अनुसूचित जाती-जमाती अत्याचार पिडीतांना संरक्षणासह न्याय देणे हेच प्रशासनाचे ध्येय – जिल्हाधिकारी संतोष पाटील
अनुसूचित जाती-जमाती अत्याचार पिडीतांना संरक्षणासह न्याय देणे हेच प्रशासनाचे ध्येय – जिल्हाधिकारी संतोष पाटील
सातारा प्रतिनिधी :
अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार पिडीतांना केवळ संरक्षणच नव्हे तर वेळेत आणि प्रभावी न्याय मिळवून देणे ही प्रशासनाची ठाम भूमिका असल्याचे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी स्पष्ट केले. अत्याचार प्रकरणांमध्ये चार्जशीट न्यायालयात दाखल करण्यासाठी पिडीतांकडे जातीचा दाखला आवश्यक असतो. मात्र अनेक पिडीतांकडे आवश्यक कागदपत्रे नसल्याने अडचणी निर्माण होतात. अशा परिस्थितीत सामाजिक न्याय विभागाने पुढाकार घेऊन संबंधितांकडून आवश्यक कागदपत्रे गोळा करावीत व त्यांना तातडीने जातीचे दाखले मिळवून द्यावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी पाटील यांनी दिले.
जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीस समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त सुनील चव्हाण यांच्यासह पोलीस प्रशासन व विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. बैठकीत जिल्ह्यातील प्रलंबित अत्याचार प्रकरणांचा आढावा घेण्यात आला तसेच पिडीतांना तत्काळ मदत, आर्थिक सहाय्य, कायदेशीर प्रक्रिया आणि पुनर्वसन याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
जिल्हाधिकारी पाटील यांनी सांगितले की, ज्या पिडीतांकडे जातीचा दाखला नाही अशांची स्थानिक चौकशी करून तातडीने दाखला देण्याची प्रक्रिया राबविण्यात यावी. यासाठी पोलीस प्रशासनानेही सक्रिय भूमिका घ्यावी. संबंधित प्रांताधिकारी व तहसीलदारांशी समन्वय साधून प्रकरणे जलदगतीने निकाली काढली जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी खून अथवा गंभीर अत्याचार प्रकरणात मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबातील पात्र वारसास शासकीय अथवा निमशासकीय नोकरी देण्याच्या प्रक्रियेला गती देण्याचे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. पीडित कुटुंबांचे आर्थिक व सामाजिक पुनर्वसन सुनिश्चित करणे हे प्रशासनाचे कर्तव्य असून, या प्रकरणांमध्ये कोणताही विलंब खपवून घेतला जाणार नाही, असे त्यांनी ठामपणे सांगितले.
बैठकीत प्रलंबित प्रकरणांतील तपास, न्यायालयीन प्रक्रिया, पीडितांना देण्यात येणारे अनुदान, संरक्षण उपाययोजना आणि समुपदेशन याबाबतही सविस्तर चर्चा करण्यात आली. पिडीतांना त्वरित न्याय मिळावा, यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी यावेळी केले.
Comments
Post a Comment