“धनुष्यबाण”च्या जोरावर तळदेव–वाडा कुंभरोशीचा विकास घडवणार; शिवसेना उमेदवारांचा ठाम निर्धार
“धनुष्यबाण”च्या जोरावर तळदेव–वाडा कुंभरोशीचा विकास घडवणार; शिवसेना उमेदवारांचा ठाम निर्धार
महाबळेश्वर तालुका प्रतिनिधी –
जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६च्या पार्श्वभूमीवर तळदेव जिल्हा परिषद गटातून अजित रामचंद्र सकपाळ आणि वाडा कुंभरोशी पंचायत समिती गणातून संजय हरिश्चंद्र मोरे हे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले असून, “एक निर्धार, एकच भगवा फडकवणे” या भूमिकेतून त्यांनी प्रचाराला गती दिली आहे. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना नेते मा. ना. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत, विभागाचा सर्वांगीण विकास साधण्याचा निर्धार उमेदवारांनी व्यक्त केला आहे.
सोळशी, कोयना, कांदाटी, वाडा कुंभरोशी या भौगोलिकदृष्ट्या आव्हानात्मक विभागातील पायाभूत सुविधा, दळणवळण, पाणीपुरवठा, आरोग्य आणि रोजगार या प्रश्नांची जाणीव असल्याचे सांगत, या संपूर्ण भागाचा विकासात्मक कायापालट करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करण्यात येणार असल्याचे उमेदवारांनी नमूद केले. शिवसेनेच्या स्थापनेपासून आजपर्यंत या विभागात पक्ष टिकवून ठेवण्याचे व वाढवण्याचे काम अनेक ज्येष्ठ व दिवंगत शिवसैनिकांनी केल्याची आठवण करून देत, (कै.) तानाजी धुमाळ आणि (कै.) हरिभाऊ दादा सकपाळ यांच्या कार्याचा वारसा पुढे नेण्याची जबाबदारी स्वीकारल्याचे त्यांनी सांगितले.
मा. ना. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या माध्यमातून तापोळा–महाबळेश्वर रस्त्याचे रुंदीकरण व नूतनीकरण, बुरडाणी–कोट्रोशी–रेणोशी–उचाट आणि गाढवलो–दोडानी रस्ते, तापोळा–अहिर, तापोळा–आपटी, सावरी–दरे, आकलपे–मोरणी येथील महत्त्वाचे पूल, नवीन महाबळेश्वर प्रकल्प, पाचवड–मेढा–बामणोली–दरे–खेड महामार्ग जोड रस्ता, उतेश्वर मंदिर कॉरिडोअर, कोरोना काळातील व अतिवृष्टीतील मदत, तसेच ‘लाडकी बहीण’ योजनेतून स्त्री सन्मान अशी अनेक विकासकामे झाल्याचे प्रचारात अधोरेखित करण्यात येत आहे.
पुढील काळात सोळशी धरण हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प, दाभे येथील पाणी साठवण बंधारा, मंजूर बुडीत बंधारे पूर्ण करणे, १०५ गावांसाठी पिण्याच्या पाण्याची प्राधिकरण योजना, माघर–दूधगाव–घोणसपूर रस्ता, वाडा कुंभरोशी ते तापोळा दोन पदरी रस्ता, वेलनेस केअर हॉस्पिटल, स्थानिकांसाठी रोजगारनिर्मिती करणारे प्रकल्प, व्यावसायिक शिक्षण संस्थांची उभारणी आणि प्रतापगड संवर्धनासाठी भरीव निधी आणण्याचा अजेंडा शिवसेनेने जाहीर केला आहे.
या सर्व विकास उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी मतदारांनी “धनुष्यबाण” या चिन्हासमोरील बटण दाबून शिवसेनेला साथ द्यावी, असे आवाहन उमेदवारांकडून करण्यात येत आहे. गुरुवार, दिनांक ५ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ या वेळेत होणाऱ्या मतदानासाठी परिसरात राजकीय वातावरण तापले असून, तळदेव व वाडा कुंभरोशी गणात शिवसेनेच्या प्रचाराला जोर चढताना दिसत आहे.
Comments
Post a Comment