गिरिस्थान प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयातील गुणवंत विद्यार्थिनींना ‘मीरा देशपांडे शिष्यवृत्ती’; अमनोरा एस फाउंडेशनकडून ५० हजारांची आर्थिक मदत
गिरिस्थान प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयातील गुणवंत विद्यार्थिनींना ‘मीरा देशपांडे शिष्यवृत्ती’; अमनोरा एस फाउंडेशनकडून ५० हजारांची आर्थिक मदत
महाबळेश्वर प्रतिनिधी :
अमनोरा एस फाउंडेशन, पुणे यांच्या वतीने गिरिस्थान प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयातील गुणवंत विद्यार्थिनींना ‘मीरा देशपांडे शिष्यवृत्ती’ प्रदान करण्यात आली. या उपक्रमांतर्गत कु. स्वप्नाली भाऊ बोराणे, कु. अनुष्का गणपत रिंगे, कु. श्रुती दीपक वाडकर, कु. श्रेया जयवंत ढेबे आणि कु. आर्या मोहन केळगणे या पाच विद्यार्थिनींना प्रत्येकी १० हजार रुपये व प्रमाणपत्र देऊन एकूण ५० हजार रुपयांची शिष्यवृत्ती मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आली.
विद्यार्थिनींमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण व्हावी, आर्थिक अडचणींवर मात करत त्यांना उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. या वेळी अमनोरा एस फाउंडेशनचे व्यवस्थापकीय संचालक श्री. प्रसाद जाधव, मुख्य सामाजिक अधिकारी श्री. विवेक कुलकर्णी, श्री. हर्षद वर्कट उपस्थित होते. तसेच महाबळेश्वर गिरिस्थान नगरपरिषदेचे नगराध्यक्ष श्री. सुनील शिंदे, शिक्षण सभापती श्री. रोहित ढेबे, मुख्याधिकारी श्री. योगेश पाटील, करनिरीक्षक श्री. अमित माने, प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. माने पी. आर. यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमात मान्यवरांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना शिक्षण हे जीवन घडविण्याचे प्रभावी साधन असून अशा शिष्यवृत्तींमुळे ग्रामीण व दुर्गम भागातील विद्यार्थिनींना नवी दिशा मिळते, असे प्रतिपादन केले. विद्यार्थिनींनीही आपल्या भावना व्यक्त करत या मदतीमुळे पुढील शिक्षणासाठी मोठे बळ मिळाल्याचे सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. प्रा. बाजीराव शेलार यांनी केले. प्रास्ताविक श्री. कदम सर यांनी मांडले, तर आभार प्रदर्शन श्री. हिरवे सर यांनी केले. संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
Comments
Post a Comment