कुंभरोशीतील श्री जन्नी कुंभळजाई माता यात्रोत्सवाला भक्तांची उत्स्फूर्त गर्दी; विविध धार्मिक, सांस्कृतिक व क्रीडा कार्यक्रमांनी वातावरण भक्तिमय

कुंभरोशीतील श्री जन्नी कुंभळजाई माता यात्रोत्सवाला भक्तांची उत्स्फूर्त गर्दी; विविध धार्मिक, सांस्कृतिक व क्रीडा कार्यक्रमांनी वातावरण भक्तिमय

कुंभरोशी प्रतिनिधी : 

ऐतिहासिक प्रतापगडाच्या पायथ्याशी वसलेल्या कुंभरोशी गावातील ग्रामदैवत असलेल्या श्री जन्नी कुंभळजाई मातांचा वार्षिक यात्रोत्सव यंदा मोठ्या उत्साहात साजरा होत असून धार्मिक कार्यक्रमांसोबत क्रीडा, सांस्कृतिक आणि लोकनाट्य कार्यक्रमांची रेलचेल पाहायला मिळत आहे. शनिवार, दि. ७ मार्च ते बुधवार, दि. ११ मार्च २०२६ या कालावधीत हा यात्रोत्सव आयोजित करण्यात आला असून परिसरातील भाविक, ग्रामस्थ व तरुणांचा मोठा सहभाग दिसून येत आहे.

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ऐतिहासिक प्रतापगडाच्या सान्निध्यात असलेल्या कुंभरोशी गावातील श्री जन्नी कुंभळजाई माता मंदिराचा यात्रोत्सव हा परिसरातील श्रद्धेचा व परंपरेचा मानाचा सोहळा मानला जातो. यात्रोत्सवाच्या निमित्ताने गावात धार्मिक वातावरणासोबतच विविध सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

यात्रोत्सवाची सुरुवात शनिवार, दि. ७ मार्च रोजी सकाळी मर्यादित षटकांच्या ओव्हर आर्म ग्रामीण क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटनाने झाली. ग्रामस्थ मंडळ वाडा कुंभरोशी यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. दुसऱ्या दिवशीही ग्रामीण क्रिकेट सामने रंगले असून स्थानिक तरुणांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला.

सोमवार, दि. ९ मार्च रोजी सकाळी सात ते रात्री अकरा या कालावधीत देवीची भव्य पालखी मिरवणूक आणि पारंपरिक देवीचा गोंधळ हा प्रमुख धार्मिक कार्यक्रम पार पडणार आहे. या दिवशी गावात मोठ्या प्रमाणात भाविकांची उपस्थिती अपेक्षित असून पारंपरिक वाद्यांच्या गजरात आणि भक्तीभावाने ही पालखी मिरवणूक काढली जाणार आहे.

मंगळवार, दि. १० मार्च रोजी सकाळी शहरी क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन होणार असून रात्री शालेय मुलांचा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. त्यानंतर मान्यवरांचा सत्कार व क्रिकेट स्पर्धेतील विजेत्यांचा बक्षीस वितरण सोहळा पार पडणार आहे. मध्यरात्रीपासून सुप्रसिद्ध कलाकार सुनिताराणी बारामतीकर यांचा लोकनाट्य तमाशा सादर होणार असून ग्रामस्थांसाठी हा विशेष आकर्षणाचा कार्यक्रम ठरणार आहे.

यात्रोत्सवाचा समारोप बुधवार, दि. ११ मार्च रोजी पहाटे देवीच्या छबिन्याने होणार असून त्यानंतर सुस्वर भजनाचा कार्यक्रम आणि दिवसभर पुन्हा लोकनाट्य तमाशाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

या यात्रोत्सवाला शिवडी मतदारसंघाचे आमदार अजय चौधरी यांची विशेष उपस्थिती राहणार असून गावातील अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी आणि ग्रामस्थांच्या सहकार्याने हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. यात्रेच्या आयोजनासाठी  अनेक कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले आहेत.

यात्रोत्सवाच्या निमित्ताने ग्रामीण व शहरी मर्यादित षटकांच्या भव्य ओव्हर आर्म क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून विजेत्या संघासाठी तीस हजार रुपयांचे प्रथम पारितोषिक, वीस हजार रुपयांचे द्वितीय, दहा हजार रुपयांचे तृतीय आणि पाच हजार रुपयांचे चतुर्थ पारितोषिक तसेच आकर्षक चषक ठेवण्यात आले आहेत. याशिवाय उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, मालिकावीर, षटकार किंग आणि शिस्तबद्ध संघासाठीही विशेष रोख पारितोषिकांची तरतूद करण्यात आली आहे.

ग्रामस्थ मंडळ वाडा कुंभरोशी, जे.एम.सी.सी. वाडा कुंभरोशी, शिवप्रताप ढोल पथक, स्वराज्य ढोल पथक, नवरात्रोत्सव मंडळ आणि भजनीपथक यांच्या संयुक्त विद्यमाने हा यात्रोत्सव आयोजित करण्यात आला असून परिसरातील सर्व भाविकांनी उपस्थित राहून यात्रोत्सवाची शोभा वाढवावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl