फुरूसमध्ये शिवभक्त मंडळातर्फे शिवजयंतीचा भव्य उत्सव; विविध धार्मिक, सांस्कृतिक व मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजन
फुरूसमध्ये शिवभक्त मंडळातर्फे शिवजयंतीचा भव्य उत्सव; विविध धार्मिक, सांस्कृतिक व मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजन
तापोळा प्रतिनिधी :
शिवभक्त मंडळ, फुरूस यांच्या वतीने गुरुवार दिनांक १९ फेब्रुवारी २०२६ रोजी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरी करण्यात येणार असून, या वर्षी या उत्सवाचे आठवे वर्ष आहे. शके १९४७ निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या या शिवजयंती उत्सवासाठी संपूर्ण गावात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. शिवभक्त, ग्रामस्थ, युवक, महिला व बालगोपालांसाठी विविध धार्मिक, सांस्कृतिक व मनोरंजनात्मक कार्यक्रमांची आकर्षक रूपरेषा तयार करण्यात आली आहे.
सकाळी ८.३० ते ९.३० या वेळेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे दुग्धाभिषेक, विधीवत पूजन आणि आरती करण्यात येणार आहे. यानंतर सकाळी ९.३० ते ११.३० या वेळेत सोमजाई मंदिर, आपटी येथून फुरूसपर्यंत वाजत-गाजत भव्य मिरवणूक काढण्यात येणार असून, ढोल-ताशांच्या गजरात आणि शिवघोषात संपूर्ण परिसर शिवमय होणार आहे. या मिरवणुकीत शिवभक्त मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.
सायंकाळी ७ ते ८.३० या वेळेत गावपातळीवरील विविध मनोरंजनात्मक स्पर्धा व कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, यामध्ये संगीत खुर्ची, होम मिनिस्टर यांसारख्या खेळांचा समावेश आहे. या उपक्रमांमुळे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना सहभागाची संधी मिळणार आहे. रात्री ९ ते १० या वेळेत सर्वांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून, त्यानंतर रात्री १० वाजल्यानंतर ‘जननी माता भजन मंडळ, फुरूस’ यांच्या सुमधुर भजन कार्यक्रमाने शिवजयंती उत्सवाची सांगता होणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार, शौर्य, पराक्रम आणि हिंदवी स्वराज्याची प्रेरणा जनमानसात रुजवण्यासाठी हा उत्सव अत्यंत श्रद्धेने आणि उत्साहाने साजरा करण्यात येणार आहे. या निमित्ताने सर्व शिवप्रेमी, ग्रामस्थ आणि परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन शिवभक्त मंडळ, फुरूस यांच्या वतीने करण्यात आले आहे.
Comments
Post a Comment