लाखवडमध्ये ‘ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण’ व अखंड हरिनाम सप्ताहाचा भव्य सुवर्णमहोत्सव
लाखवडमध्ये ‘ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण’ व अखंड हरिनाम सप्ताहाचा भव्य सुवर्णमहोत्सव
महाबळेश्वर प्रतिनिधी :
तालुक्यातील मौजे लाखवड येथे ग्रामस्थ मंडळ व समस्त भाविक भक्तांच्या वतीने ‘ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व अखंड हरिनाम सप्ताह’ याचा यंदा ५० वा भव्य सुवर्ण महोत्सवी सोहळा २१ मार्च ते २८ मार्च २०२६ या कालावधीत मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आला आहे. अखिलकोट ब्रम्हांडनायक श्री पांडुरंगाच्या कृपेने व साधुसंतांच्या आशीर्वादाने होत असलेल्या या सोहळ्यामुळे संपूर्ण परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे.
या सोहळ्याचे औचित्य विशेष ठरले असून अयोध्याधीश भगवान श्री प्रभू राम जन्मोत्सव, संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांचे ७५१ वे जन्मोत्सवी वर्ष, संत नामदेव महाराज यांच्या षष्ट शतकोत्तर समाधी वर्षाचे स्मरण तसेच जगद्गुरु तुकोबाराय यांच्या त्रिशतकोत्तर वैकुंठ गमन अमृत महोत्सवी वर्षानिमित्त हा सप्ताह साजरा होत आहे. वै. ह.भ.प. हरिभाऊ गुरुजी यांच्या कृपा आशीर्वादाने तसेच ह.भ.प. धोंडीराम महाराज संकपाळ व ह.भ.प. अशोक महाराज संकपाळ यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा पार पडत आहे.
सप्ताहातील दैनंदिन कार्यक्रमांची रूपरेषा अत्यंत समृद्ध असून पहाटे काकड आरतीने दिवसाची सुरुवात होत आहे. त्यानंतर विष्णुसहस्त्रनाम, सामुदायिक ज्ञानेश्वरी पारायण, गाथा भजन, संतपंगत, रामकथा, हरिपाठ, हरिकिर्तन व जागर भजन अशा विविध धार्मिक कार्यक्रमांनी वातावरण भारावून जात आहे. रामायणाचार्य ह.भ.प. गजानन महाराज मुके शास्त्री यांच्या रामकथेला विशेष प्रतिसाद लाभत आहे.
दररोज नामवंत कीर्तनकारांची उपस्थिती लाभणार असून ह.भ.प. आनंद महाराज मिस्त्री, श्रीगुरु ह.भ.प. कान्होवा महाराज देहूकर, ह.भ.प. आत्मारामजी महाराज कुठे शास्त्री, ह.भ.प. उमेश महाराज, ह.भ.प. राहुल महाराज इंदापूरकर, ह.भ.प. संतवीर महाराज कराडकर, ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज नामदास, ह.भ.प. एकनाथ महाराज तसेच ह.भ.प. गणेश महाराज जगताप यांचे कीर्तन होणार आहे. विविध दिवसांसाठी स्थानिक भाविकांनी सौजन्य स्वीकारून या कार्यक्रमास हातभार लावला आहे.
यंदाच्या सुवर्णमहोत्सवी सोहळ्यात विशेष आकर्षण म्हणून महिलांसाठी ‘सन्मान नारी शक्तीचा, खेळ रंगला पैठणीचा’ हा हळदी-कुंकू समारंभ २६ मार्च रोजी दुपारी आयोजित करण्यात आला आहे. तसेच गावातील पदवीधर युवक-युवतींचा गुणगौरव सोहळा २७ मार्च रोजी पार पडणार असून ‘होम मिनिस्टर’ हा उपक्रमही आयोजित करण्यात आला आहे. २७ मार्च रोजी ‘अपरिचित शिवराय’ या विषयावर प्रा. रविंद्र उखा पाटील यांचे व्याख्यान हा कार्यक्रमाचा आणखी एक विशेष आकर्षण ठरणार आहे.
आठवडाभर चालणाऱ्या या धार्मिक सोहळ्याचा समारोप २८ मार्च रोजी काला कीर्तनाने होणार असून भाविकांच्या उपस्थितीत भक्तीमय वातावरणात सांगता केली जाणार आहे. या सोहळ्यासाठी ग्रामस्थ मंडळ लाखवड यांनी सर्व भाविकांना उपस्थित राहण्याचे आवाहन केले असून मोठ्या संख्येने भक्त सहभागी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
Comments
Post a Comment