“जिथे प्रत्येक भिंत बोलते…!” जकातवाडीतील जागतिक काव्य महोत्सवात कवितेचा जल्लोष; ८० हून अधिक कवींचा सहभाग

“जिथे प्रत्येक भिंत बोलते…!” जकातवाडीतील जागतिक काव्य महोत्सवात कवितेचा जल्लोष; ८० हून अधिक कवींचा सहभाग

सातारा  प्रतिनिधी :

 जगातील पहिले कवितांचे गाव म्हणून ओळख निर्माण करणाऱ्या जकातवाडी (राजधानी सातारा) येथे जागतिक कविता दिनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय काव्य महोत्सव आणि साहित्य संमेलन अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. “माझं कवितांचं गाव” या संकल्पनेला साजेसा हा अनोखा उपक्रम ठरत, जकातवाडीने पुन्हा एकदा साहित्यप्रेमींचे लक्ष वेधून घेतले.

या भव्य काव्य महोत्सवात महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतून ८० हून अधिक कवी-कवयित्री सहभागी झाले होते. “जिथे प्रत्येक भिंत बोलते” या घोषवाक्याला साजेसा वातावरणनिर्माण करत संपूर्ण गाव कवितामय झाले होते. कार्यक्रमाची सुरुवात पारंपरिक दीपप्रज्वलन व सरस्वती पूजनाने करण्यात आली.

कार्यक्रमाचे उद्घाटन साताऱ्याचे नगराध्यक्ष अमोल मोहिते यांच्या हस्ते झाले. संमेलनाध्यक्ष म्हणून ज्येष्ठ साहित्यिक ह. बा. शिंदे उपस्थित होते, तर स्वागताध्यक्ष चंद्रकांत सणस यांनी मान्यवरांचे स्वागत केले. यावेळी सरपंच अश्विनी दळवी, उपसरपंच रामकृष्ण घोरपडे, वाचनालयाचे कार्यवाह नामदेव लोंढे तसेच मुख्याध्यापक विजय कणसे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

याच प्रसंगी कवितेच्या गावाच्या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. त्यामुळे या साहित्यिक चळवळीच्या वाटचालीत एक महत्त्वाचा टप्पा गाठल्याचे मानले जात आहे. उद्घाटनप्रसंगी अमोल मोहिते यांनी आपल्या मनोगतात जकातवाडी हे जगातील पहिले कवितांचे गाव असल्याचा अभिमान व्यक्त करत, या उपक्रमासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य देण्याचे आश्वासन दिले.

स्वागताध्यक्ष चंद्रकांत सणस यांनी गावकऱ्यांच्या वतीने सर्व कवी-कवयित्री आणि मान्यवरांचे मनःपूर्वक स्वागत करत, या चळवळीमागील ग्रामस्थांच्या सहभागाचे महत्त्व अधोरेखित केले. दरम्यान, ना. श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी शुभेच्छा संदेश पाठवून कवितेच्या गावाच्या उपक्रमाला शासनस्तरावरूनही सहकार्य मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.

कवितेच्या गावाचे अध्यक्ष प्रल्हाद पारटे यांनी या उपक्रमाच्या भविष्यातील दिशा स्पष्ट करताना सांगितले की, कवींच्या कविता, त्यांचा इतिहास आणि छायाचित्रे जतन करण्याचे काम हाती घेतले जाणार असून जकातवाडीला साहित्यिक पर्यटनाचे केंद्र बनवण्याचा मानस आहे. राष्ट्रीय उपाध्यक्ष विश्वास नेरकर यांनी राज्यभर शाखा विस्ताराचे नियोजन सुरू असल्याची माहिती देत, भविष्यात ही चळवळ परदेशातील मराठी भाषिकांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प व्यक्त केला.

संमेलनाध्यक्ष ह. बा. शिंदे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात कवितेच्या माध्यमातून समाजप्रबोधनाचे कार्य अधिक प्रभावीपणे होण्याची गरज अधोरेखित केली. कवींनी आपल्या लेखनाचा दर्जा उंचावून समाजाशी अधिक जवळीक साधावी, असे त्यांनी आवाहन केले.

यानंतर रंगलेल्या कवी संमेलनात ग्रामीण जीवन, निसर्ग, सामाजिक प्रश्न, स्त्रीशक्ती, देशभक्ती अशा विविध विषयांवर आधारित कविता सादर करण्यात आल्या. प्रत्येक सादरीकरणाला उपस्थित रसिकांकडून उत्स्फूर्त दाद मिळत संपूर्ण वातावरण कवितामय झाले. याच वेळी विविध जिल्ह्यांतील शाखांच्या पदग्रहणाचा कार्यक्रमही उत्साहात पार पडला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लीना पोटे, संदीप रासकर आणि राजेंद्र पाटील यांनी प्रभावीपणे केले. आयोजन समितीतील विश्वास नेरकर, सुषमा आलेकरी, वसंत शिंदे, अनिता भोसले, प्रज्ञा रोकडे, वैशाली पारटे आदींनी उत्कृष्ट नियोजन करून कार्यक्रम यशस्वी केला. तसेच शैलेश महाडिक, वैष्णवी पारटे, रविराज चव्हाण, राहुल दौंडे, ओवी पारटे, गीताबाई पारटे आदींनी विशेष परिश्रम घेतले.

हा संपूर्ण कार्यक्रम विद्या वर्धिनी सार्वजनिक ग्राम वाचनालयात पार पडला. यावेळी वाचक, ग्रामस्थ आणि साहित्यप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी आयोजकांनी सर्व सहभागी कवी-कवयित्री, मान्यवर आणि सहकार्य करणाऱ्यांचे आभार मानले.

जकातवाडी येथे पार पडलेला हा काव्य महोत्सव केवळ एक साहित्यिक कार्यक्रम न राहता, मराठी कवितेला जागतिक स्तरावर नेणाऱ्या चळवळीची नांदी ठरला असून भविष्यात अशा अनेक उपक्रमांची उभारणी होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl