सांस्कृतिक झलक यामुळे वातावरणात उत्साहाचे रंग भरले जाणार आहेत.
यानंतर सायंकाळी ६ वाजता पोलीस परेड मैदान येथे “महाराष्ट्राची लोकधारा” या विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्राच्या विविध भागांतील पारंपरिक लोकनृत्य, लोककला आणि सांस्कृतिक सादरीकरणांद्वारे राज्याच्या समृद्ध लोकपरंपरेचे दर्शन घडवले जाणार आहे. महिलांच्या सहभागातून सादर होणाऱ्या या कार्यक्रमामुळे महिला दिनाचा उत्सव अधिक रंगतदार होणार आहे.
या उपक्रमाचे आयोजन महाबळेश्वर नगरपरिषदेचे नगराध्यक्ष श्री. सुनिल लक्ष्मण शिंदे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले असून मुख्याधिकारी श्री. योगेश बाळकृष्ण पाटील, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती सौ. संगिता दत्तात्रय वाडकर तसेच उपनगराध्यक्ष श्री. नासीर युनूस मुलाणी यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाची तयारी सुरू आहे. नगरपरिषदेचे सर्व नगरसेवक, नगरसेविका तसेच अधिकारी व कर्मचारी या कार्यक्रमासाठी सहकार्य करत आहेत.
महाबळेश्वर शहरातील सर्व माता-भगिनींनी तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी आणि महिला सन्मानाचा हा उत्सव यशस्वी करावा, असे आवाहन महाबळेश्वर गिरिस्थान नगरपरिषदेच्या वतीने करण्यात आले आहे. पोलीस परेड मैदान येथे होणाऱ्या या कार्यक्रमामुळे महाबळेश्वरमध्ये जागतिक महिला दिन उत्साहात आणि सांस्कृतिक वातावरणात साजरा होणार असल्याचे चित्र दिसत आहे.
Comments
Post a Comment