भव्य इफ्तार समारंभातून महाबळेश्वरात ऐक्याचा संदेश; विविध धर्मीय बांधवांची उत्स्फूर्त उपस्थिती
भव्य इफ्तार समारंभातून महाबळेश्वरात ऐक्याचा संदेश; विविध धर्मीय बांधवांची उत्स्फूर्त उपस्थिती
✍️मिलिंद काळे,
महाबळेश्वर प्रतिनिधी:
पवित्र रमजान महिन्यानिमित्त रोजा सोडण्याच्या (इफ्तार) पार्श्वभूमीवर महाबळेश्वर शहरात सामाजिक ऐक्य, बंधुभाव आणि धार्मिक सौहार्दाचे प्रेरणादायी चित्र पाहायला मिळाले. महाबळेश्वर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या प्रशस्त आवारात आयोजित करण्यात आलेल्या भव्य इफ्तार समारंभाने शहरात एकतेचा आणि मानवतेचा सुंदर संदेश दिला.
या इफ्तार कार्यक्रमाला नगराध्यक्ष युसूफभाई शेख, डी. एम. बावळेकर, बँकेचे शाखा अधिकारी फकीरभाई वालगे यांच्यासह नवनिर्वाचित नगरसेवक, बँकेचे संचालक मंडळ, ठेवीदार, सभासद, टॅक्सी युनियनचे सदस्य तसेच पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी चंद्रकांत बावळेकर, समीर सुतार, शरद बावळेकर, नदीम शरवान, अनिल साळुंखे, प्रशांत कात्रत, उषा ओंबळे, सतीश ओंबळे, जावेद वालगे, मनीषा पार्ठे, माजी उपनगराध्यक्ष अफझलभाई सुतार, नगरसेवक राहुल पिसाळ, रोहित ढेबे, मिलिंद ढेबे, तोफिक पटवेकर, टॅक्सी युनियनचे दादाभाई मानकर, अक्षय वायदंडे, इमामभाई नालबंद, राजूभाई पन्हाकर, वृषाली डोईफोडे, राजाभाऊ गुजर, भाऊ कुंभारदरे, शंकर ढेबे तसेच बँकेचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित राहिले. विविध क्षेत्रांतील मान्यवर एकत्र आल्याने कार्यक्रमाला विशेष प्रतिष्ठा लाभली.
कार्यक्रमाची सुरुवात सायंकाळच्या अजानने झाली. त्यानंतर दुवा पठण करण्यात आले आणि सूर्यास्तानंतर सर्वांनी एकत्र येत पारंपरिक पद्धतीने खजूर खाऊन व पाणी पिऊन रोजा सोडला. यानंतर उपस्थितांनी एकमेकांना रमजानच्या शुभेच्छा देत बंधुभाव आणि एकतेचा संदेश दिला.
यावेळी रमजान महिन्याचे धार्मिक, सामाजिक आणि मानवी मूल्य अधोरेखित करण्यात आले. इस्लाम धर्मात रमजान हा कुरआन अवतरित झाल्याचा पवित्र महिना मानला जातो. या काळात मुस्लिम बांधव रोजा पाळून आत्मशुद्धी, संयम, शिस्त आणि ईश्वरभक्तीचा अनुभव घेतात. सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत अन्न-पाण्याचा त्याग करून आत्मपरीक्षण आणि आध्यात्मिक साधनेवर भर दिला जातो.
रमजान महिन्यात ‘जकात’ आणि ‘फित्रा’ या दानधर्मालाही विशेष महत्त्व असून समाजातील गरीब, गरजू आणि वंचित घटकांना मदत करून सामाजिक समतोल राखण्याचा संदेश दिला जातो. त्यामुळे रमजान हा केवळ उपवासाचा महिना नसून सामाजिक बांधिलकी जपणारा आणि मानवतेचा सण म्हणून ओळखला जातो.
रमजानच्या अखेरीस साजरी होणारी ‘ईद-उल-फितर’ ही आनंद, समाधान आणि कृतज्ञतेची पर्वणी असते. या दिवशी सकाळी विशेष नमाज अदा करून नवीन वस्त्रे परिधान केली जातात आणि “ईद मुबारक”च्या शुभेच्छा देत एकमेकांना आलिंगन दिले जाते. घराघरात शीरखुर्मा, सेवई यांसारखे गोड पदार्थ तयार करून आनंद साजरा केला जातो.
इफ्तार पार्टीच्या निमित्ताने विविध धर्मीय बांधव एकत्र आल्याने “एकतेत शक्ती” हा संदेश अधिक दृढ झाल्याचे स्पष्ट दिसून आले. सध्याच्या सामाजिक परिस्थितीत अशा कार्यक्रमांची आवश्यकता अधिक असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.
आयोजकांच्या वतीने सर्व उपस्थितांचे मनापासून स्वागत करण्यात आले. इफ्तारसाठी खजूर, फळे, शरबत, फराळ तसेच विविध स्वादिष्ट खाद्यपदार्थांची उत्कृष्ट व्यवस्था करण्यात आली होती. कार्यक्रमाचे नियोजन अत्यंत शिस्तबद्ध आणि प्रभावी पद्धतीने करण्यात आल्याने उपस्थितांनी आयोजकांचे कौतुक केले.
या उपक्रमातून बँकेची सामाजिक बांधिलकी अधोरेखित झाली. आर्थिक व्यवहारापुरते मर्यादित न राहता समाजातील विविध घटकांना एकत्र आणणे, एकात्मतेचा संदेश देणे आणि सामाजिक सलोखा जपणे ही जबाबदारी बँकेने समर्थपणे पार पाडल्याचे यावेळी दिसून आले. एकूणच, या भव्य इफ्तार समारंभामुळे महाबळेश्वर शहरात ऐक्य, बंधुभाव आणि धार्मिक सौहार्दाचा आदर्श निर्माण झाला असून भविष्यातही अशा उपक्रमांमधून समाजातील एकोपा अधिक दृढ होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
Comments
Post a Comment