कुंभरोशी गणच्या सर्वांगीण विकासासाठी राष्ट्रवादीचा जाहीरनामा; मूलभूत सुविधांवर ठाम भर
कुंभरोशी गणच्या सर्वांगीण विकासासाठी राष्ट्रवादीचा जाहीरनामा; मूलभूत सुविधांवर ठाम भर
महाबळेश्वर प्रतिनिधी :
जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६च्या पार्श्वभूमीवर महाबळेश्वर तालुक्यातील कुंभरोशी गणासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार श्री. सचिन श्रीरंग उतेकर यांनी सर्वसमावेशक विकासाचा जाहीरनामा जाहीर केला आहे. ‘कुंभरोशी गणचा विकास, राष्ट्रवादीचा विश्वास’ या भूमिकेतून मांडण्यात आलेल्या या जाहीरनाम्यात कोयना खोऱ्यातील अतिपावसाचा, दुर्गम आणि निसर्गसंपन्न भाग असलेल्या कुंभरोशी गणातील जनतेच्या दैनंदिन अडचणी केंद्रस्थानी ठेवण्यात आल्या आहेत.
जाहीरनाम्यात शेती, शिक्षण, आरोग्य, रस्ते, वीज, पाणीपुरवठा आणि रोजगार या मूलभूत गरजांना सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले असून टिकाऊ आणि दर्जेदार विकासाचा संकल्प व्यक्त करण्यात आला आहे. अंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरण, खराब वीज खांब व तारा बदलणे, गावोगावी स्ट्रीट लाईट सुविधा उपलब्ध करून देणे तसेच अतिवृष्टी लक्षात घेऊन निकृष्ट दर्जाच्या कामांना आळा घालण्याचा ठाम निर्धार व्यक्त करण्यात आला आहे.
पाणीपुरवठा व स्वच्छतेच्या बाबतीत प्रत्येक गावात शुद्ध आणि नियमित पाणीपुरवठा, नळ पाणी योजनांचे मजबुतीकरण आणि स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छ गावासाठी विशेष प्रयत्न करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. आरोग्य सुविधांमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रांतील सुविधा वाढवणे, मोफत आरोग्य तपासणी शिबिरे आयोजित करणे तसेच माता व बाल आरोग्य योजनांचा प्रभावी लाभ मिळवून देण्यावर भर देण्यात आला आहे.
शिक्षण आणि युवक विकासासाठी शाळांमध्ये डिजिटल सुविधा उपलब्ध करून देणे, मूलभूत सोयीसुविधा वाढवणे, गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळवून देणे आणि युवकांसाठी कौशल्य विकास व रोजगार प्रशिक्षणाच्या संधी निर्माण करण्याचा संकल्प जाहीरनाम्यात नमूद करण्यात आला आहे. महिला व सामाजिक विकासासाठी महिलांच्या बचत गटांना आर्थिक बळकटी, महिला स्वयंरोजगार प्रशिक्षण तसेच विधवा, वृद्ध आणि दिव्यांगांना शासकीय योजनांचा लाभ प्रभावीपणे मिळवून देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.
पारदर्शक आणि लोकाभिमुख कारभार हा जाहीरनाम्याचा केंद्रबिंदू असून सर्व योजनांचा लाभ प्रत्येक घरापर्यंत पोहोचवणे, जनतेसाठी सदैव उपलब्ध राहणारा प्रतिनिधी आणि विकासासाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा करण्याची ग्वाही देण्यात आली आहे. कुंभरोशी गणच्या उज्ज्वल भविष्यासाठी विकास आणि विश्वास यांची सांगड घालणारा हा जाहीरनामा मतदारांमध्ये चर्चेचा विषय ठरत असून येणाऱ्या निवडणुकीत त्याचा प्रभाव महत्त्वाचा ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Comments
Post a Comment