पाचगणी–लिंगमळा–महाबळेश्वर रस्ते डांबरीकरणासाठी शिवसेनेचा पाठपुरावा; एमएसआयडीसी अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा
पाचगणी–लिंगमळा–महाबळेश्वर रस्ते डांबरीकरणासाठी शिवसेनेचा पाठपुरावा; एमएसआयडीसी अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा
महाबळेश्वर प्रतिनिधी :
पाचगणी–लिंगमळा–महाबळेश्वर या अत्यंत महत्त्वाच्या पर्यटन व दळणवळण मार्गाच्या डांबरीकरणाबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शहर शाखेच्या वतीने ठोस पावले उचलण्यात आली असून, या संदर्भात एमएसआयडीसीचे मुख्य कार्यकारी अभियंता श्री. संतोष भंपलवार, टीम लीडर श्री. मोहन हांडे व त्यांच्या सहकाऱ्यांबरोबर महाबळेश्वर ते अवकळी दरम्यानच्या रस्त्यावरील विविध अडचणींबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
या बैठकीत रस्त्याची सद्यस्थिती, डांबरीकरणात येणाऱ्या तांत्रिक अडचणी, पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या समस्या, वाहतुकीवर होणारा परिणाम तसेच स्थानिक नागरिक, पर्यटक आणि व्यावसायिकांना भेडसावणाऱ्या अडचणी यावर सखोल विचारविनिमय करण्यात आला. रस्त्याचे काम दर्जेदार, टिकाऊ आणि वेळेत पूर्ण होणे अत्यंत आवश्यक असल्याचे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी स्पष्ट केले.
या चर्चेप्रसंगी शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख श्री. राजेश कुंभारदरे, महाबळेश्वर नगरचे नगरसेवक व भाजप जिल्हा सरचिटणीस श्री. रविंद्र कुंभारदरे, शिवसेना शहरप्रमुख श्री. राजाभाऊ गुजर, विभाग प्रमुख श्री. शंकर ढेबे, प्रशांत मोरे, शहरातील व्यावसायिक श्री. आशिष नायडू, श्री. केतन यादव, श्री. रमेश शिंदे, पत्रकार प्रेषित गांधी, महाबळेश्वर पोलीस स्टेशनचे श्री. वैभव भिलारे, असिफ भाई महापुळे, श्री. अंकुश ऊलालकर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
महाबळेश्वर हे आंतरराष्ट्रीय पर्यटनस्थळ असून पाचगणी–लिंगमळा–महाबळेश्वर हा रस्ता पर्यटकांसाठी जीवनवाहिनी मानला जातो. मात्र गेल्या काही काळापासून रस्त्याची दुरवस्था झाल्याने अपघातांचे प्रमाण वाढले असून पर्यटन व्यवसायावरही त्याचा परिणाम होत आहे. त्यामुळे डांबरीकरणाचे काम तातडीने सुरू करून नागरिकांना दिलासा देण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
एमएसआयडीसीच्या अधिकाऱ्यांनीही रस्त्यावरील अडचणी समजून घेत लवकरात लवकर योग्य तो तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शहर शाखेच्या या पुढाकारामुळे पाचगणी–लिंगमळा–महाबळेश्वर रस्त्याच्या प्रश्नाला गती मिळेल, अशी अपेक्षा स्थानिक नागरिक आणि व्यावसायिकांकडून व्यक्त होत आहे.
Comments
Post a Comment