सनज्वेल्स प्रा. लि. च्या सामाजिक बांधिलकीतून महाबळेश्वर तालुक्यातील शाळांना शैक्षणिक साहित्याची मोठी देणगी
सनज्वेल्स प्रा. लि. च्या सामाजिक बांधिलकीतून महाबळेश्वर तालुक्यातील शाळांना शैक्षणिक साहित्याची मोठी देणगी
महाबळेश्वर प्रतिनिधी –
महाबळेश्वर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांच्या शैक्षणिक गुणवत्तेत भर घालण्यासाठी सनज्वेल्स प्रा. लि. कंपनी, अंधेरी मुंबई यांच्या सामाजिक बांधिलकी उपक्रमांतर्गत शैक्षणिक साहित्य वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले. सन २०२६ या वर्षातील या उपक्रमात तालुक्यातील विविध शाळांना संगणक, प्रिंटर्स, ग्रीनबोर्ड, कपाटे तसेच वाचनालयासाठी आवश्यक पुस्तके यांसह विविध उपयुक्त शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले.
या समारंभाला सनज्वेल्स प्रा. लि. कंपनीचे डायरेक्टर मा. श्री. शिशिर निव्हेटिया साहेब प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. त्यांच्या शुभहस्ते या साहित्याचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रमुख उपस्थितीत मा. श्री. शिवाजीराव भिलारे (सरपंच, भिलार), मा. श्री. महेंद्र भिलारे (उपसरपंच, अवकाळी) आणि मा. श्री. दत्ताशेठ भिलारे (सामाजिक कार्यकर्ते) हे मान्यवर उपस्थित होते. तर सन्माननीय उपस्थितीत गटशिक्षणाधिकारी मा. श्री. रमेश गंबरे, माजी शिक्षण विस्तार अधिकारी मा. श्री. सुरेंद्र भिलारे, केंद्रप्रमुख मा. श्री. संजय पारठे (भिलार), मा. श्री. दगडू ढेबे (मेटगुताड) आणि माजी केंद्रप्रमुख मा. श्री. संभाजी भिलारे (मेटगुताड) यांची उपस्थिती लाभली.
या उपक्रमांतर्गत मेटगुताड, राजपुरी, नाकिंदा, भेकवली, धनगरवाडी, कारवीआळा, जिल्हा परिषद शाळा क्रमांक २ महाबळेश्वर, क्षेत्र महाबळेश्वर, मेटतळे, माचुतर (म.), अवकाळी, दापवडी हायस्कूल, राजपुरी हायस्कूल, बोरगाव हायस्कूल आणि भिलार येथील शाळांना शैक्षणिक साहित्य देण्यात आले. या साहित्यामुळे ग्रामीण व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षणाची साधने उपलब्ध होऊन त्यांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यास निश्चितच मदत होणार आहे.
यावेळी मा. श्री. संभाजी भिलारे सर यांनी सन २०१५ ते २०२६ या कालावधीत सनज्वेल्स प्रा. लि. कंपनीने शिक्षण क्षेत्रासाठी राबवलेल्या विविध उपक्रमांचा सविस्तर आढावा सादर केला. कंपनीने गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने ग्रामीण भागातील शाळांसाठी भरीव योगदान दिल्याचे त्यांनी नमूद केले. या कार्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण होत असून शिक्षकांनाही अध्यापनासाठी अधिक सक्षम साधने मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रमुख अतिथी मा. श्री. शिशिर निव्हेटिया यांनी आपल्या मनोगतात शिक्षण हा समाज परिवर्तनाचा सर्वात प्रभावी मार्ग असल्याचे सांगून, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण सुविधा मिळाव्यात यासाठी सनज्वेल्स प्रा. लि. कंपनी भविष्यातही अशाच सामाजिक उपक्रमांतून योगदान देत राहील, अशी ग्वाही दिली.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित मान्यवरांनी या उपक्रमाबद्दल सनज्वेल्स प्रा. लि. कंपनीचे आभार मानले. शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, पालक आणि ग्रामस्थांनी या उपक्रमाचे मनःपूर्वक स्वागत करून समाधान व्यक्त केले. हा कार्यक्रम महाबळेश्वर तालुक्यातील शिक्षण क्षेत्रासाठी प्रेरणादायी ठरला.
Comments
Post a Comment