देवळे सज्ज कबड्डीच्या महासंग्रामासाठी; धुलीवंदनाच्या सायंकाळी रंगणार ऐतिहासिक थरार
देवळे सज्ज कबड्डीच्या महासंग्रामासाठी; धुलीवंदनाच्या सायंकाळी रंगणार ऐतिहासिक थरार
✍️प्रकाश कदम,
पोलादपूर प्रतिनिधी |
धुलीवंदनाच्या उत्सवी वातावरणात देवळे गाव पुन्हा एकदा कबड्डीच्या रणधुमाळीने दुमदुमणार आहे. अनेक वर्षांच्या प्रतिक्षेनंतर देवळेच्या मातीत भव्य खुल्या कबड्डी स्पर्धेचा थरार रंगणार असून, सोमवार, दि. ३ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता नरवीर तानाजी क्रीडा मंडळ, देवळे व देवळे ग्रामस्थ मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत एकूण १६ नामवंत संघ सहभागी होणार असून, चुरशीच्या लढतींमुळे प्रेक्षकांना अक्षरशः श्वास रोखून धरावा लागेल, असा रोमांचक अनुभव मिळणार आहे.
या कबड्डी महोत्सवाचे उद्घाटन राज्याचे रोजगार हमी मंत्री भरत शेठ गोगावले यांच्या शुभहस्ते होणार असून, पॅराओलंपिकमध्ये देशाचा गौरव वाढवणारे रौप्यपदक विजेते बी. एम. केसरकर आणि रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष चंद्रकांत कळंबे यांची प्रमुख उपस्थिती या कार्यक्रमाला लाभणार आहे. त्यांच्या उपस्थितीमुळे या स्पर्धेला विशेष मान आणि उत्साहाचे वातावरण प्राप्त होणार आहे.
देवळे गावाची कबड्डीची परंपरा समृद्ध असून, या स्पर्धेच्या निमित्ताने त्या इतिहासाला नवे पान जोडले जाणार आहे. मंडळाचे कर्णधार राजाराम केसरकर यांच्यासह सर्व माजी खेळाडू व संघ व्यवस्थापकांचा यावेळी यथोचित सन्मान करण्यात येणार आहे. यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळत नव्या पिढीतील खेळाडूंना प्रेरणा मिळणार आहे.
या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी देवळे ग्रामस्थ मंडळातील युवक-युवती गेले अनेक दिवस अहोरात्र मेहनत घेत असून, संपूर्ण गावात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. मैदानाची सजावट, खेळाडूंच्या सोयी-सुविधा, प्रेक्षकांसाठी व्यवस्था आणि ढोल-ताशांच्या गजरात जल्लोषमय वातावरण तयार करण्यासाठी विशेष तयारी करण्यात आली आहे.
बक्षिसांची मेजवानीही तितकीच आकर्षक ठेवण्यात आली असून, प्रथम क्रमांकासाठी ५१ हजार रुपये व भव्य चषक, द्वितीय क्रमांकासाठी ३१ हजार रुपये व भव्य चषक, तृतीय व चतुर्थ क्रमांकासाठी प्रत्येकी २१ हजार रुपये व भव्य चषक देण्यात येणार आहेत. याशिवाय प्रत्येक सामन्यातील सामनावीर, मालिकावीर, उत्कृष्ट चढाईपट्टू आणि उत्कृष्ट पकड यांना विशेष पारितोषिके देऊन गौरवण्यात येणार आहे. सर्व सहभागी संघांनाही सन्मानपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात येणार आहे.
कबड्डीचा थरार, खेळाडूंची चपळ हालचाल, ढोल-ताशांचा गजर आणि विजयी आरोळ्यांनी आसमंत दुमदुमवणारा हा भव्य सोहळा अनुभवण्यासाठी सर्व क्रीडाप्रेमी, युवक आणि ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे कळकळीचे आवाहन आयोजक देवळे ग्रामस्थ मंडळाने केले आहे. देवळेच्या मातीत पुन्हा एकदा कबड्डीचा इतिहास घडू देण्यासाठी हा उत्सव सर्वांनी एकत्र येऊन साजरा करावा, असेही आयोजकांनी नमूद केले आहे.
Comments
Post a Comment