कृष्णा तीरावर २०२८ मध्ये ‘कन्यागत महापर्वकाल’ : महाबळेश्वर ते नृसिंहवाडी भक्तीचा महासोहळा
प्रतिनिधी | महाबळेश्वर
गुरू ग्रहाच्या कन्या राशीतील प्रवेशामुळे दर बारा वर्षांनी साजरा होणारा ‘कन्यागत महापर्वकाल’ हा कृष्णा नदीच्या तीरावरचा अत्यंत पवित्र आणि ऐतिहासिक धार्मिक उत्सव असून, २०२८ साली हा महापर्व पुन्हा एकदा संपूर्ण कृष्णा खोऱ्यात मोठ्या श्रद्धा, भक्ती आणि उत्साहात साजरा होणार आहे. महापर्वकाल म्हणजे महान पुण्यकाळ. ज्या काळात गंगा नदी स्थानिक नद्यांमध्ये अवतरते, अशी धार्मिक श्रद्धा असून, या पर्वकाळात स्नान, दान, जप, तप, पूजन यांना विशेष पुण्यप्राप्ती होते, अशी मान्यता आहे.
गुरू ग्रहाला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यास बारा वर्षे लागतात. त्यामुळे दरवर्षी गुरू वेगवेगळ्या राशीत प्रवेश करतो. गुरू कुंभ राशीत गेला की गंगा नदीच्या तीरावर कुंभमेळा, सिंह राशीत गेला की गोदावरीच्या तीरावर सिंहस्थ कुंभमेळा साजरा होतो. त्याचप्रमाणे गुरू कन्या राशीत प्रवेश करताच कृष्णा नदीच्या तीरावर ‘कन्यागत महापर्वकाल’ साजरा केला जातो. हा पर्वकाळ कृष्णा नदीच्या उगमापासून ती सागराला मिळेपर्यंत संपूर्ण प्रवाहात भक्तिभावाने पाळला जातो.
महाबळेश्वर हे कृष्णा, कोयना, वेण्णा, सावित्री, गायत्री या पाच नद्यांचे उगमस्थान असून येथे सात पवित्र कुंडे आहेत. यापैकी सरस्वती व भागीरथी या कुंडांचे विशेष धार्मिक महत्त्व आहे. कपिला षष्ठी योगाला दर साठ वर्षांनी एकदा सरस्वती कुंडातून जलप्रवाह सुरू होतो, तर भागीरथी कुंड तब्बल अकरा वर्षे कोरडे राहते. मात्र गुरू कन्या राशीत प्रवेश करताच या कुंडातून वर्षभर अखंड पाणी वाहू लागते. यालाच ‘गंगा नदी कृष्णा नदीच्या भेटीला आली’ असे मानले जाते. हीच घटना कन्यागत महापर्वकालाचे मुख्य धार्मिक अधिष्ठान मानली जाते.
महाबळेश्वर, वाई आणि नृसिंहवाडी ही कन्यागत महापर्वाची प्रमुख केंद्रे मानली जात असली, तरी माहुली, कऱ्हाड, औदुंबर, कोळे-नरसिंहपूर, ब्रह्मनाळ, हरिपूर-सांगली, गणेशवाडी, अमरापूर, शिरोळ, कुरुंदवाड, खिद्रापूर, उगार, कुरवपूर, पाताळगंगा (श्रीशैल्यम), कर्दळीवन यांसह असंख्य ठिकाणी हा पर्वकाळ मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो. संपूर्ण कृष्णा खोरे या काळात भक्ती, अध्यात्म आणि संस्कृतीने भारावून जाते.
तथापि, गंगा व गोदावरीच्या कुंभमेळ्याप्रमाणे कन्यागत महापर्वाला अद्याप व्यापक प्रसिद्धी मिळालेली नाही. आगामी २०२८ च्या महापर्वकालाच्या पार्श्वभूमीवर हा पर्व अधिक व्यापक स्तरावर पोहोचावा, यासाठी धार्मिक प्रचार, घाटांचा विकास, आधुनिक सुविधा, धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन आणि पर्यटनाला चालना देणे आवश्यक असल्याचे मत श्री क्षेत्र महाबळेश्वरचे श्री. प्रदीप कात्रट यांनी व्यक्त केले आहे.
धार्मिक ग्रंथ, पुस्तिका, सोशल मीडिया, टीव्ही, रेडिओ आणि वृत्तपत्रांद्वारे कन्यागत महापर्वाचे महत्त्व जनतेपर्यंत पोहोचवणे, संत, महंत आणि धर्मगुरूंच्या माध्यमातून जनजागृती करणे, कृष्णा नदीवरील घाटांचे सुशोभीकरण, स्वच्छता, प्रकाश, पिण्याचे पाणी व सुरक्षित स्नानाची व्यवस्था करणे, कीर्तन, प्रवचन, भजन, महाआरती, धार्मिक सभा यांचे भव्य आयोजन करणे, तसेच शासनाने विशेष निधी व पर्यटन विभागाने स्वतंत्र योजना राबविणे, अशा विविध उपाययोजना सुचविण्यात आल्या आहेत.
योग्य नियोजन, भक्कम प्रचार आणि आधुनिक सुविधा उपलब्ध झाल्यास कन्यागत महापर्वकाल हे गंगा व गोदावरीप्रमाणे देशपातळीवर प्रसिद्ध होऊ शकते. त्यामुळे कृष्णा नदीच्या घाटांना धार्मिक व पर्यटनाच्या दृष्टीने मोठे महत्त्व प्राप्त होईल आणि महाबळेश्वर, वाई, नृसिंहवाडी यांसह संपूर्ण कृष्णा खोऱ्याचा सांस्कृतिक, धार्मिक आणि आर्थिक विकास साधला जाईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
Comments
Post a Comment