जावलीत लोकशाहीचा उत्सव; ६२ टक्के मतदानासह प्रक्रिया शांततेत पार
जावलीत लोकशाहीचा उत्सव; ६२ टक्के मतदानासह प्रक्रिया शांततेत पार
✍️सादिक सय्यद,
मेढा प्रतिनिधी :
जावली तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी रविवारी उत्साहात मतदान पार पडले. तालुक्यातील एकूण १५४ मतदान केंद्रांवर शांततेत व शिस्तबद्ध वातावरणात मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाली. यावेळी एकूण ९२ हजार मतदारांपैकी सुमारे ५७ हजार मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला असून ६२ टक्के इतके समाधानकारक मतदान नोंदवले गेले.
या निवडणुकीत जावली तालुक्यातील तीन जिल्हा परिषद गट व सहा पंचायत समिती गणांसाठी मतदान घेण्यात आले. सकाळी ठरलेल्या वेळेत सर्व मतदान केंद्रांवर मतदानाला सुरुवात झाली. ग्रामीण भागातील मतदारांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवत लोकशाहीच्या या उत्सवात आपले योगदान दिले. विशेषतः महिला, ज्येष्ठ नागरिक आणि प्रथमच मतदान करणाऱ्या तरुणांमध्ये उत्साह दिसून आला.
मतदान प्रक्रिया सुरळीत, पारदर्शक आणि निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी राजश्री मोरे व सहाय्यक निवडणूक अधिकारी प्रविण मुदुगुल यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाने चोख नियोजन केले होते. कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. संपूर्ण तालुक्यात १०३४ कर्मचारी व २३ क्षेत्रीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. यामुळे मतदान केंद्रांवर शिस्तबद्ध रांग, वेळेवर साहित्य उपलब्धता व मतदारांना आवश्यक ते मार्गदर्शन मिळाले.
सकाळपासून संध्याकाळपर्यंत कोणताही अनुचित प्रकार, तणाव किंवा वादाची घटना न घडता मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली, ही बाब उल्लेखनीय ठरली. प्रशासनाच्या दक्षतेमुळे आणि कर्मचाऱ्यांच्या तत्परतेमुळे सर्व केंद्रांवर मतदान सुरळीतरीत्या पूर्ण झाले.
एकूणच जावली तालुक्यातील मतदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत लोकशाहीवर आपला विश्वास पुन्हा एकदा अधोरेखित केला. शांततापूर्ण आणि यशस्वीरीत्या पार पडलेल्या या मतदान प्रक्रियेबद्दल नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत असून, आगामी निकालाबाबत सर्वत्र उत्सुकता निर्माण झाली आहे.
Comments
Post a Comment