आंधळीमध्ये भव्य बैलगाडी शर्यतीचा थरार; मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत ग्रामीण संस्कृतीचा उत्सव
आंधळीमध्ये भव्य बैलगाडी शर्यतीचा थरार; मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत ग्रामीण संस्कृतीचा उत्सव
✍️ विजय जाधव,
सातारा प्रतिनिधी :
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत माण तालुक्यातील आंधळी (जि. सातारा) येथे ग्रामपंचायत आंधळीच्या वतीने भव्य दिव्य बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे. ग्रामीण परंपरा, शौर्य, मेहनत आणि शेतकरी संस्कृतीचा अभिमान जपणाऱ्या या थरारक शर्यती पाहण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सरपंच दादासाहेब काळे यांनी केले आहे.
ही स्पर्धा गुरुवार, दि. २६ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ वाजता आंधळी ते टाकेवाडी रोडवर होणार असून, महाराष्ट्राच्या विविध भागांतील नामवंत बैलगाडी संघांचा सहभाग अपेक्षित आहे. अत्यंत चुरशीच्या आणि कौशल्यपूर्ण लढतींचे साक्षीदार होण्याची संधी या निमित्ताने ग्रामस्थांना आणि परिसरातील नागरिकांना मिळणार आहे.
या शर्यतीमध्ये प्रथम क्रमांकासाठी ६१ हजार रुपये, द्वितीय ४९ हजार रुपये, तृतीय ३१ हजार रुपये, चौथा २१ हजार रुपये, सहावा १० हजार रुपये आणि सातवा ६ हजार रुपये अशी आकर्षक रोख पारितोषिके तसेच दोन मानाच्या ढाली देण्यात येणार आहेत. याशिवाय क्वार्टर फायनलपर्यंत पोहोचणाऱ्या प्रत्येक बैलगाडीला २ हजार रुपयांचे पारितोषिक आणि दोन मानाच्या ढाली दिल्या जाणार आहेत. स्पर्धेसाठी प्रवेश फी ७०० रुपये ठेवण्यात आली आहे.
कार्यक्रमाला अखिल भारतीय बैलगाडी संघटना, महाराष्ट्र राज्य यांचे मार्गदर्शन लाभणार असून, प्रमुख पाहुणे म्हणून संघटनेचे राज्य सचिव पै. विलास देशमुख (वाई) उपस्थित राहणार आहेत. अनुभवी पंच, कुशल उद्घोषक आणि नियोजनबद्ध संयोजकांच्या उपस्थितीत शर्यतीचे आयोजन काटेकोर नियमांचे पालन करून केले जाणार आहे.
ग्रामीण खेळ संस्कृतीचे जतन व संवर्धन करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या बैलगाडी शर्यतीमुळे आंधळी गाव पुन्हा एकदा चर्चेचा केंद्रबिंदू ठरणार आहे. पारंपरिक खेळांचा आनंद लुटत ग्रामीण जीवनशैलीचा अनुभव घेण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
Comments
Post a Comment