पाचगणीमध्ये प्रथमच Paragliding World Cup; खासदार नितीन पाटील यांच्या उपस्थितीत दिमाखदार उद्घाटन, २५ देशांतील २०० खेळाडूंचा सहभाग
पाचगणीमध्ये प्रथमच Paragliding World Cup; खासदार नितीन पाटील यांच्या उपस्थितीत दिमाखदार उद्घाटन, २५ देशांतील २०० खेळाडूंचा सहभाग
पाचगणी प्रतिनिधी :
महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन संचालनालय आणि हाय फ्लाय पॅराग्लायडिंग, पाचगणी यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्रात प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या Paragliding World Cup स्पर्धेचा दिमाखदार उद्घाटन समारंभ खासदार नितीन पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. यावेळी आयोजक श्री. अनुपम जाधव-पाटील यांच्यासह देश-विदेशातून सहभागी झालेल्या सर्व खेळाडूंना मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या.
या स्पर्धेच्या निमित्ताने जगातील तब्बल २५ देशांमधील सुमारे २०० नामांकित पॅराग्लायडिंग खेळाडू महाराष्ट्रात दाखल झाले असून, त्यामुळे पाचगणी परिसरात आंतरराष्ट्रीय क्रीडा महोत्सवाचे वातावरण निर्माण झाले आहे. जागतिक स्तरावरील तज्ञ पंचांच्या देखरेखीखाली तसेच पॅराग्लायडिंग वर्ल्ड कप असोसिएशनचे अध्यक्ष श्री. गोरान यांच्या उपस्थितीत ही स्पर्धा रंगणार आहे. या भव्य आयोजनामुळे पाचगणीची ओळख केवळ एक लोकप्रिय पर्यटनस्थळ म्हणून न राहता, जागतिक दर्जाच्या ‘पॅराग्लायडिंग हब’ म्हणून निश्चित अधोरेखित होणार आहे.
उद्घाटनप्रसंगी बोलताना खासदार नितीन पाटील यांनी सांगितले की, अशा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा स्पर्धांमुळे महाराष्ट्राच्या पर्यटन क्षेत्राला मोठी चालना मिळते. याचा थेट फायदा स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी, पर्यटन उद्योग, हॉटेल व्यवसाय, वाहतूक व्यवस्था आणि विविध सेवा क्षेत्रांना होणार असून, राज्याच्या महसुलातही लक्षणीय वाढ होईल. महाराष्ट्राला जागतिक पर्यटन नकाशावर अग्रस्थानी नेण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध असून, साहसी पर्यटन, क्रीडा पर्यटन आणि नव्या उपक्रमांना प्रोत्साहन देण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
ही रोमांचक Paragliding World Cup स्पर्धा येत्या १५ फेब्रुवारी रोजी सकाळी ११.३० वाजता सुरू झाली असून, २१ फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. या कालावधीत पाचगणीच्या निसर्गरम्य डोंगररांगांमध्ये आकाशात झेपावणाऱ्या रंगीबेरंगी पॅराग्लायडर्समुळे पर्यटकांना थरारक आणि अविस्मरणीय अनुभव घेता येणार आहे.
या ऐतिहासिक स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व नागरिक व क्रीडाप्रेमींनी मोठ्या संख्येने पाचगणी येथे उपस्थित राहावे, खेळाडूंना प्रोत्साहन द्यावे आणि या जागतिक दर्जाच्या आयोजनाचे साक्षीदार व्हावे, असे मनापासून आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
Comments
Post a Comment