युद्धाच्या पार्श्वभूमीवर साताऱ्यात इंधन-गॅस मुबलक; अफवांपासून सावध राहण्याचे प्रशासनाचे आवाहन
युद्धाच्या पार्श्वभूमीवर साताऱ्यात इंधन-गॅस मुबलक; अफवांपासून सावध राहण्याचे प्रशासनाचे आवाहन
सातारा प्रतिनिधी :
मध्यपूर्व आशियात सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर इंधन आणि घरगुती गॅस टंचाईबाबत विविध अफवा पसरत असताना सातारा जिल्ह्यात पेट्रोल, डिझेल तसेच घरगुती एलपीजी गॅसचा पुरेसा साठा उपलब्ध असून नागरिकांनी घाबरून अनावश्यक खरेदी किंवा गर्दी करू नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. जिल्ह्यातील पुरवठा व्यवस्था सुरळीत असून कोणत्याही प्रकारची टंचाई निर्माण होणार नाही, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयातील पुरवठा शाखेमार्फत आज (दि. १० मार्च) भारत पेट्रोलियम (BPCL), हिंदुस्थान पेट्रोलियम (HPCL) आणि इंडियन ऑइल (IOCL) या तीन प्रमुख इंधन कंपन्यांच्या विक्री अधिकाऱ्यांसह जिल्ह्यातील गॅस एजन्सी व पेट्रोल पंप वितरकांची विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत जिल्ह्यातील पेट्रोल, डिझेल आणि घरगुती एलपीजी गॅसचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याची माहिती संबंधित वितरकांनी दिली. तसेच जिल्ह्यातील सर्व भागात नियमित आणि सुरळीत पुरवठा सुरू राहील, अशी ग्वाहीही देण्यात आली.
दरम्यान, गॅस कंपन्यांनी घरगुती एलपीजी सिलेंडरचे ऑनलाईन बुकिंग बंधनकारक केले असून पहिला सिलेंडर घेतल्यानंतर २६ दिवस पूर्ण झाल्यानंतरच दुसऱ्या सिलेंडरचे बुकिंग करता येईल, अशी प्रणाली लागू करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी २५ दिवस पूर्ण झाल्यानंतरच नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरून दुसऱ्या सिलेंडरचे बुकिंग करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. या नियमामुळे अनावश्यक साठेबाजीला आळा बसणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.
प्रशासनाने नागरिकांना पेट्रोल पंप किंवा गॅस एजन्सीवर अनावश्यक गर्दी टाळण्याचे आवाहन केले आहे. काही ठिकाणी अफवांमुळे नागरिक मोठ्या प्रमाणावर पेट्रोल-डिझेल किंवा गॅसचा साठा करण्याचा प्रयत्न करत असल्याचे निदर्शनास आले असून अशा प्रकारामुळे पुरवठा साखळीवर ताण निर्माण होऊ शकतो. त्यामुळे गॅस सिलेंडरचा अनावश्यक साठा करू नये तसेच वितरण करणाऱ्या कर्मचाऱ्यांशी किंवा वाहनचालकांशी अकारण वाद घालू नये, असेही प्रशासनाने स्पष्ट केले.
युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर संभाव्य इंधन टंचाई आणि घरगुती गॅसचा काळाबाजार रोखण्यासाठी राज्याच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने विशेष निर्देश दिले आहेत. त्यानुसार सातारा जिल्ह्यातही घरगुती गॅसचा अनधिकृत वापर रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक तालुक्यात विशेष धडक मोहीम राबविण्यात येणार आहे.
या मोहिमेसाठी प्रत्येक तालुक्यात तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली ‘दक्षता पथके’ (फ्लाइंग स्क्वॉड) नियुक्त करण्यात आली आहेत. ही पथके हॉटेल, ढाबे, व्यावसायिक आस्थापना तसेच औद्योगिक ठिकाणी अचानक तपासणी करून घरगुती गॅस सिलेंडरचा व्यावसायिक वापर होत असल्यास संबंधित सिलेंडर जप्त करणार आहेत. तसेच अशा प्रकारे नियमभंग आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील सर्व गॅस एजन्सींनाही वितरणात पारदर्शकता ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या असून त्यांच्या साठ्याची नियमित तपासणी तालुका पातळीवरील पथकांकडून केली जाणार आहे. घरगुती गॅसचा अवैध साठा, काळाबाजार किंवा व्यावसायिक वापर करताना आढळल्यास संबंधितांवर जीवनावश्यक वस्तू कायदा (Essential Commodities Act) अंतर्गत कारवाई करण्यात येईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.
नागरिकांनी घरगुती गॅसचा वापर केवळ नियमानुसार करावा. गॅसचा अवैध वापर किंवा साठेबाजी आढळल्यास तात्काळ स्थानिक तहसील कार्यालय किंवा जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच गॅसची बचत करण्यासाठी सौरऊर्जा किंवा विद्युत उपकरणांसारख्या पर्यायी ऊर्जेचा वापर करण्याचेही आवाहन प्रशासनाने केले आहे.
ही माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी वैशाली राजमाने यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
Comments
Post a Comment