इटलीस्थित उद्योजक चंदन चव्हाण यांची समाजसेवेची अनोखी पहल; ५० गावांमध्ये सौर पथदिव्यांचे विनामूल्य वाटप
इटलीस्थित उद्योजक चंदन चव्हाण यांची समाजसेवेची अनोखी पहल; ५० गावांमध्ये सौर पथदिव्यांचे विनामूल्य वाटप
✍️जितेंद्र कारंडे,
कुंभरोशी प्रतिनिधी :
जावली तालुक्यातील दाभे मोहन गावचे सुपुत्र आणि सध्या इटलीमध्ये स्थायिक असलेले यशस्वी उद्योजक चंदन सुनीता राजाराम चव्हाण (चंदनदादा) यांनी आपल्या मातृभूमीशी असलेले नाते जपत ग्रामीण विकासासाठी सुरू केलेला सौर पथदिवे वाटपाचा उपक्रम सध्या प्रेरणादायी ठरत आहे. परदेशात स्थायिक असूनही गावाविषयीची आपुलकी आणि समाजसेवेची प्रामाणिक भावना जपत त्यांनी मागील काही वर्षांपासून ग्रामीण भागात विविध लोककल्याणकारी उपक्रम राबवले असून त्याचा लाभ अनेक गावांना होत आहे.
ग्रामीण भागात प्रकाशाची सोय, नागरिकांची सुरक्षितता आणि पर्यावरणपूरक ऊर्जेचा वापर वाढावा या उद्देशाने चंदन चव्हाण यांच्या प्रेरणेतून आधुनिक सौर पथदिव्यांचे विनामूल्य वितरण करण्याचा महत्वाकांक्षी उपक्रम राबविण्यात येत आहे. विशेष म्हणजे हा उपक्रम पूर्णपणे विनामूल्य असून ग्रामीण भागातील रस्ते, वाड्या-वस्त्या आणि सार्वजनिक ठिकाणी प्रकाशाची सोय व्हावी यासाठी या सौर दिव्यांचे वाटप केले जात आहे.
या उपक्रमांतर्गत आतापर्यंत जावली तालुक्यातील सुमारे ४० ते ५० गावांमध्ये ४०० ते ४५० हून अधिक आधुनिक सौर पथदिव्यांचे यशस्वीरित्या वितरण करण्यात आले आहे. या उपक्रमामुळे अनेक गावांतील अंधारमय रस्ते प्रकाशमान झाले असून नागरिकांच्या सुरक्षिततेतही मोठी भर पडली आहे. त्यामुळे चंदन चव्हाण यांचे कार्य ग्रामीण भागासाठी आदर्श ठरत असल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
दरवर्षीप्रमाणेच यावर्षीही सन २०२६ साठी या उपक्रमाचा पुढील टप्पा राबविण्यात येत असून दाभे दाभेकर, घोणसपूर, गोरोशी, येरणे खुर्द, दरे (जावली), जावली, दुधोशी, खेतेश्वर देवालय पारूट आणि महारोळे या गावांना आधुनिक सौर पथदिव्यांचे वाटप करण्यात येणार आहे. संबंधित गावांच्या प्रतिनिधींनी १ एप्रिल ते १५ एप्रिल २०२६ या कालावधीत दाभे मोहन येथून सौर पथदिवे घेऊन जाण्याची व्यवस्था करावी, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
परदेशात यशस्वी व्यवसाय करत असतानाही आपल्या गावाच्या विकासासाठी पुढाकार घेणाऱ्या चंदन चव्हाण यांच्या या सामाजिक उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत असून ग्रामीण विकासाच्या दिशेने हे एक महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात आहे. या उपक्रमाबाबत अधिक माहितीसाठी दाभे मोहन येथील श्री. शैलेश शिंदे यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Comments
Post a Comment