वाई–पाचगणी–महाबळेश्वर मार्गाच्या दुरवस्थेविरोधात संताप; ८ मार्चला महाबळेश्वर, पाचगणी आणि वाई बंदचा निर्णय
वाई–पाचगणी–महाबळेश्वर मार्गाच्या दुरवस्थेविरोधात संताप; ८ मार्चला महाबळेश्वर, पाचगणी आणि वाई बंदचा निर्णय
महाबळेश्वर प्रतिनिधी :
वाई–पाचगणी–महाबळेश्वर हा अत्यंत महत्त्वाचा पर्यटन मार्ग सध्या मोठ्या प्रमाणावर दुरवस्थेत गेल्याने नागरिकांसह पर्यटकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. रस्त्याच्या कामामध्ये ठेकेदाराकडून होत असलेल्या विलंबामुळे या मार्गावरील प्रवास अत्यंत त्रासदायक बनला असून सर्वत्र खड्डे, धूळ आणि खोदून ठेवलेले भाग यामुळे वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
या मार्गावर वर्षभर मोठ्या प्रमाणात पर्यटकांची वर्दळ असते. वाई, पाचगणी आणि महाबळेश्वर ही तीनही ठिकाणे पर्यटनदृष्ट्या महत्त्वाची असल्याने दररोज हजारो पर्यटक या मार्गाने प्रवास करतात. मात्र गेल्या काही महिन्यांपासून रस्त्याचे काम सुरू असून ते अत्यंत संथ गतीने सुरू असल्याने नागरिकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी रस्ता खोदून ठेवण्यात आला आहे, तर काही ठिकाणी काम अर्धवट अवस्थेत सोडण्यात आले आहे. त्यामुळे खड्डे, उडणारी धूळ आणि वाहतुकीतील अडथळे यामुळे प्रवास धोकादायक आणि कष्टदायक ठरत आहे.
पर्यटकांनी देखील या परिस्थितीबाबत नाराजी व्यक्त केली असून खराब रस्त्यांमुळे या जागतिक पर्यटनस्थळाची प्रतिमा मलिन होत असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. स्थानिक व्यापारी, हॉटेल व्यावसायिक आणि नागरिकांनी प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही ठोस उपाययोजना होत नसल्याने अखेर नागरिकांनी सर्वपक्षीय जनआंदोलन उभारण्याचा निर्णय घेतला आहे.
या पार्श्वभूमीवर आज महाबळेश्वर येथे सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी आणि नागरिकांच्या उपस्थितीत ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. या ग्रामसभेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी नवनिर्वाचित नगराध्यक्ष सुनील शिंदे, नगरसेवक ऍडव्होकेट संजय जंगम, नगरसेवक संतोष आबा शिंदे, नगरसेवक राजू नालबंद, माजी नगराध्यक्ष डी. एम. बावळेकर, शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख राजेश कुंभारदरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे उपप्रदेशाध्यक्ष अनिल लोहार, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शहरप्रमुख महेश गुजर, शिवसेना (शिंदे गट) शहरप्रमुख विजय नायडू, माजी नगरसेवक संदीप साळुंखे, अर्बन बँकेचे अध्यक्ष सी. डी. बावळेकर, उपाध्यक्ष नदीम शारवान, संचालक समीर सुतार, युवा उद्योजक हेमंत साळवी, विशाल तोष्णीवाल, गिरीश नायडू, विजय बिरामणे, सूर्यकांत शिंदे, अमित ढेबे, शंकर ढेबे, अप्पा साळुंखे, गोपाळ लालबेग, पर्यावरणप्रेमी व समाजसेवक बाळासाहेब पांचाळ तसेच सर्व पत्रकार आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
ग्रामसभेत रस्त्याच्या निकृष्ट कामाबाबत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. नागरिकांच्या समस्या आणि प्रशासनाच्या दुर्लक्षाबाबत अनेकांनी आपली भूमिका मांडली. अखेर या प्रश्नाकडे शासन आणि प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी ८ मार्च रोजी महाबळेश्वर, पाचगणी आणि वाई शहर बंद ठेवण्याचा एकमताने निर्णय घेण्यात आला. या बंदला स्थानिक व्यापारी, नागरिक आणि विविध सामाजिक संघटनांनी पाठिंबा दर्शवला आहे.
नागरिकांनी प्रशासनाकडे तातडीने दर्जेदार आणि सुरक्षित रस्ता पूर्ण करण्याची मागणी केली असून, जर याबाबत त्वरित ठोस निर्णय घेण्यात आला नाही तर भविष्यात आणखी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे. पर्यटनावर मोठ्या प्रमाणावर अवलंबून असलेल्या या भागातील नागरिकांनी रस्त्याचा प्रश्न तातडीने सोडवण्याची मागणी करत प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसादाची अपेक्षा व्यक्त केली आहे.
Comments
Post a Comment