महाशिवरात्रीनिमित्त श्री क्षेत्र मधु–मकरंद गड येथे भैरीमल्लिकार्जुन यात्रोत्सव व हनुमान मंदिर कलशारोहण; घोणसपूरमध्ये पाच दिवसांचा भव्य धार्मिक सोहळा
महाशिवरात्रीनिमित्त श्री क्षेत्र मधु–मकरंद गड येथे भैरीमल्लिकार्जुन यात्रोत्सव व हनुमान मंदिर कलशारोहण; घोणसपूरमध्ये पाच दिवसांचा भव्य धार्मिक सोहळा
महाबळेश्वर | प्रतिनिधी
सह्याद्रीच्या उत्तुंग शिखरावर वसलेल्या, शिवछत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या दुर्गराज मधु–मकरंद गडाच्या पायथ्याशी असलेल्या मौजे घोणसपूर येथील प्राचीन स्वयंभू शिवालय श्री भैरीमल्लिकार्जुन तीर्थक्षेत्रात महाशिवरात्रीनिमित्त भव्य धार्मिक उत्सव आणि यात्रा मोठ्या भक्तिभावात साजरी होत आहे. श्री शके १९४७, माघ कृ. १३, रविवार दि. १५ फेब्रुवारी २०२६ रोजी भैरीमल्लिकार्जुन यात्रा व महाशिवरात्री उत्सवाचे आयोजन करण्यात आले असून, त्यानिमित्ताने परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे.
या उत्सवाबरोबरच श्री हनुमान मंदिराच्या कलशारोहण व सभामंडप उद्घाटनाचा ऐतिहासिक कार्यक्रम शुक्रवार, दि. २० फेब्रुवारी २०२६ रोजी पार पडणार आहे. हा सोहळा श्री. ष. ब्र. १०८ सद्गुरु डॉ. नीलकंठ शिवाचार्य धारेश्वर महाराज यांच्या शुभहस्ते संपन्न होणार असून, या निमित्ताने संपूर्ण परिसरात अध्यात्मिक उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे.
महाशिवरात्रीच्या मुख्य दिवशी सकाळी रुद्राभिषेक, सायंकाळी पालखी मिरवणूक, रात्री मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे उद्घाटन, महाप्रसाद तसेच रात्री उशिरापर्यंत संगीत भजनाचा भक्तिरसपूर्ण कार्यक्रम होणार आहे. पुढील दोन दिवसांत महाप्रसाद, भजन, छबिना, महाआरती, पालखी मिरवणूक आणि समारोपाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. बुधवार, दि. १८ फेब्रुवारी रोजी लहान मुलांसाठी विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करून सामाजिक सहभागालाही चालना देण्यात येणार आहे.
गुरुवार, दि. १९ फेब्रुवारी रोजी वास्तुशांती, रक्षोधन यज्ञ, शांतीपौष्टिक यज्ञ, कुटीर होम आणि गुरुमाऊलींचे आशीर्वादचन हे धार्मिक विधी होणार आहेत. शुक्रवार, दि. २० फेब्रुवारी रोजी पहाटे मूर्ती स्नपन विधी, प्राणप्रतिष्ठा, प्रधान यज्ञ, कलश प्राणप्रतिष्ठा, कलशारोहण, महामंगल आरती, सभामंडप उद्घाटन व महाप्रसाद असा भव्य धार्मिक कार्यक्रम संपन्न होणार आहे.
या संपूर्ण उत्सवाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. श्री. एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते होणार असून, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मा. श्री. जननायक मकरंद (आबा) पाटील राहणार आहेत. या सोहळ्यासाठी विविध क्षेत्रांतील मान्यवर, लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याची अपेक्षा आहे.
या भव्य धार्मिक उत्सवाचे यशस्वी आयोजन ग्रामस्थ मंडळ घोणसपूर, मल्लिकार्जुन सेवा मंडळ (मुंबई), शिव–शंभू क्रिकेट संघ, सावित्रीबाई फुले महिला मंडळ, घोणसपूर यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे. भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून श्री भैरीमल्लिकार्जुनांचे दर्शन घेऊन महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
महाशिवरात्रीच्या निमित्ताने आयोजित या यात्रोत्सवामुळे घोणसपूर व परिसरात भक्ती, श्रद्धा, सांस्कृतिक परंपरा आणि सामाजिक एकतेचे अद्भुत दर्शन घडणार असून, हा सोहळा भाविकांसाठी विशेष प्रेरणादायी ठरणार आहे.
Comments
Post a Comment