जलजीवन मिशन रखडले; पाणी वाया, नागरिक तहानलेले!कुंभरोशीत अर्धवट पाईपलाईन, सतत गळती व निकृष्ट कामामुळे ग्रामस्थ हैराण; तातडीने कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा

जलजीवन मिशन रखडले; पाणी वाया, नागरिक तहानलेले!
कुंभरोशीत अर्धवट पाईपलाईन, सतत गळती व निकृष्ट कामामुळे ग्रामस्थ हैराण; तातडीने कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा

कुंभरोशी | प्रतिनिधी :


केंद्र व राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी जलजीवन मिशन अंतर्गत सन २०२२ मध्ये मंजूर झालेल्या पाईपलाईन योजनेचे काम कुंभरोशी गावात अद्याप अपूर्ण अवस्थेत असून, कंत्राटदाराची मनमानी, निकृष्ट दर्जाचे साहित्य आणि ग्रामपंचायत प्रशासनाच्या उदासीनतेमुळे ही संपूर्ण योजना अडचणीत सापडली आहे. गावात चार विहिरी आणि चार पाण्याच्या टाक्या उपलब्ध असतानाही नागरिकांना नियमित व पुरेसे पिण्याचे पाणी मिळत नसल्याने तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

गावात पाणीपुरवठा सुरळीत व्हावा, प्रत्येक घराला स्वच्छ पिण्याचे पाणी मिळावे, या उद्देशाने मोठ्या निधीतून पाईपलाईन टाकण्याचे काम हाती घेण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात हे काम अर्धवट अवस्थेतच थांबले असून अनेक ठिकाणी निकृष्ट दर्जाचा काळा गोटा पाईप वापरण्यात आल्याने सतत गळती होत आहे. परिणामी दररोज हजारो लिटर पाणी रस्त्यांवर, मोकळ्या जागेत आणि शेतात वाया जात असून दुसरीकडे नागरिकांना मात्र पिण्यासाठी पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.

अनेक ठिकाणी पाईपलाईन फुटलेली असतानाही ग्रामपंचायत व संबंधित विभागाकडून दुरुस्तीची कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे. वारंवार तक्रारी करूनही केवळ तात्पुरती मलमपट्टी केली जाते किंवा कामाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले जाते, अशी परिस्थिती असून त्यामुळे समस्या दिवसेंदिवस अधिक गंभीर बनत आहे.

गावात चार विहिरी आणि चार पाण्याच्या टाक्या असतानाही योग्य नियोजनाअभावी पाण्याचे समन्यायी वितरण होत नाही. कोणत्या भागाला किती वेळ पाणी द्यायचे, टाक्यांमधील साठा कसा वापरायचा, गळती थांबवण्यासाठी कोणत्या उपाययोजना करायच्या याबाबत कोणताही ठोस आराखडा ग्रामपंचायतकडे नसल्याचे चित्र आहे. परिणामी काही भागात पाणी साचून वाया जाते, तर अनेक वाड्या-वस्त्यांमध्ये नागरिकांना दिवसेंदिवस पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे.

या सर्व प्रकारामुळे जलजीवन मिशनसारखी महत्त्वाकांक्षी योजना केवळ कागदावरच उरली आहे का, असा सवाल ग्रामस्थ उपस्थित करत आहेत. योजनेच्या कामाची तातडीने गुणवत्ता तपासणी करून दोषी कंत्राटदारावर कठोर कारवाई करावी, निकृष्ट पाईप तात्काळ बदलून दर्जेदार साहित्य वापरावे, सर्व ठिकाणची गळती बंद करावी आणि संपूर्ण काम लवकरात लवकर पूर्ण करावे, अशी जोरदार मागणी करण्यात येत आहे.

ग्रामपंचायत प्रशासनाने पाणी नियोजनाचा ठोस व पारदर्शक आराखडा तयार करून समन्यायी पाणीपुरवठा व्यवस्था राबवावी, अन्यथा आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल, असा स्पष्ट इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे. कुंभरोशीतील पाणीप्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी संबंधित विभाग आणि वरिष्ठ प्रशासनाने गांभीर्याने लक्ष घालणे अत्यावश्यक बनले असून, वेळेत ठोस पावले उचलली नाहीत तर परिस्थिती अधिक चिघळण्याची शक्यता ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे.

Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl