माझी वसुंधरा अभियानात महाबळेश्वरचा दैदीप्यमान यशस्वी प्रवास; राज्यात द्वितीय तर ‘भूमी’ घटकात प्रथम क्रमांक पटकावत पर्यावरण संवर्धनात नवा आदर्श
माझी वसुंधरा अभियानात महाबळेश्वरचा दैदीप्यमान यशस्वी प्रवास; राज्यात द्वितीय तर ‘भूमी’ घटकात प्रथम क्रमांक पटकावत पर्यावरण संवर्धनात नवा आदर्श
महाबळेश्वर प्रतिनिधी —
निसर्गसौंदर्याने नटलेल्या पर्यटन नगरी महाबळेश्वरने पर्यावरण संवर्धनाच्या क्षेत्रात एक ऐतिहासिक यश संपादन करत संपूर्ण महाराष्ट्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी ‘माझी वसुंधरा’ अभियानांतर्गत महाबळेश्वर गिरिस्थान नगरपरिषदेने संपूर्ण महाराष्ट्रात द्वितीय क्रमांक तर ‘भूमी’ घटकात प्रथम क्रमांक पटकावत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. या गौरवशाली यशामुळे महाबळेश्वरच्या शाश्वत विकासाच्या दिशेने सुरू असलेल्या प्रयत्नांना नवी प्रेरणा मिळाली असून शहराच्या पर्यावरणीय वाटचालीला नवे बळ प्राप्त झाले आहे.
महाबळेश्वर गिरिस्थान नगरपरिषदेचे मुख्याधिकारी योगेश पाटील यांच्या कुशल प्रशासकीय नेतृत्वाखाली सर्व विभागप्रमुख, अधिकारी व कर्मचारी यांनी एकसंघपणे काम करत अभियानाची उद्दिष्टे यशस्वीरित्या पूर्ण केली. स्वच्छता, वृक्षसंवर्धन, जलसंधारण, घनकचरा व्यवस्थापन, जैवविविधता जतन आणि पर्यावरण जनजागृती अशा विविध उपक्रमांत नगरपरिषदेने सातत्यपूर्ण व नाविन्यपूर्ण कामगिरी केली. शहरातील रस्ते, उद्याने, सार्वजनिक ठिकाणे आणि पर्यटनस्थळे स्वच्छ ठेवण्यासाठी राबविण्यात आलेल्या मोहिमांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या यशात आजी-माजी लोकप्रतिनिधी, विविध स्वयंसेवी संस्था, सामाजिक संघटना आणि सजग नागरिकांचा मोलाचा वाटा असून सर्वांच्या संयुक्त प्रयत्नांतूनच हे घवघवीत यश साध्य झाले आहे. पर्यावरण संवर्धनाचा संदेश घराघरांत पोहोचवण्यासाठी आणि जनजागृतीसाठी स्थानिक पत्रकारांनी केलेले सकारात्मक आणि सातत्यपूर्ण प्रसिद्धी कार्यही या यशात निर्णायक ठरले आहे.
‘माझी वसुंधरा’ अभियानांतर्गत महाबळेश्वरमध्ये प्लास्टिकमुक्ती, ओला व सुका कचरा वर्गीकरण, कंपोस्ट निर्मिती, जलसंधारण प्रकल्प, वृक्षलागवड आणि जैवविविधतेचे संवर्धन यावर विशेष भर देण्यात आला. विशेषतः ‘भूमी’ घटकात प्रथम क्रमांक पटकावणे हे महाबळेश्वरच्या मृदा संवर्धन, हरित क्षेत्र वाढ आणि शाश्वत विकासाच्या दिशेने सुरू असलेल्या कामाची साक्ष देणारे आहे. शहरातील मोकळ्या जागा हिरव्यागार करण्यासाठी राबविण्यात आलेले उपक्रम, स्थानिक वनस्पतींचे संवर्धन आणि माती धूप रोखण्यासाठी केलेले प्रयत्न हे या यशामागील महत्त्वाचे घटक ठरले.
या उल्लेखनीय कामगिरीबद्दल महाबळेश्वर गिरिस्थान नगरपरिषदेच्या वतीने सर्व अधिकारी, कर्मचारी, लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था, नागरिक आणि पत्रकार बांधवांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले आहेत. निसर्गाचा वारसा जपत शहराचा शाश्वत विकास साधण्याचा संकल्प अधिक दृढ करण्यात आला असून भविष्यातही पर्यावरणपूरक उपक्रम राबवून महाबळेश्वरला हरित आणि स्वच्छ शहर म्हणून विकसित करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे.
महाबळेश्वरचा हा गौरव संपूर्ण सातारा जिल्ह्यासाठी अभिमानास्पद असून राज्यात पर्यावरण संवर्धनाचा आदर्श घालून देणारा ठरणार आहे. निसर्ग आणि विकास यांचा समतोल राखत पुढे जाण्याचा हा प्रवास असाच अखंड सुरू राहो, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
Comments
Post a Comment