डिजिटल शिक्षणाची नवी पहाट; माचुतर शाळेत संगणक कक्षाचे दिमाखात उद्घाटन

डिजिटल शिक्षणाची नवी पहाट; माचुतर शाळेत संगणक कक्षाचे दिमाखात उद्घाटन

महाबळेश्वर प्रतिनिधी : 

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत शिक्षण अधिक प्रभावी व स्पर्धात्मक बनवण्याच्या दृष्टीने जिल्हा परिषद आदर्श केंद्र शाळा माचुतर येथे सुसज्ज संगणक कक्षाचा उद्घाटन सोहळा सोमवार, दिनांक २३ मार्च २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या उपक्रमामुळे शाळेच्या शैक्षणिक विकासात एक महत्त्वाचा टप्पा गाठला गेला असून विद्यार्थ्यांसाठी डिजिटल शिक्षणाची नवी दिशा खुली झाली आहे.


शाळेच्या प्रगतीसाठी अहोरात्र झटणाऱ्या शिंदे फाउंडेशन, राधानगर माचुतर यांच्या विशेष पुढाकारातून हा महत्त्वपूर्ण उपक्रम साकार झाला. फाउंडेशनचे अध्यक्ष आदरणीय श्री डी. एल. शिंदे साहेब व त्यांच्या सहकाऱ्यांनी सातत्याने पाठपुरावा करत आदरणीय श्री रांका साहेब यांच्या सहकार्याने शाळेसाठी पाच अत्याधुनिक संगणक उपलब्ध करून दिले. यामुळे विद्यार्थ्यांना संगणकाचे मूलभूत तसेच प्रगत ज्ञान प्रत्यक्ष अनुभवातून घेता येणार आहे.

उद्घाटन प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी संगणक कक्षाचे लोकार्पण करत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यांनी आजच्या डिजिटल युगात संगणक शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करत विद्यार्थ्यांनी या सुविधेचा पुरेपूर लाभ घ्यावा, असे आवाहन केले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनीही तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मोठी स्वप्ने पाहून ती पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील राहावे, असा प्रेरणादायी संदेश देण्यात आला.

या कार्यक्रमास शाळेचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षकवृंद, पालकवर्ग, मा. सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सदस्य तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी या उपक्रमाचे मनापासून स्वागत करत शाळेच्या प्रगतीसाठी अशा प्रकारच्या सुविधा अत्यंत आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. अनेक पालकांनी आपल्या मुलांना आता गावातच आधुनिक शिक्षण मिळणार असल्याबद्दल समाधान व्यक्त केले.

कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनीही मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. संगणक कक्ष पाहून त्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि उत्सुकता स्पष्ट दिसत होती. या सुविधेमुळे त्यांच्या ज्ञानात भर पडून भविष्यातील स्पर्धात्मक परीक्षांसाठी ते अधिक सक्षम होतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शाळेच्या शिक्षकांनी सुरेखरीत्या केले, तर आभार प्रदर्शनही मनोगतपूर्ण शब्दांत करण्यात आले. संपूर्ण सोहळा शिस्तबद्ध व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

एकूणच, हा संगणक कक्ष केवळ शाळेसाठीच नव्हे तर संपूर्ण माचुतर गावासाठी अभिमानाचा क्षण ठरला असून, डिजिटल शिक्षणाच्या दिशेने टाकलेले हे पाऊल भविष्यात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मोलाचे ठरणार आहे.

Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl