'काशीनाथाच्या नावानं चांगभलं’च्या जयघोषात बावधन नगरी दुमदुमली; ऐतिहासिक बगाड यात्रा लाखो भाविकांच्या उपस्थितीत उत्साहात पार
‘काशीनाथाच्या नावानं चांगभलं’च्या जयघोषात बावधन नगरी दुमदुमली; ऐतिहासिक बगाड यात्रा लाखो भाविकांच्या उपस्थितीत उत्साहात पार
वाई प्रतिनिधी :
सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील बावधन येथे राज्यभरात प्रसिद्ध असलेली ऐतिहासिक बगाड यात्रा यंदाही लाखो भाविकांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडली. ‘काशीनाथाच्या नावानं चांगभलं’च्या जयघोषाने संपूर्ण बावधन नगरी दुमदुमून गेली होती. साडेतीनशे वर्षांची परंपरा असलेली ही अनोखी आणि थरारक यात्रा पाहण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून तसेच विविध भागांतून मोठ्या संख्येने भाविक आणि पर्यटक बावधनमध्ये दाखल झाले होते.
फाल्गुन महिन्यात भरत असलेल्या ग्रामदैवत काळभैरवनाथाच्या यात्रेला धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेचा मोठा वारसा लाभला आहे. तीन दिवस चालणाऱ्या या यात्रेत भैरवनाथाचा विवाह सोहळा, छबिना, मिरवणूक आणि बगाड हा प्रमुख आकर्षणाचा कार्यक्रम असतो. यामध्ये भाविकांनी देवाला केलेल्या नवसाची परतफेड करण्याची परंपरा शेकडो वर्षांपासून चालत आली आहे. त्यामुळे या यात्रेला भाविकांमध्ये विशेष श्रद्धा आणि भक्तिभावाने मोठे महत्त्व आहे.
या यात्रेचे मुख्य आकर्षण म्हणजे तब्बल ५० फूट उंच असलेला भव्य बगाड. गावातील ताकदवान बैलांच्या साहाय्याने हा बगाड बावधन गावातून सुमारे पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या सोनेश्वर मंदिरापर्यंत ओढला जातो. हजारो भाविकांच्या उपस्थितीत आणि जयघोषात हा थरारक सोहळा पार पडतो. बगाड पुढे सरकत असताना भाविकांचा उत्साह, ढोल-ताशांचा गजर आणि ‘काशीनाथाच्या नावानं चांगभलं’च्या घोषणांनी परिसर भक्तिमय वातावरणाने भरून जातो.
होळी पौर्णिमेच्या दिवशी मध्यरात्रीनंतर मंदिरातील पुजाऱ्यांकडून पारंपरिक पद्धतीने देवास कौल लावून बगाड ठरविण्याची प्रथा आहे. यावर्षी एकूण ६१ नवसकरी बगाड होण्यासाठी बसले होते. त्यामध्ये ३७व्या क्रमांकावर असलेल्या विठ्ठल सोपान कदम यांच्या बाजूने देवाने कौल दिल्याने यंदाच्या वर्षी त्यांना बगाड होण्याचा मान मिळाला. त्यामुळे कदम कुटुंबीयांसह गावकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
बगाडाचा रथ अत्यंत पारंपरिक आणि कौशल्यपूर्ण पद्धतीने तयार केला जातो. या रथाला दोन मोठी दगडी चाके असतात. सुमारे दहा फूट लांबीच्या कण्याला अठरा फूट उंच वाघाच्या तोंडाचा खांब जोडला जातो आणि त्यावर सुमारे चाळीस फूट उंचीचे बांबूचे शीड विशिष्ट कोनात बांधले जाते. शिडाच्या टोकाला झोपाळा असतो आणि त्यावर लोखंडी गळात बगाड्याला टांगले जाते. गावातील सुतार या रथाची बांधणी कौशल्याने करतात. त्यानंतर बैलजोडीच्या साहाय्याने हा भव्य बगाड रथ ओढला जातो.
शेकडो वर्षांची परंपरा, श्रद्धा आणि थरार यांचा संगम असलेली बावधनची बगाड यात्रा पाहण्यासाठी दरवर्षी लाखो भाविक येथे दाखल होतात. यंदाही मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात हा सोहळा पार पडला असून संपूर्ण बावधन नगरी भाविकांच्या गर्दीने आणि जयघोषाने दुमदुमून गेली होती.
Comments
Post a Comment