रानगव्याच्या धुडगुसामुळे खांबील चोरगेतील शेतकरी भयभीत; शेती उद्ध्वस्त, जीवितास धोका

रानगव्याच्या धुडगुसामुळे खांबील चोरगेतील शेतकरी भयभीत; शेती उद्ध्वस्त, जीवितास धोका

तापोळा प्रतिनिधी –

महाबळेश्वर तालुक्यातील खांबील चोरगे गावात रानगव्याच्या सततच्या धुडगुसामुळे शेतकरी प्रचंड अडचणीत सापडले आहेत. गावातील शेतकऱ्यांनी यंदा ज्वारी, घेवडा, गहू, राजमा अशी विविध पिके मोठ्या प्रमाणात घेतली असताना गेले काही दिवस रानगव्याने या सर्व शेतीची मोठ्या प्रमाणावर नासधूस केली आहे. विशेष म्हणजे हा रानगवा गावाच्या घरांच्या आसपासच मुक्कामी असून त्यामुळे नागरिकांना आणि शेतकऱ्यांना जीव मुठीत धरून राहावे लागत आहे.

या गंभीर परिस्थितीबाबत संतोष लक्ष्मण कदम, मु. खांबील चोरगे यांनी समाजबांधवांना भावनिक आवाहन करताना सांगितले की, रानगव्यामुळे केवळ शेतीचे नुकसान होत नसून मानवी जीवितालाही धोका निर्माण झाला आहे. शेतात काम करणे तर दूरच, घराबाहेर पडणेही धोकादायक झाले आहे. यापूर्वी सोनाट गावात स्वर्गीय राघू दादा कदम यांच्या बाबतीत जी दुर्दैवी घटना घडली, तसेच संकट पुन्हा एकदा उभे राहण्याची भीती गावकऱ्यांमध्ये आहे.

गावातील शेतकरी आणि ग्रामस्थांनी या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहण्याची मागणी केली असून वनविभाग आणि प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. रानगव्याला सुरक्षितरीत्या जंगलात हलवणे, शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान थांबवणे आणि नागरिकांच्या जीविताची हमी देणे ही आजची अत्यंत गरजेची बाब असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. वेळेत ठोस कारवाई न झाल्यास परिस्थिती अधिक गंभीर होऊ शकते, असा इशाराही खांबील चोरगे येथील शेतकरी बंधूंनी दिला आहे.

Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl