“आधी मतदान, मग लग्न!” – महाबळेश्वरमध्ये नवरदेवाने दिला लोकशाहीचा आदर्श
“आधी मतदान, मग लग्न!” – महाबळेश्वरमध्ये नवरदेवाने दिला लोकशाहीचा आदर्श
महाबळेश्वर प्रतिनिधी-
महाबळेश्वरतालुक्यात सुरू असलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एक अत्यंत प्रेरणादायी आणि लोकशाहीचा खरा अर्थ अधोरेखित करणारी घटना आज घडली. लग्नाच्या घाईतही मतदानाला प्राधान्य देत नवविवाहित नवरदेवाने आधी मतदानाचा हक्क बजावला आणि त्यानंतर विवाह सोहळ्यासाठी रवाना होत नागरिकांसमोर एक आदर्श निर्माण केला.
महाबळेश्वर येथील तांदूळनही वस्ती परिसरातील रहिवासी मंगेश चंद्रकांत ढेबे हे आज विवाहबंधनात अडकणार होते. मात्र लग्नाच्या तयारीत व्यस्त असतानाही त्यांनी ‘आधी मतदान, मग लग्न’ हा संदेश देत सकाळी बूथ क्रमांक २, क्षेत्र महाबळेश्वर येथे जाऊन मतदान केले. पारंपरिक पोशाखात, नवरदेवाच्या वेषात मतदान केंद्रावर दाखल झालेल्या मंगेश ढेबे यांचे दृश्य उपस्थित मतदारांमध्ये विशेष आकर्षणाचे ठरले. अनेक नागरिकांनी त्यांच्या या कृतीचे कौतुक करत त्यांना शुभेच्छा दिल्या.
लोकशाहीचा उत्सव असलेल्या निवडणुकीत प्रत्येक नागरिकाने आपला मतदानाचा हक्क बजावावा, ही जबाबदारी ओळखून मंगेश ढेबे यांनी लग्नाच्या दिवशीही मतदानासाठी वेळ काढला. त्यांच्या या निर्णयामुळे मतदानाबाबत जनजागृती झाली असून, विशेषतः तरुण वर्गात मतदानाबद्दल सकारात्मक संदेश पोहोचला आहे.
महाबळेश्वर तालुक्यात शांततेत आणि उत्साहात सुरू असलेल्या मतदान प्रक्रियेत अशा घटनांमुळे लोकशाहीवरील नागरिकांचा विश्वास अधिक दृढ होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. नवरदेव मंगेश ढेबे यांच्या या कृतीमुळे ‘मतदान हे सर्वोच्च कर्तव्य’ हा संदेश सर्वदूर पोहोचत असून, लोकशाहीच्या बळकटीसाठी अशा जबाबदार नागरिकांची गरज असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.
Comments
Post a Comment