“शिवसेनेच्या भगव्याला पंचायत समिती–झेडपीत झेंडा फडकवायचाच” – शेवटच्या सभेत कार्यकर्त्यांचा निर्धार
“शिवसेनेच्या भगव्याला पंचायत समिती–झेडपीत झेंडा फडकवायचाच” – शेवटच्या सभेत कार्यकर्त्यांचा निर्धार
कुंभरोशी प्रतिनिधी-
महाबळेश्वर तालुक्यातील पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचाराचा शेवटचा दिवस उत्साह, जोश आणि निर्धाराच्या वातावरणात पार पडला. या पार्श्वभूमीवर झालेल्या जाहीर सभेत शिवसेनेच्या उमेदवारांच्या समर्थनार्थ कार्यकर्ते आणि मतदारांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावत प्रचाराचा समारोप केला. पंचायत समितीच्या कुंभरोशी गणाचे उमेदवार संजयदादा मोरे आणि जिल्हा परिषद तळदेव गटाचे उमेदवार अजितदादा संकपाळ यांच्या माध्यमातून उपस्थितांचे स्वागत करण्यात आले.
यावेळी बोलताना वक्त्यांनी अनेक वर्षांपासून या भागात ‘भगवा कट्टा’ शिवसेनेच्या नावाने सुरू असल्याचे नमूद केले. मात्र, प्रथमच शिवसेनेच्या अधिकृत व्यासपीठावर उभे राहण्याची संधी मिळाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. “आमच्या मनात शिवसेना होती, आहे आणि कायम राहील. आम्ही शिवसेनाच चालवत आहोत,” असे ठाम शब्दांत सांगत या निवडणुकीत पंचायत समिती व जिल्हा परिषदेत शिवसेनेचा भगवा फडकवण्याचा निर्धार जाहीर करण्यात आला.
सभेत अजितदादा संकपाळ आणि संजयदादा मोरे यांच्या कार्यशैलीचे विशेष कौतुक करण्यात आले. आतापर्यंत अनेक उमेदवार गावात आले, मात्र त्यांनी लोकांची साधी विचारपूसही केली नाही, अशी भावना व्यक्त झाली. याउलट हे दोघे उमेदवार अत्यंत साधेपणाने गावोगावी फिरून लोकांच्या समस्या समजून घेत असल्याचे सांगण्यात आले. “या भागातील एकही तरुण बेरोजगार राहू नये, ही त्यांची खरी तळमळ आहे. त्यामुळे हे दोघे उमेदवार निवडून आलेच पाहिजेत,” असा सूर संपूर्ण सभेतून उमटत होता.
यावेळी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अलीकडील दौऱ्याचाही उल्लेख करण्यात आला. त्यांच्या सभेतून तरुणांसाठी उद्योग आणि रोजगाराच्या संधी, महादेव कोळी समाजाच्या दाखल्यांचा प्रश्न, बौद्ध समाजासाठी संविधान भवन तसेच २२ गावे दत्तक घेण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय जाहीर झाल्याचे सांगण्यात आले. “२२ गावे दत्तक घेणे ही काही छोटी गोष्ट नाही. शिवसेनेच्या माध्यमातून इतके मोठे व्यासपीठ आपल्याला मिळत आहे,” असे सांगत विकासासाठी शिवसेनेला साथ देण्याचे आवाहन करण्यात आले.
प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात कार्यकर्त्यांना महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या. मतदानाच्या दिवशी वृद्ध आणि गरजू मतदारांसाठी वाहनांची व्यवस्था करण्यावर भर देण्यात आला. प्रत्येक मतदाराला चिन्ह समजावून सांगणे, मतदान होईपर्यंत त्यांच्या संपर्कात राहणे आणि शेवटच्या दोन दिवसांत निष्काळजीपणा न करता पूर्ण ताकदीने काम करण्याचे आवाहन करण्यात आले. “गेली पंधरा दिवस घेतलेल्या मेहनतीचे फळ मिळवायचे असेल, तर हे दोन दिवस अत्यंत महत्त्वाचे आहेत,” असे सांगत कार्यकर्त्यांचा उत्साह द्विगुणित करण्यात आला.
सभेच्या शेवटी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा संदर्भ देत हा सामना अंतिम फेरीसारखा असल्याचे सांगण्यात आले. “हा टी-२० वर्ल्ड कपसारखा शेवटचा सामना आहे. भवानी मातेच्या आशीर्वादाने आणि जनतेच्या ताकदीने आपण हे युद्ध जिंकणार आहोत,” अशा जोशपूर्ण शब्दांत भाषणाची सांगता झाली. अखेरीस जिल्हा परिषदेसाठी अजितदादा संकपाळ आणि पंचायत समितीसाठी संजयदादा मोरे यांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचा निर्धार करत सभेचा समारोप करण्यात आला.
या सभेला शिवसेनेचे ज्येष्ठ नेते व माजी आमदार दगडू दादा सपकाळ यांची प्रमुख उपस्थिती आणि मार्गदर्शन लाभले. त्यांच्या उपस्थितीमुळे वातावरणात आणखी जोश निर्माण झाला. कार्यक्रमाच्या शेवटी संभाजी जाधव यांनी उपस्थितांचे आभार मानले.
Comments
Post a Comment