पेटीट लायब्ररी शेजारील दुकाने अंधारात; नगरपालिकेच्या दिरंगाईमुळे भूमिपुत्रांची रोजीरोटी धोक्यात

पेटीट लायब्ररी शेजारील दुकाने अंधारात; नगरपालिकेच्या दिरंगाईमुळे भूमिपुत्रांची रोजीरोटी धोक्यात

महाबळेश्वर (सादिक सय्यद) :

महाबळेश्वर शहरातील पेटीट लायब्ररी शेजारी असलेल्या दुकानांमध्ये सध्या मूलभूत सुविधांचा अभाव असून, अनेक दुकानदार वीजपुरवठ्याविना व्यवसाय करण्यास भाग पडत असल्याचे वास्तव समोर आले आहे. कायदेशीर बाबींच्या नावाखाली नगरपालिकेकडून या दुकानांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप स्थानिक दुकानदारांकडून होत आहे. त्यामुळे पर्यटन नगरीत व्यवसाय करणाऱ्या स्थानिक भूमिपुत्रांच्या रोजीरोटीचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

या परिसरातील दुकाने गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असून ती स्थानिक कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचे एकमेव साधन आहेत. मात्र वीजजोडणी नसल्याने लाईट, पंखे, फ्रिज, कॅश काउंटर तसेच डिजिटल पेमेंट यंत्रणा बंद अवस्थेत आहेत. परिणामी ग्राहकांची संख्या घटली असून संध्याकाळनंतर संपूर्ण परिसर अंधारात जात आहे. त्यामुळे चोरी, गैरप्रकार आणि असामाजिक तत्वांचा वावर वाढण्याची भीती दुकानदार व्यक्त करत आहेत. व्यवसायावर परिणाम झाला असतानाच सुरक्षिततेचाही प्रश्न गंभीर बनला आहे.

या दुकानांकडे केवळ नियमांच्या चौकटीतून न पाहता प्रत्यक्ष परिस्थितीचा विचार करणे आवश्यक असल्याचे मत दुकानदारांनी व्यक्त केले. अनेक दुकाने ही स्थानिक भूमिपुत्रांची असून योग्य नियोजन व नियमांनुसार प्रक्रिया राबवून त्यांना अधिकृत करता येणे शक्य आहे. मात्र नगरपालिकेकडून इच्छाशक्तीचा अभाव असल्याने हा प्रश्न वर्षानुवर्षे प्रलंबित ठेवला जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे.

नगरपालिकेने नियमांचा बडगा उगारण्याऐवजी सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवणे गरजेचे आहे. प्रथम तातडीने तात्पुरती वीजजोडणी देऊन दुकानदारांचा व्यवसाय सुरळीत करावा व त्यानंतर नियमानुसार प्रक्रिया पूर्ण करून या दुकानांना अधिकृत दर्जा द्यावा, अशी स्पष्ट व ठाम मागणी स्थानिकांकडून होत आहे. विकासाच्या नावाखाली स्थानिक भूमिपुत्रांचे पोट उपाशी ठेवणे योग्य आहे का, असा थेट सवालही उपस्थित केला जात आहे.

जर नगरपालिकेने लवकरात लवकर निर्णय घेतला नाही, तर दुकानदारांना रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याशिवाय पर्याय उरणार नाही, असा इशाराही देण्यात आला आहे. न्याय्य व मानवी धोरण राबवून स्थानिकांच्या रोजीरोटीचा प्रश्न मार्गी लावणे ही काळाची गरज असून, आता या प्रकरणी नगरपालिका नेमकी काय भूमिका घेते याकडे संपूर्ण महाबळेश्वर तालुक्याचे लक्ष लागले आहे.

Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl