पंचगणीमध्ये ‘झिरो वेस्ट’ची चळवळ : नगरपरिषदेच्या कार्यशाळेत शाळा व हॉटेल्सना पर्यावरणपूरक कचरा व्यवस्थापनाचे धडे

पंचगणीमध्ये ‘झिरो वेस्ट’ची चळवळ : नगरपरिषदेच्या कार्यशाळेत शाळा व हॉटेल्सना पर्यावरणपूरक कचरा व्यवस्थापनाचे धडे

पंचगणी  प्रतिनिधी : 

निसर्गरम्य पर्यटनस्थळ म्हणून ओळख असलेल्या पंचगणी शहरात पर्यावरण संवर्धन आणि स्वच्छतेला प्राधान्य देत पंचगणी गिरिस्थान नगरपरिषदेच्या वतीने ‘झिरो वेस्ट कॅम्पस’ संकल्पना आणि नवीन घनकचरा व्यवस्थापन नियम २०२६ या विषयांवर विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. हिलदारीच्या सहकार्याने नगरपरिषद सभागृहात पार पडलेल्या या कार्यशाळेत शहर स्वच्छ आणि पर्यावरणपूरक ठेवण्यासाठी प्रशासनाबरोबरच नागरिक, शाळा, हॉटेल व्यावसायिक आणि विविध संस्थांनी एकत्रितपणे पुढाकार घेण्याचे आवाहन करण्यात आले.

या कार्यशाळेचे उद्घाटन पंचगणी नगरपरिषदेचे अध्यक्ष दिलीप भाऊ बागडे, शेखर कसुर्डे, आरोग्य सभापती राजश्री सणस तसेच नगरसेवकांच्या उपस्थितीत झाले. या उपक्रमासाठी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी पंडित पाटील यांचे मार्गदर्शन लाभले असून पालिकेचे अधिकारी व कर्मचारी यांचेही मोलाचे सहकार्य लाभले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी शेखर कसुर्डे यांनी घनकचरा व्यवस्थापनाचे महत्त्व स्पष्ट करत पंचगणीसारख्या पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील शहरात कचरा व्यवस्थापनाची जबाबदारी केवळ प्रशासनाची नसून नागरिक, शाळा, हॉटेल व्यावसायिक आणि पर्यटनाशी संबंधित सर्व घटकांची असल्याचे नमूद केले. शहर स्वच्छ आणि पर्यावरणपूरक ठेवण्यासाठी सर्वांनी सक्रिय सहभाग नोंदविण्याची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली.

कार्यशाळेच्या पहिल्या सत्रात आशिष वैष्णव यांनी कोरडा कचरा तसेच बागेतील कचऱ्यापासून पेललेटिंग तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ऊर्जा आणि विविध उपयुक्त उत्पादने कशी तयार करता येतात याबाबत सविस्तर माहिती दिली. कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन केल्यास तो पर्यावरणासाठी समस्या न ठरता संसाधन ठरू शकतो, असे त्यांनी सांगितले.

दुसऱ्या सत्रात कॅप्टन राहुल (नारी केअर) यांनी सॅनिटरी पॅडमुळे निर्माण होणाऱ्या पर्यावरणीय समस्यांवर प्रकाश टाकत त्यावरील पर्यावरणपूरक पर्याय आणि उपाययोजनांची माहिती दिली. महिलांच्या आरोग्याबरोबरच पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी पर्यावरणपूरक पर्याय स्वीकारणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

यानंतर हिलदारीचे डॉ. मुकेश कुलकर्णी यांनी ‘झिरो वेस्ट कॅम्पस’ संकल्पनेचे सविस्तर मार्गदर्शन केले. शाळा, हॉटेल्स आणि इतर संस्थांनी कचऱ्याचे स्त्रोतावरच वर्गीकरण करणे, पुनर्वापराला प्रोत्साहन देणे आणि स्थानिक पातळीवर कचऱ्यावर प्रक्रिया करणे या उपाययोजनांद्वारे कचरा निर्मिती मोठ्या प्रमाणात कमी करता येते, असे त्यांनी सांगितले. तसेच १ एप्रिल २०२६ पासून लागू होणाऱ्या नवीन घनकचरा व्यवस्थापन नियम २०२६ मधील महत्त्वाच्या तरतुदी आणि विविध घटकांवरील जबाबदाऱ्या यांची माहितीही त्यांनी उपस्थितांना दिली. ‘झिरो वेस्ट कॅम्पस’ संकल्पना प्रभावीपणे राबविणाऱ्या शाळा व संस्थांचा पर्यावरण दिनानिमित्त विशेष सन्मान करण्यात येणार असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.

या कार्यशाळेत पंचगणीतील विविध शाळा आणि हॉटेल्समधील ५० हून अधिक प्रतिनिधींनी सहभाग घेतला. सर्व सत्रांना सहभागींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून अनेक शाळा व हॉटेल्सनी आपले कॅम्पस ‘झिरो वेस्ट’ करण्यासाठी पुढाकार घेण्याची तयारी दर्शवली.

पंचगणी गिरिस्थान नगरपरिषदेमार्फत हिलदारीच्या सहकार्याने नवीन घनकचरा व्यवस्थापन नियम २०२६ बाबत जनजागृती करण्यासाठी आणि मोठ्या प्रमाणावर कचरा निर्माण करणाऱ्या संस्थांना शाश्वत कचरा व्यवस्थापनासाठी प्रोत्साहित करण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला. पंचगणीसारख्या निसर्गसंपन्न आणि पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील शहरात अशा उपक्रमांची नितांत गरज असून यामुळे शहराचे नैसर्गिक सौंदर्य जपत शाश्वत विकासाचा मार्गही सुकर होणार असल्याचे मत सहभागी प्रतिनिधींनी व्यक्त केले.

Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl