तळदेव गटात ‘धनुष्यबाण’ वेगात; इतर पक्ष बॅकफुटवर गेल्याची राजकीय चर्चा
तळदेव गटात ‘धनुष्यबाण’ वेगात; इतर पक्ष बॅकफुटवर गेल्याची राजकीय चर्चा
✍️ अक्षय गोरे
बामणोली प्रतिनिधी –
महाबळेश्वर तालुक्यातील तळदेव जिल्हा परिषद गटातील निवडणूक प्रचार आता निर्णायक टप्प्यावर पोहोचला असून शिवसेनेच्या ‘धनुष्यबाण’ चिन्हाने जोरदार मुसंडी मारल्याचे चित्र स्पष्टपणे दिसत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अत्यंत निकटवर्तीय आणि शिवसेनेचे उमेदवार अजित सपकाळ यांनी प्रचारात आघाडी घेतल्याने राष्ट्रवादी काँग्रेस बॅकफुटवर गेल्याची चर्चा गटात रंगू लागली आहे.
महाबळेश्वर तालुक्याचे भूमिपुत्र आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यात झालेल्या विकासकामांचा प्रभाव थेट निवडणूक रणांगणात दिसू लागला आहे. तळदेव गटातून निवडणूक लढवत असलेल्या अजित सपकाळ यांच्या प्रचाराला पारंपरिक पद्धतींसोबतच हायटेक माध्यमांची जोड मिळाल्याने त्यांच्या प्रचाराचा झंझावात निर्माण झाला आहे. घरोघरी भेटी, प्रचार फेऱ्या, कोपरा सभा यांसोबतच समाज माध्यमांवरही त्यांच्या प्रचाराचा धडाका सुरू असून त्यामुळे तळदेव गटात ‘धनुष्यबाण’ सुसाट सुटल्याचे वातावरण आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाबळेश्वर तालुक्यात राबवलेल्या विकासकामांचा लेखाजोखा आणि आगामी विकासाचा अजेंडा डिजिटल माध्यमांतून थेट मतदारांपर्यंत पोहोचवण्यात अजित सपकाळ यशस्वी ठरले आहेत. शिंदे यांच्या कामांचे ‘रिपोर्ट कार्ड’च त्यांनी जनतेसमोर ठेवल्याने मतदारांमध्ये सकारात्मक प्रतिसाद दिसून येत आहे. यामध्ये १०५ गावांतील रस्ते विकासकामे, महाबळेश्वर–तापोळा–खेड परिसरातील कोट्यवधी रुपयांचे रस्ते प्रकल्प, कोयना जलाशयावरील केबल-स्टे ब्रिज, नवीन महाबळेश्वर प्रकल्प, उत्तरेश्वर मंदिर विकास कार्यक्रम तसेच तापोळ्यासारख्या १०५ गावांच्या बाजारपेठेत उभारण्यात येत असलेले अत्याधुनिक सुसज्ज हॉस्पिटल आदी महत्त्वाच्या कामांचा समावेश आहे. या विकासकामांमुळे तालुक्यात विकासाची गंगा वाहत असल्याची भावना गावागावांतून व्यक्त होत असून अजित सपकाळ यांना मोठा जनसमर्थन लाभत आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून गावोगावी प्रत्यक्ष काम करून सर्वसामान्य नागरिक आणि गोरगरिबांच्या समस्या सोडवण्यात आल्याने जनतेचा त्यांच्यावरचा विश्वास अधिक दृढ झाला आहे. याच विश्वासाच्या जोरावर अजित सपकाळ यांचा प्रचार अधिक बळकट होत असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे.
या निवडणुकीत महिला शक्तीनेही शिवसेनेला मोठे बळ दिले आहे. तळदेव गटातील गावागावांत ‘लाडक्या बहिणींनी’ स्वतः पुढाकार घेत शिवसेनेचा भगवा हाती घेतला असून महाबळेश्वरमध्ये भगवा फडकणारच, असा ठाम संदेश त्या देत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
दरम्यान, प्रचारादरम्यान बोलताना अजित सपकाळ यांनी सांगितले की, सर्वसामान्य जनतेच्या आग्रहास्तव मी निवडणूक रिंगणात उतरलो आहे. तापोळा, कांदाटी, वाडा-कुंभरोशीसह संपूर्ण तळदेव गटातील गावांचा सर्वांगीण विकास हाच माझा ध्यास असून नागरिकांच्या सेवेसाठी मी अहोरात्र झटणार आहे. तुमच्या हक्काचा प्रतिनिधी जिल्हा परिषदेत पाठवून विकासाचे नवे पर्व उभे करण्यासाठी मला साथ द्या, असे भावनिक आवाहनही त्यांनी केले.
एकीकडे भक्कम विकासकामांची पार्श्वभूमी आणि दुसरीकडे गावागावांत पसरलेले मजबूत कार्यकर्त्यांचे जाळे यामुळे तळदेव गटात अजित सपकाळ यांचे पारडे जड मानले जात आहे. त्यामुळे शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी या थेट लढतीत नेमके कोणाचे पारडे जड ठरणार, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
Comments
Post a Comment