सातारा जिल्हा परिषदेवर महायुतीचाच झेंडा फडकेल; स्थानिक समीकरणांनुसार निर्णय होईल — उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
सातारा जिल्हा परिषदेवर महायुतीचाच झेंडा फडकेल; स्थानिक समीकरणांनुसार निर्णय होईल — उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
प्रतापगड प्रतिनिधी —
राज्यातील विधानसभा, जिल्हा परिषद, महानगरपालिका आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये जनतेने महायुतीला स्पष्ट कौल दिला असून, तोच जनादेश स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही मान्य केला जाईल. सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाबाबत निर्माण झालेल्या त्रिशंकू परिस्थितीत स्थानिक राजकीय समीकरणांनुसार महायुतीच विजयी होईल, असा ठाम विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.
उपमुख्यमंत्री शिंदे हे शुक्रवारी रात्री दरे गावात मुक्कामी आले होते. शनिवारी सायंकाळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सातारा जिल्हा परिषदेतील राजकीय घडामोडींवर स्पष्ट भूमिका मांडली. जिल्ह्यात भाजपने मित्र पक्षांनाच लक्ष्य केले, या प्रश्नावर बोलताना ते म्हणाले की, निवडणुकीदरम्यान आरोप-प्रत्यारोप होत असतात. मात्र, राज्यात महायुतीचे सरकार असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात आणि राज्यात एनडीए एकजुटीने काम करत आहे. गेल्या साडेतीन वर्षांत महाराष्ट्राला विकासाच्या मार्गावर पुढे नेण्याचे काम आम्ही केले असून, त्याची पोचपावती जनतेने निवडणुकांच्या माध्यमातून दिली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही लोकांनी आम्हाला पाठिंबा दिला, असे त्यांनी स्पष्ट केले.
कोयना पर्यटन महोत्सवाबाबत विचारले असता, त्यांनी सांगितले की, पालकमंत्री शंभूराजे देसाई यांनी यासाठी चांगली तयारी केली होती. माझ्यासह मुख्यमंत्र्यांशी याबाबत चर्चा झाली आहे. सध्याची परिस्थिती पाहून कोयना पर्यटन महोत्सव आयोजित करण्यात येईल आणि तो केवळ एक-दोन दिवसांचा नसून लोकांना आनंद देणारा, पर्यटनाला चालना देणारा उत्सव असेल. येथील निसर्गसौंदर्य जगासमोर यावे आणि स्थानिक लोकांना त्याचा आर्थिक लाभ मिळावा, यासाठी पर्यटन विभागाकडून नियोजन सुरू आहे, असे त्यांनी सांगितले.
मालेगाव न्यायालयात संजय राऊत यांनी मंत्री दादा भुसे आणि शेतकऱ्यांची माफी मागितल्याबाबत विचारले असता, शिंदे म्हणाले की, न्यायालयाने माफी मागण्याचे आदेश दिले होते आणि त्यांनी माफी मागितल्याने विषय संपला आहे.
एआय समिटदरम्यान काँग्रेसकडून करण्यात आलेल्या अर्धनग्न आंदोलनावर तीव्र शब्दांत टीका करताना शिंदे म्हणाले की, हा प्रकार अत्यंत दुर्दैवी आणि निषेधार्ह आहे. जगभरातील मान्यवर या समिटसाठी आले असताना काँग्रेसने चड्डी-बनियन आंदोलन करून देशाची प्रतिमा मलीन केली. काँग्रेस नेते राहुल गांधी हे देशात किंवा विदेशात गेले की नेहमी भारताची बदनामी करतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाची अर्थव्यवस्था पाचव्या क्रमांकावरून चौथ्या क्रमांकावर आली असून आता तिसऱ्या क्रमांकाकडे वाटचाल सुरू आहे. त्यामुळे काँग्रेसमध्ये अस्वस्थता आणि जळफळाट दिसून येतो. ऑपरेशन सिंदूरच्या वेळीही काँग्रेसने जवानांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. हे देशप्रेम आहे की देशद्रोह, याचा विचार जनतेने केला पाहिजे, असेही ते म्हणाले.
याचवेळी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इम्यानुएल मॅक्रॉन यांच्या भारत दौऱ्याचा उल्लेख करत शिंदे म्हणाले की, मुंबईत मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करार झाले, हे देशासाठी अभिमानास्पद आहे. २०१४ पूर्वी अशा प्रकारची परदेशी गुंतवणूक कधी झाली नव्हती. त्यामुळेच काँग्रेसकडून अशा प्रकारची आंदोलने करून देशाची बदनामी केली जात आहे. या प्रकाराला देशभरातून तीव्र निषेध व्यक्त होत असून, काँग्रेसने यातून बोध घ्यावा, असेही त्यांनी स्पष्ट केले.
नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत १०५ गावांतील जनतेने शिवसेनेला भरभरून आशीर्वाद दिल्याबद्दल उपमुख्यमंत्री शिंदे यांनी जनतेचे आभार मानले. या भागात तरुणांना रोजगारासाठी शहरांकडे स्थलांतर करावे लागू नये, म्हणून स्थानिक उद्योग आणि पर्यटनाला चालना देण्यात येत आहे. नवीन महाबळेश्वर साकारत असून, पुलांची कामे, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र जोडणारे रस्ते प्रकल्प वेगाने सुरू आहेत. सर्वसामान्य जनतेसाठी केलेल्या विकासकामांची पोचपावती म्हणूनच लोकांनी हा कौल दिला असल्याचे त्यांनी सांगितले.
पालकमंत्री शंभूराज देसाई आणि मंत्री मकरंद पाटील यांच्यासोबत झालेल्या बैठकीत ग्रीन सिग्नल दिल्याबाबत विचारले असता, पत्रकारांची फिरकी घेत शिंदे म्हणाले, त्यांनी तुम्हाला सांगितले का, तुमच्याशी ते बोलले का, आधी त्यांनाच विचारा. महाराष्ट्रभरातून लोक मला भेटायला येतात, असे सांगत त्यांनी या विषयावर अधिक भाष्य टाळले.
एकूणच, सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदावर महायुतीचाच झेंडा फडकणार, असा ठाम सूर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वक्तव्यातून उमटला.
Comments
Post a Comment