महाबळेश्वर गिरिस्थान नगरपरिषदेचा १६९.७३ कोटींचा अर्थसंकल्प मंजूर; पर्यटन, पायाभूत सुविधा व पर्यावरण संवर्धनावर विशेष भर

महाबळेश्वर गिरिस्थान नगरपरिषदेचा १६९.७३ कोटींचा अर्थसंकल्प मंजूर; पर्यटन, पायाभूत सुविधा व पर्यावरण संवर्धनावर विशेष भर

महाबळेश्वर प्रतिनिधी  :

महाबळेश्वर गिरिस्थान नगरपरिषदेचा सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठीचा तब्बल १६९.७३ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प नुकत्याच पार पडलेल्या विशेष सभेत सर्वानुमते मंजूर करण्यात आला. शहराचा सर्वांगीण विकास, पर्यटन वृद्धी, स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धन या त्रिसूत्रीवर आधारित असलेल्या या अर्थसंकल्पात कोणतीही करवाढ न करता नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

नगरपरिषदेने सादर केलेल्या अंदाजपत्रकात एकूण १,६९,७३,५६,६८७ रुपये इतक्या उत्पन्नाची अपेक्षा धरली असून, १,६९,६४,५०,००० रुपये खर्चाची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे हा अर्थसंकल्प ९,०६,६८७ रुपयांच्या शिल्लकीचा असून, आर्थिक शिस्त आणि काटकसरीवर भर देण्यात आला आहे.

या अर्थसंकल्पातील प्रमुख बाबींमध्ये पर्यटन विकास आणि शहर सुशोभीकरणाला विशेष प्राधान्य देण्यात आले आहे. महाबळेश्वरमधील प्रमुख प्रेक्षणीय स्थळांचा सर्वांगीण विकास, पर्यटकांच्या सोयीसाठी अत्याधुनिक प्रसाधनगृहांची उभारणी, सार्वजनिक जागांचे सुशोभीकरण आणि आवश्यक सोयीसुविधा निर्माण करण्यासाठी विशेष निधीची तरतूद करण्यात आली आहे. यामुळे पर्यटनाला चालना मिळून स्थानिक अर्थव्यवस्थेला बळकटी मिळणार आहे.

शहरातील अंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरण व काँक्रीटीकरण, पावसाळी गटारांची दुरुस्ती आणि पायाभूत सुविधांचा दर्जा उंचावण्यासाठी भांडवली खर्चातून मोठी तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे वाहतूक सुलभ होऊन नागरिकांच्या दैनंदिन जीवनातील अडचणी कमी होण्यास मदत होणार आहे.

स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने प्लास्टिकमुक्त महाबळेश्वर अभियान अधिक प्रभावीपणे राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. घनकचरा व्यवस्थापनासाठी नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यात येणार असून, ‘माझी वसुंधरा’ योजनेअंतर्गत वृक्षसंवर्धन, नवीन वृक्षारोपण आणि हरित क्षेत्र वाढविण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे.

वाढती लोकसंख्या आणि पर्यटकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन पाणीपुरवठा योजनेवरही विशेष भर देण्यात आला आहे. शहराला अखंडित आणि शुद्ध पाणीपुरवठा सुनिश्चित करण्यासाठी जलवाहिन्यांचे नूतनीकरण करण्यात येणार असून, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या थकबाकीबाबत होणाऱ्या खर्चाची तूट भरून काढण्यासाठी सखोल चर्चा करून योग्य उपाययोजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

उत्पन्न वाढीच्या दृष्टीने शहरातील सर्व नवीन मिळकतींवर कर आकारणी करणे, मिळकत कर व पाणीपट्टी वसुलीसाठी विशेष मोहीम राबविणे आणि महसुली तूट भरून काढण्यासाठी ठोस उपाययोजना करण्यावर सभागृहात भर देण्यात आला. याबाबत शिक्षण, क्रीडा व सांस्कृतिक कार्य समितीचे सभापती श्री. रोहित ढेबे यांनी उत्पन्न वाढीचा प्रस्ताव मांडला, तर स्वच्छता, वैद्यक व सार्वजनिक आरोग्य समितीचे सभापती श्री. संजय बाळकृष्ण जंगम यांनी त्यास अनुमोदन दिले. विरोधी पक्षनेते श्री. कुमार शिंदे यांनी सर्व पदाधिकाऱ्यांनी एकत्रित प्रयत्न करून नगरपरिषदेची महसुली तूट भरून काढावी, असे सुचविले.

यावेळी मुख्याधिकारी श्री. योगेश पाटील यांनी, “महाबळेश्वर गिरिस्थान नगरपरिषदेचे उत्पन्न वाढवतानाच खर्चात काटकसर करून आर्थिक शिस्त राखणे हा प्रशासनाचा प्रधान्यक्रम राहील,” असे प्रतिपादन केले. नगराध्यक्ष श्री. सुनिल शिंदे यांनी, “हा अर्थसंकल्प शहराला विकासाच्या नव्या दिशेने नेणारा असून, सामान्य नागरिकांवर कोणताही कराचा बोजा न टाकता शहराचा सर्वांगीण विकास साधण्याचा आमचा प्रयत्न आहे,” असे नमूद केले.

या विशेष सभेत सर्व नगरसेवकांनी अर्थसंकल्पावरील चर्चेत सक्रिय सहभाग घेतला. विकासाभिमुख, पर्यावरणपूरक आणि नागरिककेंद्री धोरणांमुळे महाबळेश्वरचा सर्वांगीण विकास वेग घेईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl