बिग ब्रेकिंग : कुंभरोशी गणात शिवसेनेचा झेंडा, पंचायत समितीत संजय मोरे विजयी; जिल्हा परिषदेत अजित संकपाळांची भक्कम आघाडी
बिग ब्रेकिंग : कुंभरोशी गणात शिवसेनेचा झेंडा, पंचायत समितीत संजय मोरे विजयी; जिल्हा परिषदेत अजित संकपाळांची भक्कम आघाडी
महाबळेश्वर प्रतिनिधी
महाबळेश्वर तालुक्यातील कुंभरोशी गणात मतमोजणीच्या चौथ्या फेरीअखेर राजकीय चित्र पूर्णपणे स्पष्ट झाले असून पंचायत समितीत शिवसेनेचे उमेदवार संजय मोरे यांनी दणदणीत विजय मिळवला आहे, तर जिल्हा परिषद गटात शिवसेनेचे अजित संकपाळ यांनी निर्णायक आघाडी घेत आपला विजय जवळपास निश्चित केला आहे. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीत प्रत्येक फेरीत आघाडी बदलत राहिल्याने शेवटपर्यंत कमालीची उत्कंठा निर्माण झाली होती.
जिल्हा परिषद गटासाठी चौथ्या फेरीत राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय गायकवाड यांना 240 मते मिळाली असून त्यांची एकूण मते 2438 झाली आहेत. शिवसेनेचे अजित संकपाळ यांनी या फेरीत 674 मते मिळवत एकूण 2949 मतांपर्यंत मजल मारली असून त्यांनी मोठी आघाडी घेतली आहे. भाजपचे सुभाष सोंडकर यांना चौथ्या फेरीत 13 मते मिळाली असून त्यांची एकूण मते 440 झाली आहेत. आतापर्यंतच्या एकूण मतमोजणीत अजित संकपाळ यांनी संजय गायकवाड यांच्यावर सुमारे 511 मतांची आघाडी घेतल्याने जिल्हा परिषद गटात शिवसेनेचा विजय जवळपास निश्चित मानला जात आहे.
दरम्यान, पंचायत समिती गणाचा अंतिम निकाल जाहीर झाला असून शिवसेनेचे उमेदवार संजय मोरे यांनी बाजी मारली आहे. चौथ्या फेरीत संजय मोरे यांना तब्बल 774 मते मिळाली असून त्यांची एकूण मते 2772 झाली आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे सचिन उतेकर यांना या फेरीत 157 मते मिळून त्यांची एकूण मते 2019 वरच थांबली आहेत. भाजपचे सुरेश जाधव यांना 22 मते मिळून त्यांची एकूण मते 268 झाली आहेत. अपक्ष समीर चव्हाण यांना 15 मते मिळून एकूण 180, तर अपक्ष सनी मोरे यांना 1 मत मिळून एकूण 87 मते मिळाली आहेत.
पंचायत समितीत संजय मोरे यांनी 753 मतांच्या मोठ्या फरकाने विजय मिळवल्याने कुंभरोशी गणात शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. फटाके फोडून, घोषणा देत आणि एकमेकांना शुभेच्छा देत कार्यकर्त्यांनी आनंद साजरा केला. पहिल्या दोन फेऱ्यांत राष्ट्रवादी आघाडीवर असतानाही तिसऱ्या व चौथ्या फेरीत शिवसेनेने जोरदार मुसंडी मारत दोन्ही ठिकाणी निर्णायक आघाडी घेतल्याने हा निकाल अत्यंत नाट्यमय ठरला आहे.
या निकालामुळे महाबळेश्वर तालुक्यातील राजकीय समीकरणांवर मोठा परिणाम होणार असून पंचायत समिती व जिल्हा परिषदेमधील सत्तास्थापनेत कुंभरोशी गणाचा निकाल अत्यंत निर्णायक ठरणार आहे.
Comments
Post a Comment