गिरिस्थान प्रशालेत विद्यार्थ्यांसाठी कराटे, झुंबा व योगा प्रशिक्षणाचा उपक्रम; स्मार्ट शिक्षणासाठी ‘अलेक्सा डॉल’ची भेट
गिरिस्थान प्रशालेत विद्यार्थ्यांसाठी कराटे, झुंबा व योगा प्रशिक्षणाचा उपक्रम; स्मार्ट शिक्षणासाठी ‘अलेक्सा डॉल’ची भेट
✍️मिलिंद काळे,
महाबळेश्वर प्रतिनिधी :
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शारीरिक तंदुरुस्ती आणि आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्याच्या उद्देशाने इनर व्हील क्लब ऑफ महाबळेश्वरच्या वतीने गिरिस्थान प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी कराटे, झुंबा आणि योगा या विशेष प्रशिक्षण वर्गांचे आयोजन करण्यात आले. इनर व्हील क्लबच्या अध्यक्षा वर्षा संतोष पार्टे यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आलेला हा उपक्रम नगराध्यक्ष सुनील शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत गिरिस्थान प्रशालेच्या प्रांगणात पार पडला. या प्रशिक्षण वर्गांचे आयोजन पुढील तीन महिने नियमितपणे सुरू राहणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
कार्यक्रमाची सुरुवात नगराध्यक्ष सुनील शिंदे आणि मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आली. यावेळी इनर व्हील क्लबच्या वतीने उपस्थित मान्यवरांचे स्वागत व सत्कार करण्यात आला. कार्यक्रमादरम्यान कराटे प्रशिक्षक संजय पार्टे यांनी विद्यार्थ्यांना दिलेल्या शास्त्रशुद्ध कराटे प्रशिक्षणाचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. विशेषतः मुलींचा या प्रशिक्षण वर्गात उत्स्फूर्त सहभाग दिसून आला. आत्मसंरक्षणाची जाणीव आणि आत्मविश्वास वाढविण्यासाठी कराटे प्रशिक्षण उपयुक्त ठरत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
यानंतर झुंबा आणि योगा प्रशिक्षक अश्विनी कोमटी यांनी झुंबा नृत्याचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. लॅटिन अमेरिकन संगीतावर आधारित झुंबा नृत्यामुळे शरीर तंदुरुस्त राहते, ताण कमी होतो आणि आनंदी वातावरण तयार होते, असे त्यांनी नमूद केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी झुंबा नृत्यात उत्साहाने सहभाग घेतला. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना नियमित योगा प्रशिक्षण देखील दिले जात असून त्याचा त्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर सकारात्मक परिणाम होणार असल्याचे सांगण्यात आले.
या प्रसंगी इनर व्हील क्लबच्या वतीने गिरिस्थान प्रशालेसाठी आधुनिक स्मार्ट शिक्षण साधन म्हणून कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानावर आधारित ‘अलेक्सा डॉल’ भेट देण्यात आली. ही डॉल विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना तत्काळ उत्तरे देणे, गोष्टी सांगणे, कविता, गणिती उदाहरणे, सामान्य ज्ञान व शब्दार्थ याबाबत माहिती देणे अशा विविध प्रकारे विद्यार्थ्यांना मदत करू शकते. तसेच इंग्रजी उच्चार सुधारण्यासाठी, नवीन शब्द शिकण्यासाठी आणि संवाद कौशल्य विकसित करण्यासाठीही ती उपयुक्त ठरणार आहे. लहान वर्गातील विद्यार्थ्यांसाठी गोष्टी, गाणी आणि तालबद्ध कविता यामुळे शिकण्याची प्रक्रिया अधिक आनंददायी होईल, असा विश्वास इनर व्हील क्लबच्या सदस्य सपना अरोरा यांनी व्यक्त केला. ही ‘अलेक्सा डॉल’ गिरिस्थान प्रशालेचे मुख्याध्यापक पी. आर. माने यांच्याकडे सुपूर्त करण्यात आली.
इनर व्हील क्लबच्या अध्यक्षा वर्षा पार्टे यांनी या उपक्रमामागील उद्देश स्पष्ट करताना विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा प्रकारचे उपक्रम आवश्यक असल्याचे सांगितले. तसेच पालिकेच्या माध्यमातून शहरातील सर्व शाळांमध्ये अशा प्रकारचे प्रशिक्षण वर्ग सुरू करण्यात यावेत, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. शिक्षण सभापती रोहित ढेबे यांनीही नगरपालिकेच्या वतीने विद्यार्थ्यांना अधिकाधिक सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले आणि नगराध्यक्ष सुनील शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शहरातील सर्व शाळांचा दर्जा उंचावण्यासाठी सातत्याने काम सुरू असल्याचे नमूद केले.
या कार्यक्रमाला नगराध्यक्ष सुनील शिंदे, शिक्षण सभापती रोहित ढेबे, विमलताई पार्टे, अॅड. संजय जंगम, इनर व्हील अध्यक्षा वर्षा संतोष पार्टे, शरद बावळेकर, पीडीसी रोहिणी वैद्य, वाईस प्रेसिडेंट मुक्ता कोमटी, सेक्रेटरी सपना अरोरा, सविता पल्लोड, अदिती भांगडिया, वंदना पल्लोड, शुभांगी खुरासणे, लक्ष्मी येरलगड्डा, नेहा साळवी, वर्षा कोमटी, कराटे प्रशिक्षक संजय पार्टे, झुंबा व योगा प्रशिक्षक अश्विनी कोमटी यांच्यासह इनर व्हील क्लबचे सदस्य, शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिषेक साळुंखे यांनी केले, तर आभार प्रा. सुधाकर शिंदे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी इनर व्हील क्लबच्या सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.
Comments
Post a Comment