मतदान सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज; महाबळेश्वर येथे क्षेत्रीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची आढावा बैठक
मतदान सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज; महाबळेश्वर येथे क्षेत्रीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची आढावा बैठक
महाबळेश्वर प्रतिनिधी -
दि. ०५ फेब्रुवारी २०२६ रोजी आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान प्रक्रिया सुरळीत व पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी मतदान साहित्य वाटप तसेच प्रत्यक्ष मतदान दिवसाच्या तयारीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. दि. ०६ फेब्रुवारी २०२६ रोजी होणाऱ्या मतदान साहित्य वाटपाची प्रक्रिया आणि दि. ०७ फेब्रुवारी २०२६ रोजीच्या प्रत्यक्ष मतदान दिवशी घ्यावयाच्या सर्व उपाययोजनांबाबत या बैठकीत सखोल चर्चा करण्यात आली.
या आढावा बैठकीस मा. निवडणूक निर्णय अधिकारी, मा. सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्यासह विविध विभागांचे नोडल अधिकारी, क्षेत्रीय अधिकारी तसेच कार्यालयीन कर्मचारी उपस्थित होते. मतदान साहित्याची सुरक्षित वाहतूक, मतदान केंद्रांवरील मूलभूत सुविधा, मतदान यंत्रांची उपलब्धता व तपासणी, कर्मचारी नेमणूक, कायदा व सुव्यवस्था, तसेच आपत्कालीन परिस्थितीत घ्यावयाच्या उपाययोजनांबाबत अधिकाऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
मतदान साहित्य वाटपाच्या दिवशी कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी वेळेचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच मतदान दिवशी मतदारांना कोणत्याही अडचणीचा सामना करावा लागू नये यासाठी मतदान केंद्रांवर पाणी, वीज, रॅम्प, सावली व इतर आवश्यक सुविधा उपलब्ध ठेवण्यावर भर देण्यात आला. दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याचेही निर्देश देण्यात आले.
या बैठकीदरम्यान निवडणूक प्रक्रियेत सहभागी असलेल्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपापल्या जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे व नियमानुसार पार पाडाव्यात, तसेच निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन करण्यात आले. संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय वातावरणात आणि पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी प्रशासन पूर्णतः सज्ज असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
Comments
Post a Comment