राज्यस्तरीय आदर्श ग्रामपंचायत अधिकारी पुरस्काराने शंकरराव चिकटूळ यांचा गौरव
राज्यस्तरीय आदर्श ग्रामपंचायत अधिकारी पुरस्काराने शंकरराव चिकटूळ यांचा गौरव
पुणे प्रतिनिधी :
महाराष्ट्र शासनाच्या वतीने देण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय आदर्श ग्रामपंचायत अधिकारी व गुणवंत कर्मचारी पुरस्काराने महाबळेश्वर पंचायत समितीशी दीर्घकाळ कार्यरत असलेले ग्रामपंचायत अधिकारी शंकरराव चिकटूळ यांचा सन्मान करण्यात आला. पुणे येथील कृषी महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित राज्यस्तरीय कार्यक्रमात हा गौरव प्रदान करण्यात आला. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते तसेच खासदार मेधा कुलकर्णी, अभिनेत्री शिवाली परब, आमदार शंकर माडेंकर, आमदार बापूसाहेब पाठारे, अपर आयुक्त नितीन माने आणि मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
शंकरराव चिकटूळ यांनी महाबळेश्वर पंचायत समितीत एकूण एकोणीस वर्षे सहा महिने सेवा बजावली असून सध्या ते वाई पंचायत समितीकडे कार्यरत आहेत. ग्रामपंचायत अधिकारी संवर्गातील अभ्यासू नेतृत्व, संघटनात्मक कार्य आणि प्रशासनातील पारदर्शकतेमुळे त्यांची ओळख राज्यभर निर्माण झाली आहे. २००५ च्या बॅचचे ते प्रमुख शिलेदार मानले जातात तसेच ग्रामपंचायत अधिकारी संघटनेचे माजी अध्यक्ष म्हणूनही त्यांनी प्रभावी काम केले आहे.
सेवाकाळात त्यांनी ग्रामपंचायतींना विविध विकासात्मक उपक्रमांमध्ये पुढे नेण्यासाठी मोठे योगदान दिले. निर्मल ग्राम पुरस्कारापासून सुरुवात करून स्वच्छ ग्राम, स्मार्ट ग्राम, आयएसओ ग्राम, दीनदयाळ पंचायत पुरस्कार तसेच पर्यावरण ग्राम अशा अनेक सन्मान मिळवून देण्यात त्यांनी मोलाची भूमिका बजावली. पंचायत राज समितीनेही त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांचा गौरव केला आहे. ग्रामपंचायतींचा कारभार पारदर्शक आणि अभ्यासू पद्धतीने चालविणे तसेच संबंधित ग्रामपंचायतींना विकासाच्या आघाडीवर ठेवण्याचे कौशल्य त्यांच्यात असल्याचे सहकाऱ्यांनी नमूद केले आहे.
आत्तापर्यंत वैयक्तिक स्तरावर जिल्हा आणि विभागीय पातळीवरील सुमारे चाळीसहून अधिक पुरस्कार त्यांनी मिळवले आहेत. विविध संस्थांनीही त्यांच्या कार्याची दखल घेत सन्मानित केले आहे. राज्यस्तरीय आदर्श ग्रामपंचायत अधिकारी पुरस्कार स्वीकारताना त्यांनी हा सन्मान आपल्या आई, पत्नी आणि मुलगी संस्कृती यांना समर्पित केल्याचे सांगितले. महिला दिनाच्या पूर्वसंध्येला पार पडलेल्या या कार्यक्रमाला राज्यभरातील अधिकारी, कर्मचारी आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या पुरस्कारामुळे महाबळेश्वर आणि वाई तालुक्याचे नाव राज्यभर उज्ज्वल झाल्याची भावना विविध स्तरांतून व्यक्त करण्यात येत आहे.
Comments
Post a Comment