मनसेच्या इशाऱ्यानंतर प्रशासनाची धावपळ; आर्थरसीट–केट्स पॉईंट मार्गावर चार ठिकाणी दुरुस्तीची कामे सुरू

मनसेच्या इशाऱ्यानंतर प्रशासनाची धावपळ; आर्थरसीट–केट्स पॉईंट मार्गावर चार ठिकाणी दुरुस्तीची कामे सुरू

महाबळेश्वर प्रतिनिधी :

 महाबळेश्वर तालुक्यातील आर्थरसीट पॉईंट रोड तसेच नार्किंदा ते केट्स पॉईंट या महत्त्वाच्या पर्यटन मार्गांच्या निकृष्ट दर्जाच्या कामाबाबत मनसेकडून तीव्र आक्षेप घेत आंदोलनाचा इशारा देण्यात आल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने अखेर हालचाल करत संबंधित मार्गांवर दुरुस्तीची कामे सुरू केली आहेत. मंगळवारी या मार्गावर चार ठिकाणी एकाच वेळी कामांची सुरुवात करण्यात आली असून मोठ्या प्रमाणात यंत्रसामग्री घटनास्थळी दाखल करण्यात आली आहे.

एप्रिल २०२५ मध्ये सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत आर्थरसीट पॉईंट रोड तसेच नार्किंदा ते केट्स पॉईंट मार्गाचे डांबरीकरण व दुरुस्तीचे काम करण्यात आले होते. मात्र अवघ्या वर्षभराच्या आतच या रस्त्यांची अवस्था अत्यंत खराब झाली होती. रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले होते तसेच डांबराचा थर उखडल्याने वाहनचालकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महाबळेश्वर तालुका अध्यक्ष राजेंद्र (आप्पा) बावळेकर यांनी उपविभागीय अभियंत्यांना निवेदन देत कामाच्या दर्जाबाबत चौकशी करून कायमस्वरूपी दुरुस्ती करण्याची मागणी केली होती. तसेच वेळेत कारवाई न झाल्यास मनसे स्टाईलने आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला होता.

या इशाऱ्यानंतर प्रशासनाने तत्काळ दखल घेत संबंधित मार्गांची पाहणी केली आणि मंगळवारी सकाळपासून दुरुस्तीची कामे सुरू करण्यात आली. सध्या चार ठिकाणी मोठ्या प्रमाणात मशिनरी, रोलर, डांबर मिक्सिंग यंत्रणा आणि कामगारांच्या मदतीने रस्त्याचे पॅचवर्क तसेच दुरुस्तीची कामे वेगाने सुरू आहेत.

महाबळेश्वर हे राज्यातील एक प्रमुख पर्यटन स्थळ असल्याने येथे देश-विदेशातून मोठ्या संख्येने पर्यटक येत असतात. आर्थरसीट, केट्स पॉईंट यांसारख्या प्रसिद्ध पर्यटनस्थळांकडे जाणाऱ्या रस्त्यांची अवस्था खराब झाल्यामुळे पर्यटकांकडून नाराजी व्यक्त होत होती. नुकत्याच झालेल्या ‘महाबळेश्वर बाईक वीक’ कार्यक्रमादरम्यानही सहभागी रायडर्सनी या रस्त्यांच्या स्थितीबाबत नाराजी व्यक्त केल्याचे समोर आले होते.

दरम्यान, सध्या सुरू करण्यात आलेली कामे दर्जेदार आणि कायमस्वरूपी स्वरूपाची व्हावीत, तसेच यापुढे अशा प्रकारची निकृष्ट कामे होऊ नयेत, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे. प्रशासनाने तातडीने कामे सुरू केल्यामुळे काही प्रमाणात दिलासा मिळाला असला तरी संबंधित कामांची गुणवत्ता आणि पूर्णत्वाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl