कुंभरोशी गणात राष्ट्रवादीचा प्रचार जोरात; सचिन उतेकरांसाठी मित्रमंडळी मैदानात
कुंभरोशी गणात राष्ट्रवादीचा प्रचार जोरात; सचिन उतेकरांसाठी मित्रमंडळी मैदानात
कुंभरोशी प्रतिनिधी –
कुंभरोशी गणात पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराला वेग आला असून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सचिन उतेकर यांच्या प्रचारासाठी त्यांचे मित्रमंडळी थेट मैदानात उतरली आहेत. क्षेत्र महाबळेश्वर चे सरपंच सुनील बिरामणे, मांघर–मधाचेगावचे सरपंच गणेश जाधव, प्रदीप कात्रट यांच्यासह राष्ट्रवादीचे कार्यकर्ते व समर्थकांनी कुंभरोशी गणातील विविध गावांमध्ये घराघरांत भेटी देत मतदारांशी थेट संवाद साधला.
या प्रचार दौऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसने आतापर्यंत केलेल्या विकासकामांचा आढावा घेत भविष्यातील विकासाचा आराखडा नागरिकांसमोर मांडण्यात आला. स्थानिक प्रश्न, पाणीपुरवठा, रस्ते, शेती, रोजगार आणि युवकांच्या संधी याबाबत सचिन उतेकर यांच्या नेतृत्वाखाली प्रभावी काम करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
प्रचारादरम्यान मतदारांना ईव्हीएम मशीनबाबत सविस्तर माहिती देण्यात आली असून मतदानाच्या दिवशी कोणते बटन दाबावे, मतदानाची प्रक्रिया कशी असते याबाबत समजावून सांगण्यात आले.राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही उमेदवार हे सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी कायम उपलब्ध राहिले असून जनतेच्या विश्वासावरच निवडणूक लढवत असल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले. कुंभरोशी गणाच्या सर्वांगीण विकासासाठी सचिन उतेकर यांना आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांना मत देण्याचे आवाहन यावेळी नागरिकांना करण्यात आले. या प्रचार मोहिमेला नागरिकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत असून कुंभरोशी गणातील निवडणूक लढतीत राष्ट्रवादीचा प्रचार अधिक आक्रमक होत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.
Comments
Post a Comment